करामती बालके

वर्तमानपत्रात एकाच दिवशी सहा भारतीय बालकांनी वेगवेगळ्या करामती केलेल्या वाचून ऊर अभिमानाने भरून आला.
१) बिहारमधील कटिहार येथे आठ वर्षाच्या बालकावर तीन मुलांचा खून केल्याबद्दल खटला
२) तेथेच सहा वर्षाच्या मुलावर विनयभंगाचा आरोप.
३)आता तर दोन वर्षाच्या मुलावर दंगा करून पोलिसांवरच गोळीबार केल्याचा आरोप ( त्याच्या पिस्तुलाच्या धाकाने?) अजून त्याला पकडण्यात यश आलेले नाही.त्या मुलाला आईच्या बोटाला धरूनच उभे रहावे लागते.( तरीही हे धाडस ?)
४) पाच वर्षाच्या संतोषवर मेव्हण्याला हुंड्यासाठी धाक दाखवण्याचा आरोप
५) या बातमीवर तर विश्वास ठेवणेच कठिण जाते
   तीन महिन्याच्या बालकावर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल,
या बातम्या देऊन हे बिहारमध्येच घडू शकते अशी पुस्ती जोडण्यात आली आहे. ह्या बातम्या सांजवार्तासारख्या खळबळजनक गमती छापणाऱ्या वृत्तपत्रातील नसून टाइम्स ऑफ इंडिया सारख्या भारदस्त वर्तमानपत्रातील आहेत.
पण दक्षिणेतील एक बालकही काही कमी नाही त्याने तर गिनीच्या जागतिक विक्रम पुस्तकात नाव नोंदण्याच्या त्याच्या पालकांच्या हौशीसाठी वयाच्या पंधराव्या व्रर्षी एका गर्भवतीची सीझेरियन शस्त्रक्रिया करण्याचे धाडस केले.तमिळनाडूतील त्रिची जिल्ह्यातील डॉ. मुरुगेसन आणि डॉ. गंधमती यांचा सुपुत्र दिलीप राजन् याने हा पराक्रम केला. 
सुनिता विल्यम्स भारतीय वंशाची असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो मग ही तर सर्व मुले अस्सल भारतीयच आहेत  केवढी अभिमानाची गोष्ट !