विकी आणि वेताळु (भाग १)

वेताळुने विकिला पाठकुळी टाकले आणि तो वाळलेल्या पानांवरून आपल्या अणुकुचीदार वहाणा मधून कर कर आवाज करत अमावास्येच्या रात्री जंगला मधून चालत चालत निघाला... विकीने आपली ५५५ वेताळाच्या टकला वारूनं काडी पेटवून शिलगावली. वेताळाने गुटख्याचा तोबरा भरला.

त्या अमावास्येच्या नीरव शांततेत दोघेही मजेत सारस बागेत फिरल्या प्रमाणे चालले होते.... गुटख्याची खणखणीत पिचकारी मारून वेताळु बोलू लागला : विकी नेहमी प्रमाणे मी तुला गोष्ट सांगणार आणि प्रश्न विचारणार, तू जर धासू उत्तर नाही दिलेस तर तुला आसेच पाठकुळी वेताळु नगरीत नेऊन तुझा वेताळु सम्राट म्हणून राज्याभिषेक करणार. तू जर थोबाड उघडून आपले राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचे ज्ञान पाजळवलेस तर मी तुझ्याशी मांडवली करून तुझी सुटका करणार..

विकी तुझ्या सारखा राजा ह्या साठमारीच्या जमान्यात होणे शक्य नाही. जग लोकशाही कडे वळत आहे, जगात मोठी सत्तांतरे होत आहेत, रशियाची हवा पंक्चर झाली, अजून बरेच काही बऱ्याचं ठिकाणी होत आहे, तरीसुद्धा जग म्हणते 'खरी लोकशाही विकीच्याच राजेशाहीत', ते तुला हुकूमशहा पण म्हणत नाहीत. तुझे नाव खूपच आदराने घेतात. तुझ्यावर ना भ्रष्टाचाराचे आरोप ना तू ह्या (पहिले बोट नाकाला लावून) लफड्यात.

मला आठवते तू गेल्या ३१ डीसें. च्या पार्टीत दूरदृष्टीने लोकशाही पद्धत अवलंबण्याचा पुन्उच्चार केला होतास, मंत्रिमंडळाने ठाम विरोध करून सुद्धा तू जनसामान्यांचे मत जाणून घेण्या करता ओपिनियन पोल घेतलास, आम जनतेने लोकशाहीची बालूशाही आशी हेटाळणी करून तुझ्याच राजेशाहीचा पाठपुरावा केला. तुझी गयावया वाया गेली, तू चक्क जाहीर सभेत रडलास, जनता जनार्धानाला काकुळतीची विनंती केलीस की मला ह्या जबाबदारीतून मुक्त करा, वयोमाना नुसार मला हे आता झेपत नाही, पण तुला कोणीही बधले नाही, हं तुझी एक विनंती मात्र तुझ्या जनतेने मान्य केली, तुझ्या मृत्यू नंतर निवडणुका घेऊन लोकशाही स्थापन करण्याची, तू पण असा चालू की तापल्या तव्यावर अजून एक पोळी भाजून घेतली आणि वचन घेतलेस की तुझ्या परिवारातले निवडणूकीत भाग घेणार नाहीत, सरकारात 'मलईदार' पदे घेणार नाहीत, अरे ते जाऊ देत 'फूल ऐष वाले' राज्यपाल किंवा शिक्का मरावयाचे राष्ट्रपती पद पण घेणार नही म्हणून.

आपण म्हणूनच तुझ्यावर लई फिदा आहे बघ.... आमच्या भूत नगरी वर राज्य करायला तुझ्या इतका लायक राजा नाही, म्हणूनच तर तुझा बोजा उचलून घेऊन जायची झकमारी करतोय...

वेताळू गुटखा चावून पचा पचा थुंकत विकीची स्तुती करत होता, विकी आपल्या ५५५ चे झुरके घेत, वेतळुच्या स्तुती सुमनांकडे दुर्लक्ष करत त्याच्या राज्यात काही धोरणात्मक निर्णय घेण्या विषयीच्या विचारात गढून गेला होता....

वेताळुला समोर पिंपळाचे झाड दिसते आणि त्याची चार घोट लावायची इच्छा अनावर होते. तो विकी ला म्हणतो, चल जरा झाडा खाली श्रम-परिहार करू. विकीच्या प्रतिक्रियेची वाट न बघता तो तातडीने मोबाईल वर आपल्या असिसटंटला हुकूम सोडतो....

सीन असा आहे, काजव्यांच्या प्रकाशात पिंपळाखाली बगीच्यातल्या खुर्च्यांवर दोघे एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत. समोरच्या टेबलावरचा सरंजाम व्यवस्थित आहे याची खात्री करून वेतळु आपल्या असिसटंटला फुटण्याची आज्ञा मानेनेच देतो.

विकी आपल्या लाडक्या 'जॅक डॅनिअल्स' सिंगल माल्ट स्कॉच चा गावरान पेग शाही ग्लासात ओततो, तीन चंदेरी बर्फाचे तुकडे किणकिणतं ग्लासाच्या तळात विराजमान होतात. सोनेरी व्हिस्की आणि चंदेरी बर्फाचे तुकडे यांचे अद्भुत मिश्रण बघून विकीची कळी खुलते. खारवलेला एक काजू तोंडात टाकून विकी वेताळु कडे बघतो. वेताळुची स्वारी आपल्या पाहिल्या धारेचा देशीचा फुगा उघडून प्लॅस्टिकच्या ग्लासात ओतून, मुठीत चणे फुटाणे आणि जिभेवर चाटवायच्या मिठाच्या खड्याला घेऊन तयार असते. स्कॉचचा आणि थर्याचा चषक एकमेकांना भिडतात आणि 'चांगभलं' च्या जयघोषात श्रम परिहाराला सुरुवात होते.....

विकी आपली लाडकी ५५५ ओठात ठेवतो, वेताळु तत्परतेने तिला आग लावतो आणि त्याच काडीने आपल्या १७६० छाप बिडीला चेतवतो. एक जोराचा झुरका घेऊन राख चुटकीने झटकत आपल्या भसाड्या आवाजात गोष्ट सांगायला सुरुवात करतो....

विकी लक्ष देऊन एक माझ्या गोष्टीचे नाव आहे 'आरक्षणे आणि धर्मांतरे'...

(पुढचा भाग लवकरच येत आहे...... )