वसंत बापट- १

वसंत बापट- काव्यविश्व व माझी निवड

मराठी बाण्याचा आणि मराठमोळ्या वातावरणाचा जय जयकार करणारी  "केवळ माझा सह्यकडा" ही वसंत बापट ह्यांची "सेतू" ह्या काव्यसंग्रहातील एक लोकप्रिय कविता. मराठमोळ्या मृत्तिकेचा सुगंध आणि वसंत बापट यांचा मराठी बाणा ह्या कवितेतून प्रकट झाला आहे. गेयता, अर्थ आणि ओघवतेपणा ह्या सर्व अंगाने ही कविता सरस आहे आणि म्हणूनच ती मला आवडते.  या कवितेतील सुरुवातीच्या ओळी अशा आहेत....

भव्य हिमालय तुमचा अमुचा , केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
तुमच्या अमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिंवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ ,प्यार मला छाती  निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला

ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते ,तुकयाचा आधार मला

                          एकाच कवीचे  काव्य घेतले तरी प्रत्येकाची आवड निवड वेगळी असेल याची मला जाणीव आहे. या लेखात मला आवडलेल्या वसंत बापट ह्यांच्या काही कविता इथे देते आहे. आम्हाला शालेय अभ्यासक्रमात वसंत बापट ह्यांच्या खूप कविता नव्हत्या पण ज्या होत्या त्या मला आवडल्या होत्या. 'दख्खनची राणी' ही त्यांची मला अगदी लहान असल्यापासून आवडणारी एक कविता. 

पाडगावकर ,करंदीकर आणि बापट ह्यांचे काही कविता संग्रह  वाचले तेव्हा त्यांनी कित्येक वर्षापूर्वी लिहिलेल्या कविता आजही वाचव्याशा वाटतात ही जाणीव प्रकर्षाने झाली.  या तिघांच्याही कवितांमध्ये एका विशिष्ट काळाचा ठसा दिसून येतो.   महाराष्ट्रात एक पिढी अशी होती की ती  मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर हयांच्या  काव्याने भारली होती ह्यात काही नवल नाही.   भावगीते, आधुनिक कविता, वृत्तबद्ध काव्य असे सर्व प्रकार पाड्गावकर, बापट आणि करंदीकर या तिघांनी समर्थपणे हाताळले होते. त्यांच्या कविता वाचल्यावर या तिघांमधील प्रत्येक कवीचे बाह्य जीवन, भावविश्व , जीवन दृष्टी आणि सौदर्यकल्पना यात फरक होता अशी जाणीव मला झाली.

दीर्घ कविता, कवितांना असणारी लय, संस्कृतचा प्रभाव असणारी शब्दसंपन्न भाषा, विषयांची विविधता हे माझ्या दृष्टीने वसंत बापट ह्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. मी बापटांचे सर्व काव्यसंग्रह वाचले नाहीत, त्यामुळे हा आढावा किंवा निवड परीपूर्ण आहे असे नाही पण ह्याच निमित्याने बापटांच्या कवितांवर मनोगतींमध्ये चर्चा आणि मतांची देवाण घेवाण व्हावयास हरकत नाही.

काव्यविषयक भूमिका
आपली साहित्यविषयक आणि विशेषतः काव्यविषयक भूमिका स्पष्ट करताना वसंत बापट म्हणतात ,"अनुभूतिशी प्रामाणिक राहण्याचे खडतर तप प्रत्येक कवीने केले पाहिजे.  नादमाधुर्याने भरलेल्या छंदबद्ध कवितांपासून राजकीय आणि सामाजिक जाणिवेच्या कविता अशा विविध अवस्थातून जात असताना प्रत्येक कवी, जर आपल्या अनुभूतिशी प्रामणिक राहिला तरच त्या कविता चिरकाल टिकतील अन्यथा त्या निर्मितीचा फोलपणा लवकरच सिद्ध होईल. " ह्या जाणीवपूर्वक बदलांचा प्रत्यय बापटांच्या लेखनात आल्याशिवाय राहत नाही.

काव्यविश्व

 १९५२ साली वसंत बापट ह्यांचा "बिजली" हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. " बिजली" ह्या काव्यसंग्रहानंतर  सृजनाचा हा ओघ  सेतू, अकरावी दिशा, सकिना, मानसी, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले रणी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी, रसिया आणि शततारका असा एकामागून एक  बरसत राहिला;  मराठी मनाला स्पर्श करणाऱ्या अनेक हळुवार, ओघवत्या माधुर्याने भरलेल्या कविता देत राहिला.  एवढेच नाही तर  वसंत बापटांनी ज्या उपहासात्मक, जळजळीत आणि परिस्थितीवर हल्ला करणाऱ्या पण विषयांचे वैविध्य असणाऱ्या कविता लिहिल्या त्या वाचल्यावर त्यांच्यातील एका डोळस नागरिकाचे दर्शन नक्कीच होते.

लहान मुलामध्ये मूल होऊन जगण्याची कला वसंत बापट ह्यांना नक्कीच अवगत असावी.  फुलराणीच्या कविता, फिरकी, आम्ही, गरगर गिरकी, अबडक तबडक , गिरगिर गिरकी ही त्यांच्या सहा बालकविता संग्रहाची नावे आहेत.

"सेतू" आणि "बाभुळझाड" ह्या दोन्ही कवितात वसंत बापट ह्यांच्या शैलीत आणि स्वतःच्या कवितेविषयीच्या जाणिवेत बापटांना झालेला बदल नक्कीच जाणवतो. त्यापैकी बाभूळझाड कविता इथे टंकित करते आहे.  बापटांनी बाभूळझाड या कवितेत  वृद्ध अशा पण खंबीर  व्यक्तीचे रूपकात्मक चित्रण खूप छान केले आहे असे मला वाटले.

बाभुळझाड
अस्सल लाकूड भक्कम झाड
ताठर कणा टणक पाटः
वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे

देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे बाभुळझाड उभेच आहे

अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेच आहे

जगले आहे जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांद्यावरती सुताराचे घरटे घेउन उभेच आहे

टक टक टक टक
चिटर फटर चिटर फटक
सुतारपक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे शोषत आहे

आठवते ते भलते आहे
उरात माझ्या सलते आहे
आत काही कळते आहे आत फार जळते आहे

अस्स्ल लाकूड भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे

वसंत बापट यांच्या ज्या कविता मनोगतींना आवडत असतील त्या इथे जरूर लिहा.  माझ्यासारख्या परदेशात राहणाऱ्यांना माहितीजाळ्यावर जर आवडत्या साहित्यकाविषयी वाचायला मिळाले तर त्याचा आनंद शब्दापार असतो. कित्यकदा एखाद्या साहित्यकाची काही  पुस्तके/ कविता/ कथा ठराविक कालखंडात अधिक लोकप्रिय असतात. वसंत बापटांच्या काही कविता भारत चीन युद्धकाळात लोकप्रिय होत्या.  काही लोकप्रिय कविता मला वाचायला मिळाल्या नाहीत म्हणून त्यांचा उल्लेख राहिला असेल तर त्या सुद्धा जरुर मनोगतीनी लिहा अशी विनंती.  बापटांनी लिहिलेली काही गीते आठवणीतली गाणी या संकेतस्थळावर वाचता येतील.