समाज

समाज (ज चा उच्चार 'जर्दा' तल्या ज सारखा) म्हणजे सर्वांनी केलेला माज (ज चा उच्चार 'जहाजा' तल्या ज सारखा). महाराज साभिनय तावा तावा ने बोलत होते .... अफाट जन सागर प्राणांचे कान करून ऐकत होता. माणसांचा कळप म्हणजे समाज.... माणसातून माणुसकी वजा केली की उरतो तो वन्य प्राणी..... ही माणुसकी वजा करावयाचे काम करतोय अहंकार आणि स्वार्थ.... संपत्ती, ऐश्वर्य म्हणजेच पैसा हा ह्या अहंकार आणि स्वार्थाच्या अग्नीचा कारक आणि क्षपणक आहे. 

चला ह्या अहंकार आणि स्वार्थाला आपल्या आयुष्य तून कायमचे वजा करून खरोखरचा मानव समाज घडवू या.... महाराज सकल जन समुदायाला डोळे मिटवून शपथ देतात.... महाराजांच्या जयजय कारात सार्वजनिक सत्संग समाप्त होतो. महाराज दोन्ही हात उंचावून जनसागराचा निरोप घेऊन शिष्यांच्या गराड्यातून मार्गक्रमण करत अंतस्थ खाजगी कक्षात प्रवेश करतात..... लगोलग वातानुकूलन यंत्रणा सुरू होते, आल्प्स पर्वतात बाटली बंद केलेल्या खनिज युक्त पाण्याचा थंड पेला महाराज रिचवतात, अती उंची रेशमाच्या तक्क्या आणि लोड ची रचना शरीरास आरामदायी करून आसनस्थ होतात. तत्परतेने एक शिष्य चरण सेवेस रुजू होतो.  

शीतल जला मध्ये गुलाब, वाळा, बदाम आणि खडीसाखर घालून केलेले खास सरबत महाराजांना अनोखा थंडावा देऊन जाते. महाराज नजरेनेच दालनाच्या प्रवेश द्वारा वर उभ्या असलेल्या शिष्यास 'अती महत्त्वाच्या व्यक्तींस' आत सोडण्याचा आदेश देतात.....

पंचतारांकित वाट पाहण्याच्या दालनात शुद्ध केशरी गंध लावून सपत्नीक, मित्रं बरोबर आणि शत्रूं बरोबर आलेल्या भक्तां मध्ये लगबग सुरू होते... देणगीची रक्कम आणि येणाऱ्याची "सामाजिक" आणि "राजकीय" पत बघून शिष्य गण ५ ते ३० मिनिटे वेळ देण्यात गर्क होतात.

'अती महत्त्वाच्या व्यक्ती' मिळालेल्या वेळाचा कसा सदउपयोग करून घेता येईल याची मानात जुळणी करण्यात निमग्न आहेत. भेटीची वेळ न मिळालेल्या 'अती महत्त्वाच्या व्यक्ती' आपले "पुण्य-अर्थ" कमी पडले असा विचार करत आणि पुढच्या वेळेस जास्त "पुण्य-अर्थ" संचय करून येण्याचा निर्धार करून, महाराजांच्या दालनाच्या सुवर्ण वर्खांकीत उंबऱ्याचे दर्शन घेऊन मार्गस्थ होतात......  

सेकंदाची मिनिटे आणि मिनिटाचे तास होतात, आजच्या दिवसाचा शेवटचा शिष्य महाराजांचा कृतकृत्य होऊन निरोप घेतो. महाराज आपल्या कॅरॅवॅन (मराठी शब्द माहीत नाही, आलिशान आणि अतिआरामदाई गाडी) मध्ये झोपून चालकाला आश्रमाकडे कुच करण्याचा आदेश देतात.  

विस्कटलेल्या बैठकी, उष्टे सरबताचे पेले, फराळाच्या बश्या आणि सुक्या मेव्याची टरफले साफ करताना त्या हरकाम्याच्या चेहऱ्यावर चे ते "पुण्य-अर्थ युक्त" प्रश्न चिह्न मला सत्संगातील बोधाची आठवण करून देत होते....  

(ही काल्पनिक कथा आहे. कुठल्याही मृत अथवा जिवंत अथवा होऊ घातलेल्या "महाराजांशी" आणि "समाजा"शी हिचा संबंध नाही. वाचकांना तसे वाटल्यास तो त्यांचा "कल्पना विलास" किंवा "वास्तवाचे भान" समजून लेखक नामानिराळा राहील.)

विनंती वजा आग्रहाची मागणी : हा माझा लिहिण्याचा पहिलाच 'पराक्रम' की 'केविलवाणा प्रयत्न', हे मला कळवा (प्रतिसादवा!).

तळटीप: लेखकाचे मराठी विषयाचे ज्ञान खूपच तुटपुंजे आहे. उण्यापुऱ्या ३८ वर्षाच्या वयात लेखकाने गेली २४ वर्ष मराठीत स्वतःचे नाव पण लिहिलेले नाही.

सध्याचे वास्तव्य: शांघाय, चीन.