आमचा कोकणप्रवास

माझ्या मामेबहिणीचे लग्न ठरल्याचे कळले आणी आमच्या रत्नागिरीला कधी,कसे आणी कोणकोण जायचे या चर्चेला ऊत आला. माझ्या नवऱ्याचे आजोळही कोकणात असल्याने दरवर्षी कोकणात एक ट्रीप तरी झालीच पाहिजे याबद्दल (तरी)आमच्यात दुमत नव्हते. त्यांतून सख्ख्या मामेबहिणीचे लग्न म्हणजे बघायलाच नको.लग्न मेमधील एका रविवारी होते पण आम्ही किमान एक आठवडा तरी आधी यावे असा आग्रह होता. अर्थात नवऱ्याचा व्यवसाय आणी माझी नोकरी सांभाळून आठ दिवस सलग कुठेही जाऊन राहणे मुश्किलही नही नामुमकीन होते. आमच्याबरोबर माझी चुलत बहिण,चुलत भाऊ आणी आत्तेभाऊ हेही येणार होते. ते तिघेही महाविद्यालयांत शिकत असल्याने त्यांना उन्हाळी सुट्टी होती. त्यामुळे ते रत्नागिरीला जायच्या ८ दिवस आधी पुण्यात दाखल झाले. ८ दिवसांत त्यांचे पुणे दर्शन घेऊन झाले. सिंहगड ,खडकवासला, आणि (अतिरेक्यांसारखी डोक्याला रुमाल बांधलेली)अधिक प्रेक्षणीय स्थळे  बघून झाली. आम्ही शनिवारी पहाटे ४ ला निघायचे ठरविले होते. पण शुक्रवारी संध्याकाळी ७:३० वाजता अचानक नवऱ्याने जाहीर केले की, आपण आज १० वाजता निघायचे आहे. सगळ्यांनी एकच जल्लोष केला आणि युद्धपातळीवर सामानाची
बांधाबांध सुरु केली.चारचाकीतून जायचे असल्याने सगळ्यांनीच भरपूर सामान घेतले होते.सगळे सामान आणी आम्ही ५ जण..गाडी खचाखच भरली. १० म्हणताना आम्ही ११ ला निघालो.. तबकडीवर गाणी चालू होती.एकीकडे आमच्या गप्पांना ऊत आला होता. नवरोबा अत्यंत सफाईने गाडी चालवित होते. १ नंतर हळूहळू आमच्या डोळ्यांवर पेंग येऊ लागली. गाडीचालकाच्या शेजारी बसलेल्याला डुलक्या घ्यायची परवानगी नसते त्यामुळे चुलतभाऊ मागच्या सीटवरुन पुढे व आत्तेभाऊ मागे अशी आसनांची अदलाबदल झाली. नवरोबाप्रमाणेच चुलतभावालाही झोपेचे वावडे असल्याने जागे राहून सोबत करण्यासाठी  आम्हांला तो चांगला बकरा मिळाला होता. ते दोघे आम्हांला सारखे झोपू नका, गप्पा मारा वगैरे  सांगत होते. मी,चुलतबहीण आणि आत्तेभाऊ आपण जागे आहोत हे दाखवण्यासाठी मधूनच एखादे (असंबद्ध) वाक्य टाकत होतो. मध्ये चहा पिण्यासाठी सगळे खाली उतरलो तेव्हा मात्र आमची झोप उडाली. २:३० वाजले होते. चहा  आणी बिस्कीटे खात १० मिनिटे थांबलो. सगळे परत ताजेतवाने झाले होतो. आता पुढे कुंभार्ली घाट चालू होणार होता. घाटात थोडे पुढे गेल्यावर समोरुन धुक्याचे लोट येऊ लागले. ३/४ फुटांपलिकडलेही दिसत नव्हते.गाडीत आम्ही 'ताल' ची गाणी ऐकत होतो.वातावरण अप्रतिम होते. गाणी ऐकताना गप्पा चालूच होत्या. घाटात मध्येच एखादे वाहन येत जात होते. बरोबर ६ वाजता आम्ही मारळ ला पोहोचलो. तिथे भगवान शंकराचे मंदिर आहे. नवरा विश्रांतीसाठी थांबला आणी बाकिचे चौघे उत्साहात मार्लेश्वराच्या पायऱ्या चढू लागलो. २०/२५ पायऱ्या चढल्यानंतर आमचा वेग मंदावला. पायऱ्यांच्या एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर होत. आजुबाजूची झाडे सुकली होती. जवळच्या मोठमोठ्या दगडांवर अमुक लव्ह्ज तमुक, जय मार्लेश्वर, रमेश,दीपक असे काही बाही लिहिले होते. पायऱ्यांच्या कडेला असणाऱ्या टपऱ्या बंद होत्या. हाशहुश्य करत आम्ही मंदिराजवळ पोहचलो. हे मंदिर म्हणजे एक गुहा आहे. आत जाण्यासाठी वाकून जावे लागते. आत पुजारी पूजा करीत होता. तिथेच उभे असलेल्या एका माणसाने आम्हाला वर बघण्याची खूण केली व त्याच्या हातातल्या विजेरीने गुहेच्या वरच्या बाजूला एक प्रकाशझोत टाकला. तिथल्या खबदाडींमध्ये २/३ सर्प होते. ते बघून एकदम अंगावर शहारा आला आणी (अर्थातच) भितीही वाटली.तरी आत्ता कमी साप आहेत असे तो म्हणाला. आम्ही झटपट दर्शन घेऊन बाहेर पडलो. अगदी देवाच्या ठिकाणी असले तरी डोक्यावर २/३ सर्प लटकत असताना आम्ही तिथे थांबण्याइतके शूर नक्किच नव्हतो. बाहेर आल्यावर तो पुजारी आत इतक्या बिनधास्त कसा बसला असेल याबद्दल चुलतबहिणीने आश्चर्य व्यक्त केले. आम्हीही तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. थोडा वेळ घालवून आम्ही पायऱ्या उतरु लागलो. उतरु लागेपर्यंत तेथील काही दुकाने उघडली होती. आम्ही एका ठिकाणी काकडी व दुसरीकडे ताक घेतले.खाली येईपर्यंत नवरा चहा पिऊन पुन्हा गाडी चालवायला सज्ज झाला होता. गाडीत बसल्यावर पुन्हा आमच्या गप्पाटप्पा,गाणी सुरु झाली. ९ पर्यंत रत्नागिरीत लग्नघरी येऊन पोहोचलो.
संध्याकाळपर्यंतचा वेळ गप्पा, खाणेपिणे, तयारी यांत गेला.रात्री सीमांतपूजन होते. त्यामुळे तिथेही सगळ्या
नातेवाईकांना भेटणे, ओळखी करुन घेणे-देणे, जेवण यांत बराच वेळ गेला. दुसऱ्या दिवशी लग्न. सकाळपासून एकच धांदल होती. सगळे आवरुन आम्हीही कार्यालयात पोहोचलो. माझ्या आजोळचे सगळे नातेवाईक भेटत होते. त्यांतले काही लांबचे नातेवाईक पहिल्यांदाच भेटत होते.त्यामुळे तू ताईची मुलगी ना? कुठे असतेस?यजमान काय करतात वगैरे चौकश्या चालू होत्या. तेवढ्यात माझ्या आईने तिच्या मामेभावाची (आज्जीच्या मामेभावाच्या मुलाची)ओळख करुन दिली. मी ही लगेच माझ्या नवऱ्याची आणी त्या मामाची ओळख करुन दिली.लग्न लागले, पंगती उठल्या. आम्ही त्याच रात्री घरी जायला
निघणार होतो. त्याप्रमाणे बॅग्ज भरुन,सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. यावेळी गाडीत २ बॅग्ज वाढल्या होत्या.
आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. पुन्हा आमच्या गप्पा सुरु. ३ तासांनंतर हायवेवरील एका टपरीवर चहा
पिण्यासाठी थांबलो. रस्त्यापलिकडे ४/५ ट्रक थांबले होते. पलिकडे आमच्या अगदी समोर एक टेम्पो उभा होता. आम्ही हसत खिदळत चहा घेत होतो. तेवढ्यात त्या टेम्पोमधून एकजण डोळे चोळत खाली उतरला रात्रीचे २/२:३० झाले असतील.."अगं हा सकाळी भेटलेला तुझा मामा आहे वाटतं"- इति नवरा. मी अगदी जोरात म्हणाले " छे, मामा इथे आत्ता यावेळी कसा असेल?" तो माणूस रस्ता क्रॉस करुन टपरीच्या दिशेनेच येत होता. आम्ही सगळे तो मामाच आहे का याची खात्री करण्यासाठी त्याच्याकडेच बघत होतो. आणि तो सकाळी लग्नात भेटलेला ताम्हनमळ्याला राहणारा माझा मामाच होता. तो पुण्याला आंब्यांच्या पेट्या घेऊन चालला होता. आता एकत्रच जायचेय तर भोरमार्गे न जाता ताम्हिणी घाटातून जाऊया असे ठरले. आम्ही निघालो. कधी आमची गाडी पुढे तर कधी मामाचा टेम्पो पुढे असे चालले होते. आता आम्ही माणगावातून ताम्हिणी घाटाच्या दिशेने जात होतो. घाट सुरु झाला. पहाटेचे साधारण ३:३० झाले होते. मामाचा टेम्पो थोडा पुढे गेला होता पण दिसत होता . आणी अचानक कडाड्कड्कड असा आवाज झाला. नवऱ्याने भरभर पुढे गेलेल्या टेम्पोला दिसतील अश्याप्रकारे सिग्नल्स दिले आणि गाडी बंद केली. सगळे गाडीतून खाली उतरलो. चारचाकीचे सगळे वजन पेलणारा पाटा चक्क तुटला होता.
आम्ही त्या सुनसान ताम्हिणी घाटात हताशपणे उभे होतो. एकच उपाय होता तो म्हणजे पुढे गेलेल्या मामाला काहीतरी करुन बोलावून घेणे. आमच्या नशिबाने त्या दिशेने जाणारी एक ट्रॅक्स दिसली. त्यांना थांबवून आम्ही त्या टेंपोचा नंबर आणि आमचा निरोप सांगितला. ट्रॅक्स गेल्यावर आमचे तर्ककुतर्क चालू झाले. मामा भेटले तर ठीक नाहीतर काय करायचे वगैरे ठरवू लागलो. आजुबाजूला सगळे शांत होते. तेवढ्यात समोरुन एक वाहन येताना दिसले आणि आम्ही देवाचे आभार मानले. तो मामाचाच टेंपो होता. मामा आणि त्याच्याबरोबर क्लीनर म्हणून असलेली दोन मुले हे सगळे खाली उतरले व त्यांनी चारचाकीची पहाणी केली. पाटा तुटलेला असताना सगळे गाडीतून येणे तर शक्यच नव्हते. पण एकजण तर येऊ शकला असता. शेवटी आम्ही आमचे सगळे सामान मामाच्या टेंपोत टाकले. त्या टेंपोला मागे एक दोरी लोंबत होती. त्या दोरीला धरुन चुलतभाऊ आणि आत्तेभाऊ टेंपोत चढले. मी आणि चुलतबहिण प्रयत्नांची परकाष्ठा करत टेंपोत चढलो. टेंपो आंब्याच्या पेट्यांनी भरला होता. आम्ही सगळे मागच्या बाजूला ठेवलेल्या पेट्यांवर बसलो. ते दोन क्लीनर्स पुढे केबिनमध्ये बसले होते. टेंपो सुरु झाला. असे टेंपोत बसून यावे लागेल हे आम्हांला स्वप्नातही वाटले नव्हते. आणि आता आपण काहीही त्रास न होता पुण्याला पोहोचणार ही खात्री असल्याने आम्हांला त्या प्रकाराची मजाच वाटत होती. ताम्हिणी घाटातून आमचा टेंपो व मागे नवरा एकटा चारचाकी चालवित येत होता. घाटात आजुबाजूला मोठमोठी झाडे होती आणी अंधार असल्यामुळे आमच्या सावल्या दिसत होत्या. आम्ही दिल चाहता है मधले तीन नायक हातवारे करुन सावल्या बघतात तसे करु लागलो. नवरा पुढे गेला आणि त्याच्यामागून टेंपो जात होता.
थोड्या वेळाने आत्तेभावाला लघुशंकेची जाणीव झाली. आता मामाला टेंपो थांबवायला कसे सांगायचे हा यक्षप्रश्न होता. थोडा वेळ आम्ही वाट बघितली की मामा मध्ये थांबतीलच. पण नाही. टेंपो भरधाव चालला होता. इकडे आत्तेभाऊ अस्वस्थ झाला होता. आम्ही मामाला हाका मारायला सुरुवात केली. पण टेंपोच्या आवाजापुढे केबिनमधल्या मामापर्यंत आमचा आवाज अजिबात पोहोचत नव्हता. मध्ये आंब्याच्या पेट्या रचलेल्या असल्याने आम्हांलाही केबिनपर्यंत जाता येत नव्हते. आत्तेभावाच्या दयनीय अवस्थेकडे बघून आम्ही जीवाच्या आकांताने मामाला हाका मारत होतो. केबिनची काच मागून उघडलेली होती.आमचा आरडाओरडा ऐकून क्लीनरने त्या काचेतून मागे वळून पाहिले.आम्ही हातवारे करुन त्याला गाडी थांबवायला सांगा असे इशारे करत होतो. पण त्याला ते कळले नसावे. त्याने चक्क ती काच बंद करुन टाकली. आम्ही हताश झालो.मामा काही थांबायला तयार नव्हते. तेवढ्यात चुलतबहिणीची ट्यूब पेटली आणि तीने पुढे चारचाकीत असलेल्या माझ्या नवऱ्याच्या भ्रमणध्वनीवर कॉल करण्यास सुचविले. नशिबाने भ्रमणध्वनीला रेंज होती. नवऱ्याला कॉल करुन त्याला परिस्थिती सांगितली. त्याने ताबडतोब मामाला टेंपो थांबविण्यास सांगितले. एकदाचा टेंपो थांबला.आत्तेभाऊ वेगाने खाली उतरला आणि बाजूच्याच 'सुदान' प्रदेशात धावत गेला. आम्हांला हायसे वाटले.

टेंपो पौड पर्यंत आला. आता ८ वाजले होते व रस्त्यावरही बऱ्यापैकी लोक होते. ते आमच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत होते. ९ पर्यंत मामाने टेंपो पुणे शहरात आणला. आम्ही सामान उतरवून घेतले.मामाला सगळ्यांनीच धन्यवाद दिले. त्यादिवशी सुट्टी घेतली नसल्याने मी घाईघाईत कचेरी गाठली. दिवसभर अंग दुखतच होते. सगळा किस्सा सांगितल्यावर मैत्रिणी हसू लागल्या. त्यांना सांगितले आज दिल चाहता है मधल्या सैफसारखे मी म्हणू शकेन "तुम्हे क्या लगता है मै रोज ऐसे तकीयेपे बैठती हूं??"