आठवणीतली पुस्तके - रात्र थोडी सोंगे फार

कधीतरी भूतकाळात वाचलेल्या आणि अजून आठवणाऱ्या, परंतु आता उपलब्ध नसलेल्या पुस्तकांविषयी लिहावे असा हेतू आहे. '

रात्र थोडी सोंगे फार' हा ग. रा. कामतांनी केलेला जोसेफ डब्ल्यू मीघर नावाच्या अमेरिकन लेखकाच्या पुस्तकाचा अनुवाद. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी तो पुण्यात सहजपणे (२० रुपयांना) मिळत असे. हे पुस्तक ८०च्या दशकातील सुरुवातीच्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय होते. त्या पुस्तकातले एकेक पान वाचून आम्ही वसतिगृहातील विद्यार्थी वेड्यासारखे खिदळत असू.

हे पुस्तक म्हणजे एक आत्मचरित्र. पण कोणा 'प्रसिद्ध' माणसाचे नव्हे. अमेरिकेत १९२० च्या दशकात आलेली मंदीची लाट ज्या मुलाने कळत्या वयात बघितली (पण ज्या लाटेचा त्याच्या वैयक्तिक जीवनावर फारसा परिणाम झाला नाही - एक वेळ जेवणे, नगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करणे आदी उद्योग करावे लागले नाहीत) असा हा मुलगा. त्याचे कुटुंब न्यूयॉर्कमध्ये राहत होते. 'टिपी' त्याचे नाव. टिपीला एक मोठा भाऊ, आई आणि वडील.

ते पुस्तक अजूनही लक्षात राहण्याचे मुख्य कारण म्हणजे निवेदनामधला कमालीचा लोभस साधेपणा. आणि कामतांनी त्याचा अनुवाद करताना त्याला कुठेही धक्का लागू दिला नव्हता.

साधाच प्रसंग - टिपीचे मुलाचे वडील, मामा वगैरे नातेवाईक त्याच्या जन्माचा आनंद साजरा करत असताना टिपीचा मोठा भाऊ तान्ह्या टिपीचे गाठोडे काखोटीला मारून हळूच सर्वांची नजर चुकवून जिना उतरताना त्यांच्या मावशीला दिसतो. सगळे धावून त्याला पकडतात, दम देतात, मार देण्याचा धाक घालतात (हे अमेरिकन लेकाचे मुलांना त्या काळापासूनच फार लाडावून ठेवतात असे दिसते. अशा गुन्ह्याला आपल्याकडे किमान कानाखाली जाळ, पाठीवर आग आणि हे कमी पडेल अशी शंका आल्यास हाताला/तोंडाला/पायाला तापवलेल्या पळीचा चटका एवढे पदरात पडले असते हे निश्चित!), पण तो बेडरपणे तसाच उभा राहतो. अखेर त्याच्या हातून ते गाठोडे हिसकावून घेण्यात येते. तेव्हा तो आई-वडिलांना सरळ (आपल्या भाषेत 'तोंड वर करून') स्वच्छ प्रश्न करतो, "मी तुमचे सर्व ऐकतो, सर्व भाज्यासुद्धा खातो, पानात काही टाकत नाही. मग असे असताना तुम्ही हा आणलातच का?".

अजून एक प्रसंग टिपीच्या जन्माचा (हे सगळे प्रसंग अर्थात टिपीने स्वतःच्या जन्मानंतर ऐकले असणार). टिपीचे कुटुंब नुकतेच त्या इलाख्यात राहायला गेलेले असते. प्रसूती घरातच डॉक्टरांच्या मदतीने व्हायचा तो काळ. ते डॉक्टर आलेले नसतात म्हणून टिपीचे वडील दार उघडून पळतच निघायच्या घाईत असतात. तेवढ्यात त्यांची टिपीच्या काकांशी दारातच टक्कर होते आणि काकांनी आणलेला 'बोस्टन क्रीम पाय' त्या टकरीत धारातीर्थी पडतो. तो पायचा खोका तसाच दाराजवळ बाहेर असलेल्या कचऱ्याच्या पेटीत टाकून काका आत जातात आणी वडील बाहेर. डॉक्टर सापडत नाहीत म्हणून परत यायला निघतात. ती त्यांची धांदरटासारखी पळापळ पाहून जवळच्या नाक्यावरचा पोलिस त्यांना घरापर्यंत सोडायला येतो. वडिलांना घर काही केल्या आठवत नाही (सगळी घरे बाहेरून सारखीच दिसतात), घर क्रमांकदेखील आठवत नाही. अखेर ते प्रत्येक घरासमोरची कचराकुंडी उघडून बघू लागतात आणि 'बोस्टन क्रीम पाय'चा खोका त्यांचा वाटाड्या होतो.

टिपी शाळेत जातो; टिपीच्या घरातला जुगारी भाडेकरू (प्रिन्स हे त्याचे नाव आठवते); नियमित चर्चला जाणारी आणि नियमित भाडे थकवणारी दुसरी भाडेकरू; टिपीच्या कुटुंबाने केलेली कुनी आयलंडची सहल; दारूबंदीच्या काळात (अमेरिकेत दारूबंदीचा प्रयोग तेव्हा काही काळ सुरू होता, तो १९३२-३३ मध्ये बंद करण्यात आला) टिपीच्या वडिलांनी घरीच लावलेली दारूची भट्टी, त्यांना त्या शेजारी पोलिसाने केलेली मदत (भट्टीचे सर्व साहित्य तो पोलिस त्यांना चौकीत जप्त केलेल्या सामानातून आणून देतो); टिपीचा टॅक्सी ड्रायव्हर शेजारी, त्याची बरीच मुले, मासिकातील 'धारावाहिक' वाचण्यात कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष करणारी त्या टॅक्सी ड्रायव्हरची जाड बायको; नवे कपडे आणून देणारे आणि त्याची किंमत एका वेळेला दहा-वीस सेंटस अशी हप्त्याने घरी येऊन घेणारे व्यापारी (लोप्कोविस हे त्या व्यापाऱ्याचे नावही आठवते)....वय वाढण्याची प्रक्रिया किती संमिश्र घटनांनी भरलेली असते त्याचा सूक्ष्म तपशिलात जाऊन विणलेला पट...आठवणी दाटतात!

आणि हे सर्व कामतांच्या सिद्धहस्त लेखणीतून असे उतरले होते की जणू कामतांनी मूळ पुस्तक लिहिले, मीघरने त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला!

गेले वीस वर्ष मी हे पुस्तक मिळवण्याचे अनेकानेक यत्न केले पण सगळे व्यर्थ. मॅजेस्टिक, जिथून याच्या प्रती आम्ही घेत असू, येथे कळले की ते 'आऊट ऑफ प्रिंट' आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशक वगैरे माहिती ठळक दिसेल अशी दिली नव्हती. असल्यास आम्ही त्या कैफात वाचली नाही. पुस्तकच 'आऊट ऑफ प्रिंट' असल्यामुळे पुस्तकविक्रेत्याला अजून काही माहिती विचारण्याचा उद्धटपणा केला नाही.

आंतरजालावरही तपासले पण काही सापडले नाही. माझी तपासाची पद्धत चुकली असेल आणि कुणा मनोगतीला बरोबर पद्धत सापडेल अशी एक आशा.

तोवर स्मृतींची पाने चाळत बसणे एवढाच एक इलाज. जर कुणाकडे अशा काही पश्चात्तापाने विदग्ध आठवणी असतील, तर त्यात सहभागी व्हायला मला आवडेल. शेवटी (थोडा बदल करून) समान दुःखे व्यसनेषु सख्यम!