नमस्कार मित्रहो,
अगदी लहानपणापासून मला दैनिके किंवा मासिकामधून छापून येणाऱ्या देशाटनाच्या आणि सफरीच्या गोष्टी वाचण्याची नितांत आवड होती. विशेषतः अमेरिका, युरोप..भरतामधील अनेक स्थळे हे म्हणजे माझे अत्यंत आवडीचे विषय. कधीकधी वाटायचे की मी ही असेच कुठेतरी जाऊन यावे आणि एखादा स्वानुभव सगळ्यासमोर विशद करावा.
ती वेळ आली, आज माझ्याजवळ जी काही प्रवासाची शिदोरी आहे, आज तुमच्यासमोर मोकळी करीत आहे, ती आपणास निश्चित आवडेल ही अपेक्षा.
दि. २०-११-२००६
नेहमीप्रमाणे सकाळी मी आवरून अगदी निराकारपणे ऑफिसला गडबडीने निघालो, कितीही लवकर उठलो तरीही ऑफिसला जाताना का एवढी गडबड होते कोणास ठाऊक ? पण होते. मला एकतर सोमवार असला की ऑफिसला येण्याचा जराही उत्साह नसतो, शिवाय सगळ्या गोष्टी अगदी रटाळपणे सुरू असल्याने मी सुद्धा थोडा कंटाळा करीत असतो.
दुपारी लंच पर्यंत सर्वकाही हळूहळू सुरू होते, लंच नंतर माझ्या मित्राने मला सांगितले की एक onsite apportunity आहे, आणि तुझे नाव संमत झाले आहे. मी थोडा थबकलो, मला लगेच पारपत्र घेऊन येणे गरजेचे होते, पण ते तर कोल्हापूरला घरी होते. युरोप पाहण्याची इतकी मोठी संधी चालून आली होती..मनातल्या मनात तर आनंदाला पारावर उरला नव्हता. सकाळी निराकार असणारा माझा चेहरा संध्याकाळी मात्र अगदी खुलून गेला होता, हे मात्र खरे.
दि. २१-११-२००६
काल रात्री उशीरा मी कोल्हापूरला येण्यास निघालो, सकाळी अचानक घरी उगवलो.̱ घरी ही बातमी आई, बाबांना सांगितली, लगेच दुपारी कॉलेजवर शिक्षकांना भेटावयास गेलो, काही जुने मित्र भेटले, खूप मजा आली. रात्री उशिरा पारपत्र घेऊन मुंबई करिता निघालो.
दि. २२-११-२२०६
आज पर्यंत मी जीवनात जे काही चांगले दिवस अनुभवले त्यामध्ये हा सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्याजोगा दिवस, माझा जन्मदिन, आणि आज तर स्वारी भलतीच खूश दिसत होती. सकाळी लवकर उठून मी शिवाजी पार्क च्या उद्यान गणेशाच्या दर्शनासाठी गेलो, आज उशीर झाला नाही, सगळे अगदी वेळेच्या १० मिनिटे अगोदर आटोपले, सगळ्या documents घेऊन मी ऑफिसमध्ये आलो, secretary कडे सगळ्या documents सुपूर्त करून मी माझा वाढदिवस साजरा करावयास लवकर गेलो. जाण्याची तारीख ठरली होती, ३ डिसेंबर. बापरे..!!!! अवघे १० दिवस हातात होते, सुदैवाने माझ्यासोबत अजून दोघे येणार होते. त्यामुळे एकटेपणा नसणार ह्या गोष्टीने समाधान झाले. आज secretary माझ्या विसा साठी अर्ज करणार होती, आणि विसा लगेच बनून येणार होता. मी तयारीला लागलो.
दि. २५-११-२००६
मी पहाटेचं उठून पुण्यासाठी निघालो, काका-काकू चुलतं भावंडे आणि मित्र-मैत्रिणी ना भेटायला. घरचे सगळेच खूश होते, मित्रांनाही फार आनंद झाला होता. माझ्या जवळच्या मित्राने मला प्रवासाची सूटकेस भेट दिली. शनिवार रविवार आप्तांना भेटण्यात गेले, बरेच बौद्धिक झाले, वागण्या-बोलण्यापासून ते अगदी परदेशी मुलीपर्यंत (काय आहे, मी सध्या उपवर आहे..)
दि. २८-११-२००६
मी कामात मग्न होतो, अचानक एक बातमी येऊन थबकली, नेदरलेंड सरकारने विसाचे काही नियम बदलले असल्याने विसा देण्याची प्रोसेस काही काळापुरती स्थगित करण्यात आली होती, हे ऐकून मन एकदम उदास झाले, गेले आठवडाभर मी ह्या स्वप्नात होतो की ह्या वेळेचा नाताळ मी युरोपमधे साजरा करेन, आणि पुन्हा एकदा रटाळ जीवन सुरू झाले.
दि. २९-१२-२००६
आम्हाला एक पत्र मिळाले, त्यामध्ये लिहिले होते, आमचा विसा मंजूर झाला आहे. आमचे तिकीट आम्हांस मिळाले. आणि खरेदीस पुन्हा जोर आला, ह्या वेळी मी कोल्हापूरला घरी जाऊन येण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे रजाही मंजूर करून घेतली. दोन दिवस कोल्हापूरात राहून आई-अंबाबाई चे दर्शन घेतले आणि मुंबईला परतलो.
दि. १७-०१-२००७
मी डच एंबसी मध्ये विसा घेण्यासाठी घेलो, माझा विसा तयार झाला होता. सुटकेस भरून तयार होती.
दि. २१-०१-२००७
आज रात्रौ ११:५० चे विमान होते. घरुन आई-बाबा, काका-काकू, भावंडे, मामा आणि बरेच आप्तेष्ट सोडायला आले होते. पाच पंचवीस मित्रांचा घोळका जमला होता... माझ्या आयुष्यातल्या पहिल्या-वाहिल्या विमानप्रवासासाठी मी बराच आतुर होतो. अखेर सगळ्या सुरक्षिततेच्या चाचण्या पार करून मी विमानामध्ये जाऊन बसलो... सागर मला भेटायला खास पुण्याहून आला होता पण त्या गडबडीत त्याची भेट होऊ शकली नाही.
मुळात विमानात बसायचा अनुभव नसल्याने, थोडं विचित्र वाटत होत..पण माझा आनंद गगनात मावत नव्हता. अखेर विमान सुरू झाले, क्षणातच मुंबई सोडून विमानाने आकाशात झेप घेतली, आणि आनंदाबरोबरच मन थोडंसं व्याकुळ झाले. ज्या मातृभूमीने आजपर्यंत माझी काळजी घेतली, मला फुलासारखं जपलं त्या मातृभूमीला डोळ्यात सामावून घेण्याचा तिचाच एक सुपुत्र केविलवाणा प्रयत्न करीत होता.
दि. २२-०१-२००७
युरोपमध्ये आगमन
ऑस्ट्रियाची राजधानी विएना हे आमचे पहिले ठिकाण होते, पहाटे ५ वाजता आम्ही तिथे पोहोचलो, दुसरे विमान साडेसात वाजता होते ते पकडले आणि अखेर सकाळी १०:०० वाजण्याचा सुमारास, शून्याखाली ५ डिग्री तापमानात मी चिफोल विमानतळावर उतरलो.
चिफोल हे हॉलंड मधलं सगळ्यात मोठं विमानतळ, झोंबणाऱ्या वाऱ्याची परवा न करता मी प्रचंड कुतूहलाने ह्या इवल्याश्या देशाचे अलौकिक सौंदर्य पाहण्यात मग्न होतो. वयाच्या २३ व्या वर्षी माझ्याजवळ अशी संधी चालून येईल असे मला जन्मातसुधा वाटले नव्हते. दुपारी एकच्या सुमारास मी एइनधोवेन ह्या माझ्या अंतिम स्थळी अगदी सुखरूप आलो. दुपारी चार वाजताच अंधार पडला, सगळं काही नवीन होते, माझ्या ऑफिस मधले बरेच ओळखीचे आणि अनोळखी मित्र इथे राहत होते, रात्री त्यांच्याकडे भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती, इथे म्हणजे सगळेच अगदी पट्टीचे स्वैपाकी, स्वयंपाक अगदी झकास झाला होता.
दुसरे दिवशी सकाळी नऊ वाजता आम्ही ऑफिस मध्ये आलो. एइनधोवेन ही होलेंड मधली पाचव्या क्रमांकाची मोठी सिटी. फिलिप्स ह्या जगद्विख्यात कंपनी चे हे माहेरघर. इथे जगातल्या बड्या बड्या कंपन्यांची ऑफिसेस आहेत. कंपनीने घर सुधा एकदम अध्ययावत असे दिले होते, इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली होती. जाताच मी एक सायकल विकत घेतली, इथे सायकलसाठी वेगळे रस्ते, वेगळे सिग्नल अशी सरबरात होती. रोज आठ किलोमीटर सायकलिंग होऊ लागले. खुपा मजा येऊ लागली, मी स्वयंपाक छानच करायचो(माझ्या मित्रांनी दिलेली शाबासकी आहे), आम्ही मग सगळे मित्र एकत्र जेवत असू, ऑफिसमध्ये सुधा प्रत्येकाचे डबे आणि प्रत्येकाच्या हाताची चव ह्याच्या मिश्रणातून एक वेगळीच भारतीय चव तयार होत असे.
पहिले काही दिवस मजेत गेले आणि मी आठवड्याच्या सुट्टीचे प्लॅनिंग करू लागलो.
क्रमशः