नाविन्यपूर्ण मार्ग!

स्वतः ला पुढे आणण्याचे काही नाविन्यपूर्ण मार्ग

लेखक म्हणून स्वतः ला पुढे आणण्याचे काही मार्ग येवढ्यात निदर्शनाला आले. हे कोणत्याही होतकरू लेखकास उपयोगी पडू शकतील म्हणून संकलित करून देत आहे.

१.लेखन करण्या साठे एखादा वादग्रस्त आणि कधीच न संपणारा विषय निवडावा उदा. ज्योतिष वगैरे. तात्कालिक विषय निवडू नयेत - पुस्तकाचे आयुष्य कमी असते!

२. विषयाचे खंडन करणारे लेख लिहून काढावेत. यावर अशीही विपुल माहिती मिळते. थोडीफार जुनी पुस्तके (शक्य तो आऊट ऑफ प्रिंट असल्यास बरे - कुणाला शंका नको!) शोधावीत व त्यांचे संदर्भ द्यावेत.

३. एकदा हे सगळे मिश्रण एकत्र टाकले की, जमलेच तर हीच लेखमाला वर्तमानपत्रातही प्रकाशित करून घ्यावी (याचा पुस्तक प्रसिद्धीला उपयोग, आणि प्रकाशकाला पुस्तक खपणारच हो! हा दिलासा)

४. एखादा उदारमतवादी शास्त्रज्ञ हेरावा. ओळखी पाळखी काढून त्याच्या पर्यंत पोहोचून 'आत्मस्तुतीचा दोष हो!' असे म्हणत म्हणत आपली टिमकी त्याच्यापुढे वाजवून, नाहीच जमले तर बाबा-पुता करून आपल्या पुस्तकाला त्याची प्रस्तावना पाडून घ्यावी.

याकामी त्याच्या कितीही आणि कसे ही मागे लागावे लागले तरी, हे काम पूर्ण करावे. कारण आपण ही प्रस्तावना कशी कशी मिळवली हे कधी छाप्यात येत नसते हे ध्यानात ठेवावे.

५. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करावा. पुण्यातला एखादा समाजसेवा करणार बोलावता आला तर उत्तम - लेखकाची मते या समाज सेवकाला मान्य आहेत असा समज होण्याची शक्यता पण वाढते - शिवाय हा समाज सेवक पुस्तक वाचेलच असे काही नाही. 'आपणही यांच्या मध्ये बसतो' ही भावना अजून आपले बळ वाढवून जाते!

६. पुस्तक प्रकाशित झाले की, या वादग्रस्त विषयावर जाहीर पणे बोलण्याचे एकही संधी सोडू नये. एक पथ्य नक्की पाळायचे की काहीही झाले तरी पुस्तकातले कोणतेही लेखन आता 'ओपन' करायचे नाही.

म्हणजे लेखना विषयी बोलायचे पण वेळ आली की सांगायचे की, "क्षक्षक्षक्षक्ष पुस्तक क्षक्षक्षक्ष प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. आपल्या बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे माझ्या पुस्तकात मिळतील असा विश्वास वाटतो. आपण ते जरुर वाचावे."

हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि इथे भले भले चुकले आहेत आणि आपले लेख सांगून बसले आहेत. (कोण घेतो पुस्तक मग?) तेव्हा लक्षात ठेवायचे काहीही झाले तरी आपले पुस्तक खपवायचे आहे, वाद वाढला तर पुस्तकाची जाहिरात! वाद नाही वाढला, तर आपण बाद!

७. काही काही काळाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ लेखकाची प्रस्तावना कुठे कुठे प्रसिद्ध करत राहायचे. आपल्या बाजूने व विरुद्ध बाजूने भांडणारे अलगद (आणी कायम) मिळतातच. विरुद्ध बाजूने भांडणाऱ्यांना लगेच प्रतिसाद द्यायचा. हे आपले मुख्य ग्राहक असतात. जे आपल्या बाजूने आहेत त्यांची काळजी करायची नाही. (ते असेही पुस्तक वाचणार नाहियेत!)

वाद झाला की आपण लेखक म्हणून मान्यता पावतोच शिवाय याच ज्येष्ठ शास्त्रज्ञ लेखकाचे संशोधन प्रसिद्ध झाले की आपण तेथे आपले मत नोंदवायचेच - यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे क्षक्षक्षक्ष येथे ती वाचा !

८. आपला एक कायम स्वरुपी ब्लॉग बनऊन तेथे ही सर्व कायम साठे स्वरुपात ठेवावे. म्हणजे संदर्भ द्यायला उपयोगी येत रहाते.

९. यामुळे वाद नुसताच वाचणारे/ऐकणारे 'एकदा हे पुस्तक वाचायलाच हवे बुवा' या मतापर्यंत तरी येतातच! एखादा भोळा भाबडा तर 'आपण दिलेल्या दुव्यावरील क्ष क्ष क्ष क्ष यानी लिहिलेले आपल्या पुस्तकाचे परीक्षण फार आवडले. पुढच्या भारत भेटीत आपले पुस्तक देखिल वाचेन.' असा प्रतिसादही देतो!  हे फार महत्त्वाचे आहे, म्हणजे "पुस्तक भारता बाहेरही गाजले" असे म्हणण्याच मार्ग मोकळा होतो.

९. संकेत स्थळांवर ज्येष्ठ शास्त्रज्ञ लेखकाची प्रस्तावना अधून मधून प्रसिद्ध करत राहायचे. मात्र दोन प्रसिद्धीं मध्ये योग्य तेवढा काळ मध्ये जाईल याची खबरदारी घ्यायची (नाही तर एखादा गुंडोपंत आपला भांडफोड करण्याचे शक्यता असते!)

१०. शिवाय संकेत स्थळांवर वगैरे एखादा आपल्या विषयाचाच समुह सापडलाच तर मग आयतेच कुरण! 'आत्मस्तुती दोष' असे म्हणत म्हणत त्याना आपल्या पुस्तकाचे नि प्रकाशकाच्या नावाचे व्यनि पाठवायचे. एखादा मासा गळाला लागतोच. नाहीतर वाद तरी येउच शकतो बाहेर! या वर एखादी चर्चाप्रस्ताव पण टाकायचे, एखादा वितंडवाद घालणारा या कामी आपल्या बाजूने आलाच तर मग बहारच येते आणी प्रतिसाद वाढण्याचे शक्यता वाढते.

११. 'आत्मस्तुती दोष' असे म्हणायला मागे पुढे पहायचे नाही. आपला निर्लज्ज पणा 'पहा आपलेच दोष लोकांस दाखवतो' या नम्रपणात झाकला जातो. (आणि समजा नाहीच झाकला गेला, तर काय फरक पडतो? शब्द बापुडे वारा!!) अश्या रितीने शिळ्या विषयाच्या या कढीला कितीही उत आणला तरी चालतो.

१२. शिवाय अशाच प्रकारे 'लग्न वगैरे कायम चर्चेत असणाऱ्या विषया वरचे' दुसरे पुस्तक बाजारात आणण्याला याच उपयोग होतोच.

१३. शिवाय लेखक पुस्तके तर खपवतोच आणी आपली जाहिरातही करतो, या मुळे प्रकाशक पण दुसऱ्या पुस्तकाला फारशी खळखळ करत नाही.

पुढच्या पुस्तका साठी परत पहिल्या पासून सर्व सुरु.. या वेळी एकदा करुन झाल्या मुळे सर्व सोपे असते... या विषयावर आणखी काही माहिती आपल्याकडे ही असल्यास नक्की द्यावी. (तेव्हढेच या लेखाला प्रतिसाद वाढतील ना!)

आपला

गुंडोपंत