वसंत बापट - ४

वसंत बापट- साहित्याचा आढावा

वसंत बापट ह्यांनी काव्याबरोबर इतर साहित्यप्रकारांचेही लेखन केले आहे.  त्याची उदाहरणे म्हणजे:

"परीच्या राज्यात" हे त्यांचे बाल नृत्य नाट्य. तर "बारा गावच पाणी,' 'अहा देश कसा',आणि गोष्टी देशांतराच्या ही वसंत बापटांची प्रवासचित्रे. "ताणे बाणे" हे त्यांचे ललित गद्य . वसंत बापट ह्यांनी  "जिंकुनि मरणाला "हे व्यक्तिदर्शन ही लिहिले आहे.

'बारा गावच पाणी' या प्रवासवर्णनातील  परिच्छेद-

कुठे आहे मनाली?काश्मीरच्या आग्नेयेला, पंजाबच्या उत्तरेला हिमालयाच्या कुशीत. केवढी आहे मनाली? खेड्याहून मोठी आहे. शहराहून छोटी आहे. अटकर आहे. 'सुशीलेचे परि बाल्य सरत आले' एवढी आहे.कशी आहे मनाली? ती आहे  मनालीसारखी! झोपेत चालणारी, झोपेत बोलणारी, झोपेत सफरचंदी स्वप्ने पाहणारी, नव्या जगाकडे, जमान्याकडे अर्ध उघड्या तिरप्या नजरेने बघणारी प्रमिला! मनालीला कुणी जावे? ज्यांचे हिशेब नेहमी चुकतात, ज्यांची घड्याळे हरवलेली असतात, जे यंत्रातून बाहेर घऱंगळतात, 'सुटी निवांतपणे घालवायची आहे ' हे बँड लावून ज्यांना जायचे नसते, प्रकाशझोतांनी चुरचुरणारे डोळे ज्यांना निववायचे असतात, हिमालयात ज्यांना चौपाटी भरवायची नसते त्यांनी निमूटपणे जावे मनालीकडे. ती या किरकिऱ्या बाळांना थोपटीत अंगाई म्हणेल.

 कुलू आणि लाहोल खोऱ्यात अडसर म्हणून हिमालयाने  आपली एक टांग टाकून दिली आहे. ही टांग ओलांडल्याशिवाय दोन्ही खोऱ्यातील मंडळी एकमेकांना भेटणार कशी?ही टांग ओलांडायची असते त्या जागेलाच नाव आहे रोहटांग! चौदा हजार फूट उंचीवरील ही खिंड हाच कुलू आणि लाहोलमधील दरवाजा. थेट तिबेटपासून निघालेले सौदागर आपली खेचरे घेऊन याच मार्गाने पोचतात कुलू खोऱ्यापर्यंत.  पण रोहटांग उतरून आल्यावर अवघ्या पाच कोसांवर सौदागर थबकतात. कारण इथे आहे मनाली. उंच उंच देवदारू, फर, भूर्ज असल्या जबरदस्त वृक्षराजांच्या पहाऱ्यात मनाली राहते. ती आपल्याच तंद्रीत असते. त्यामुळे सारे सौदागर आणि मुलखावेगळे मुशाफिर तिला मनसोक्त पाहू शकतात. 

या लेखनातून त्यांची वर्णन करण्याची एक विशिष्ट हातोटी लक्षात येते. गद्य लेखनातही एक आगळी लय आहे ते वाचकांना प्रकर्षाने जाणवते.

वसंत बापटांची कवितेची एक आगळी शैली आहे तसेच गद्य लेखनाची सुद्धा. त्याचा प्रत्यय प्रवासवर्णन वाचतांना नक्की येतो.

बारा गावच पाणी या प्रवासवर्णनातील आणखी एक लेख आहे जयपूर या शहरावर. त्यामधील परिच्छेद -

जनानी जयपुरी
राजा जयसिंगाला सन सत्राशे सत्ताविसात एक स्वप्न पडले. खूप दीर्घ स्वप्न . प्रशस्त स्वप्न.  त्याचा आरंभ झाला तेव्हा आकाशात नक्षत्रांचा खच पडला होता. ते संपले तेव्हा अरुणाची झळाळी आभाळभर पसरली होती. जयसिंग जागा झाला आणि कामाला लागला. एक सुंदर स्वप्नाला कायम चिरेबंद करणे हे काम सोपे नव्हे, लहानसहान नव्हे. पण जयसिंगाने ते करून टाकले.  काम संपले, त्या वेळी जयपूर नावाचे एक महानगर अवतरले.

वाळूच्याच रंगाचा एक मोठा कागद जयसिंगासमोर होता. तो वाऱ्याने फडफडू नये म्हणून त्याने चौतर्फा कंकर ठेवले. मग हलक्या हाताने त्याने एक चौकोन रेखला; त्या चौकोनाच्या रेषांना  आठ ठिकाणी व्यवस्थित छेद दिला. मग या आठ ठिकाणाहून निघणाऱ्या आडव्या उभ्या पट्ट्यांचा एक पटच त्याने तयार केला.  त्याच्यावर इथे आणि  तिथे रत्ने मांडून झाल्यावर त्याने आपल्या प्रधानाला, पुरोहिताला, सेनापतीला, खजिनदाराला बोलावून घेतले. .....

हे सर्व वाचतांना या घटना आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असे वाटत नाही का?किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींची प्रभावी मांडणी आणि कल्पनाविलास ही बापटांच्या गद्य लेखनाचीही वैशिष्ट्ये आहेत.
१७ सप्टेंबर २००२ रोजी वसंत बापट ह्यांचे पुणे येथे निधन झाले. पण विविध विषयांच्या गेय, विविध प्रगल्भ कवितांनी आणि आपल्या लेखनाने  त्यांनी मराठी कवितेला, मराठी साहित्याला जे योगदान दिले आहे ते मात्र कायम लक्षात राहील असेच आहे.