बुडापेष्टमध्ये श्रावणी

चांगभलं दादानूं, सदानंदाचा येळकोट घ्या तायानूं!
गेल्या वर्षी प्यारीसमध्ये आयफेल टावरसमोर आम्ही दणक्यात होळी साजरी केली त्याचा वृत्तांत आपणांपर्यंत पोचवला होताच. 'बंभोले' च्या गजराने आणि मनगटे ओली करुन केलेल्या शंखध्वनीने आम्ही टावरजवळचा परिसर दणाणून सोडला होता. 'शिवजीका प्रशाद' म्हणून ऐनवेळी भांग न मिळाल्याने छगन्याने हाताला लागतील ते सगळे द्रव पदार्थ एकत्र मिसळले होते. धागिनतिनकधिन धागिनतिनकधिन असे नाचत असतानाच फ्रेंच पोलीसांच्या गाडीचा जवळ येत असलेला आवाज एवढेच आम्हाला आज स्मरते. नंतर चांगल्या वागणुकीमुळे आम्हाला सहा महिने सूट मिळाली आणि श्रावणाच्या पहिल्या दिवशीच आम्ही आणि छगन्या बाहेर आलो. ज्या देशात आमच्या महान हिंदू संस्कृतीची जाण नाही तो देश त्यागणे इष्ट असे जाणून आम्ही बुडापेष्ट नगरीत डेरेदाखल झालो. "जगाला आपल्या संस्कृतीची ओळख करुन द्यायची असेल तर देशोदेशींच्या टकलांवर आपल्या संस्कृतीचे केशरोपण झाले पाहिजे" हे प. पू. आत्मारामबुवा शेंडे गुरुजींचे उद्गार आमच्या दोन्ही कानांत, विशेषत: उजव्या कानात सतत घुमत असतात (गजाकाका आणि आजोबा प्रकरणापासून आमच्या डाव्या कानाला अंमळ कमी ऐकू येते). आपण जिथे जाऊ तेथे आपले सण, आपल्या शेंड्या, जानवी, सोवळी, आपले कर्दळीचे खुंट, आपली पंचमुखी रुद्राक्षे, आपल्या आंब्याची तोरणे आणि कष्टमचा डोळा चुकवून जुन्या धोतरात बांधलेले गंगाजलाचे गडू घेऊन जाऊ असा आम्ही चंग बांधला आहे. जिथे जाऊ तेथे आपल्या बंधुभगिनींना एकत्र आणू, आपले त्या त्या देशातले सांस्कृतिक मंडळ स्थापू, त्याच्या चिटणीसाच्या पदासाठी मारामाऱ्या करु, "गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात किती डालर खाल्लेस रे पेंडशा, हरामखोरा" या सदाबहार वाक्यात  स्थळानुसार कधी युरो तर कधी दिरहाम, कधी गोडबोल्या तर कधी गोगट्या, कधी हलकटा तर कधी मायजयां एवढाच बदल करु, म्याकडोनाल्डच्या समोर उभे राहून लसणीच्या ठेच्याच्या आठवणी काढू, कोकचे टिन खाली ठेवताठेवता 'गावाकडचे काय ते ताजे ताक, ती आंबील, ते ताज्या कैरीचे पन्हे' असे गळे काढू असे आमचे - म्हणजे माझे आणि छगन्याचे - पक्के ठरले आहे.  आष्ट्रेलियामधले आमचे प्रतिनिधी चिदानंद सिद्धापुरमठ म्हणतात, "जागतिकीकरणाच्या रेट्यात आपली परमपूज्य संस्कृती इलाष्टिक तुटलेल्या अंडरप्यांटीसारखी ढिली पडली आहे. तिला- म्हणजे आपल्या संस्कृतीला-  पुन्हा ताठर करायचे असेल (चिदानंद एक अत्यंत लोकप्रिय पण जरासे नाजूक औषध तयार करणाऱ्या कंपनीत काम करतात), तर तर तिला गोमूत्रापासून सत्यनारायणाच्या तीर्थापर्यंत सर्व संस्कृतीअर्कांचे सलाईन लावले पाहिजे. आज इंफोसिसने बोनस शेअर जाहीर केला आहे, पण तरीही येशूदासला मंदिरात प्रवेश वर्ज्यच आहे. जागतिकीकरणात असली प्लाष्टरे घालून आपल्या संस्कृतीचे फ्रॅक्चर सांधले जाणार नाही". त्यांच्या शेवटच्या दोन वाक्यांचा आम्हाला अद्यापि नीटसा अर्थ लागला नाही.
बुडापेष्टमधील श्री. चिन्मय ग्रामोपाध्ये यांच्या घरी आम्ही यावर चर्चा करत असताना भारताच्या महान संस्कृतीच्या आठवणीने श्री. ग्रामोपाध्ये यांना भरुन आले.  बुडापेष्टमधले पहिल्या पिढीचे प्रतिनिधी आणि चिन्मयचे तीर्थरुप गुंडोपंत ग्रामोपाध्ये यांच्या डोळ्यात तर भारतभूचा विषय निघाल्यानिघाल्या पाणी आले. (चिन्मयचा मुलगा वक्रतुंड उर्फ विकी "दादांच्या डोळ्याचा काही प्रॉब्लेम--- डॉक्टरांना दाखवायला पाहिजे---" असे काहीसे पुटपुटला, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. ) "युरोपात स्थायिक झालेल्या आमच्या पिढीचे बुश्कोट आणि प्यांटी युरोपिय असल्या तरी आतले भोके पडलेले बनियन आणि पट्ट्यापट्ट्याच्या चड्ड्या अस्सल भारतीय कळकट आहेत" हे चिन्मय यांचे वाक्य आमच्या काळजाला स्पर्श करून गेले. शुक्रवारची संध्याकाळ होती. साधारण आठवड्याच्या या वारी या वेळी चिन्मयराव असेच भावविभोर होतात असे आमचे निरीक्षण आहे ( "झेपत नाही तर---- घ्यावी कशाला एवढी---" या सौ. चिन्मयी यांच्या वाक्याचा बाकी आम्ही अद्याप अर्थ लावत आहोत).   शेवटी बुडापेष्टात आपल्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी श्रावण पंचमीला इथल्या समस्त भारतीयांना एकत्र करुन श्रावणी करावी असे ठरले. "होय, तेवढेच एक गेट टुगेदर!" चिन्मय यांच्या सुविद्य पत्नी चिन्मयी खुलून म्हणाल्या. चिन्मय यांनी त्यांना किंचित तांबारलेल्या नजरेने दाबले.
अखेर श्रावण पंचमी उजाडली. शुचिर्भूत यज्ञोपवित बुडापेष्टात मिळणे अवघड असल्याने विकीने ऐनवेळी गालिचांची सुते गोळा करुन जानवी तयार केली. गोमुत्र आणि गोमय यांच्यासाठी देशी गाय कुठून मिळवावी हा प्रश्न बाकी सुटता सुटेना. बुडापेष्टात असलेल्या जर्सी आणि होल्स्टन फ्रेजीयन गायींच्या पोटात आवश्यक तेवढे देव असतील की नाही यावर गुंडोपंत साशंक होते. शेवटी या गायींच्या गोठ्यात सतत अठ्ठेचाळीस तास अनुराधा पौडवालच्या गायत्री मंत्राची कॅसेट लावून त्यांचे शुद्धीकरण करुन घ्यावे असे ठरले. बुडापेष्टातील गोशाळेचा मालक ब्रूस पार्टिंग्टन यांने कार्यस्थळी गोमूत्र आणि गोमय विनामूल्य आणून देण्याचे मान्य केले. (फक्त यावर त्याला विकी 'गुड गाय' म्हणाला, ते आम्हाला जरा जादा वाटले) श्रावणीचा कार्यक्रम यथासांग पार पडला. पानावर बसण्याच्या आधी काहीसा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. छगन्याने कार्यक्रमाला काही कारणाने येऊ न शकलेल्या मंडळींचे  संदेश वाचून दाखवले. म्यांचेस्टरस्थित गोपाळ अवसरे त्यांच्या संदेशात म्हणतात, "मराठी माणसाने आपुलकीचे धागे तुटू न देता एकतेचे आणि अखंडतेचे वस्त्र विणत राहिले पाहिजे". आमच्या भांगिर्दे खुर्दच्या (जि. सिंधुदुर्ग) उपसरपंचपदासाठी जनू परांजप्या आणि सावकार खोत यांची कशी लठ्ठालठ्ठी झाली याचा समग्र इतिहास मी अशा कोणत्याही कार्यक्रमात सांगण्यासाठी सदैव कमरेला खोचून ठेवत असतो.  तसा तो मी वाचून दाखवला. यॉर्कशायरमध्ये रहाणारे अप्पा सोमाटणे म्हणाले," आपली माणसे, आपले सण याची खरी किंमत महाराष्ट्रापासून दूर गेल्यावरच कळते. इथला 'व्हेरी वेल डन' स्टेक खाताना मला नागपुरी वडाभाताची आठवण येऊन घास घशात अडकतो अहो, हल्दीरामच्या संतरा बर्फीच्या एका तुकड्यावरुन मी आख्खे केएफसी ओवाळून टाकीन." अप्पा अजूनही काही बोलणार होते, पण त्यांच्या घशात काहीतरी अडकल्याने त्यांना पुढे काही बोलता येईना.
तर मंडळी, अशी आम्ही बुडापेष्टात श्रावणी साजरी केली. आता पुढेही जिनिव्हात अनंताची सार्वजनिक पूजा, न्यूयॉर्कमध्ये नारायणनागबळी, कुवेतमध्ये महाशिवरात्र साजरे करुन आपली संस्कृती जगभर पसरवण्याचा आमचा मानस आहे, पण ते किस्से पुन्हा कधीतरी---