दोन तज्ञ एक अज्ञ आणि एक विशेषज्ञ

अवघड काम करण्यासाठी तज्ञाकडे जावे असे म्हणतात यात थोडा बदल केल्यास हेच वाक्य काम अवघड करण्यासाठी तज्ञाकडे जावे असेवाचता येईल.या प्रकारचा एक अनुभव केवळ गम्मत म्हणून वाचावा

     जागतिकीकरणामुळे पैसा टाकला की चुटकीसरशी सर्व सुखे हात जोडून उभी असतात हे खरेच आहे पण माझ्यासारख्या टंचाईग्रस्त काळात आयुष्याचा बराच काळ घालवलेल्या माणसाला त्यामुळे जीवन फारच गुंतागुंतीचे झाल्यासारखे वाटते. त्याचमुळे फार पूर्वी बांधलेल्या घराला रंग द्यायचा प्रश्न उपस्थित झाल्यावर त्यासाठी जगातील रंगांच्या संख्येइतके पर्याय उपलब्ध असल्याने निवडीस म्हणजे माझ्या आणि माझ्या पत्नीच्या म्हणजे सुमतीच्या वादविवादास अमर्याद वाव होता.त्यातच भर म्हणून तिचा बंधु विद्याधर ऊर्फ बाबू आमच्याच शहरात रहात
        असल्यामुळे या विषयावर त्रिसदस्य समिती तयार होऊन चर्चा होणे हे ओघाने आलेच.बाबू स्वत: स चित्रकार समजत असल्याने या समितीत तो तज्ञ सभासद म्हणूनच काम करणार हेही उघडच होते.  रंग देण्याचा प्रश्न उपस्थित होताच आपल्याला या संकटाला तोंड द्यावे लागणार याची पूर्वकल्पना त्यामुळे मला होतीच. आणि रंगाचा विषय निघताच सुमतीने आपल्या लाडक्या बंधुराजाना दूरध्वनी वरून आवाहन करताच द्रौपदीच्या मदतीला श्रीकृष्णाने धावत यावे तसाच बाबूही उड्या मारत येईल अशी माझी कल्पना होती.पण त्यादिवशी माझे ग्रह उच्चीचे असावेत,कारण तिच्या निमंत्रणावर आपला चेहरा दु:खी करत (अंदाज माझा)तो म्हणाला ," माफ कर सुमती,पण मला सिंगलिंग आर्ट गॅलरीत सुमाटो आकाबाकाचे ऍबस्ट्रॅक्ट आर्ट एक्झिबिशन पहायला जायचय " हे ऐकून जो कोणी आकाबाका होता तो नकानका म्हणाला तरी त्याच्या पाया पडाव अस मला वाटू लागल तरीही सुमतीला खट्टू झालेले पाहून तिला बरे वाटावे म्हणून तरी आपण बाबूला विनंती करावी नाहीतरी आता बाबू येणारच नाही तर आपणही बोलून तिला दिलासा द्यायला काय हरकत आहे या सुविचाराने प्रेरित होऊन मी म्हणालो,"काय हे बाबू आपल्या बहिणीपेक्षा तो सुमाटो की टमाटो त्याची चित्र पहाण तुला महत्त्वाच वाटाव ना ?"आणि मग मात्र आपल्याला अशी दुर्बुद्धी सुचल्याचा मला पश्चाताप झाला कारण माझे बोलणे ऐकताच बाबूचा चेहरा एकदम उजळला आणि तो म्हणाला," आता अप्पासाहेब,तुम्ही अस म्हटल्यावर माझा नाइलाज झाला मी रविवारी सकाळीच येतोय"
       अशा रीतीने चांगली बसलेली पाचर काढून आपली शेपटी अडकवून घेणाऱ्या माकडाची हुषारी दाखवून मी हळहळत बसलो.सुदैवाने आम्ही तिघेजणच असल्यामुळे तीनच रंगांपैकी कुठलातरी एक निवडावा लागेल अशी स्वत:ची गोड समजूत करण्याच्या प्रयत्नात मी असतानाच वादळासारखा रविवारी सकाळी बाबू घरात शिरला आणि म्हणाला "चला "
"कुठे" आश्चर्याने आ वासून मी म्हणालो.कारण रंगचर्चा सुरू होताच मी पिवळा किंवा हिरवा अस काहीतरी बोलू लागताच सुमती ईऽऽऽ पिवळा (अगर हिरवा ? खर म्हणजे मी कोणत्याही रंगाचे नाव काढले असते तरी तिची प्रतिक्रिया ही अशीच असणार होती)अस विंचू चावावा अशा सुरात ओरडणार .त्यावर हे आकाशातील बापा आता या पाप्याला तूच क्षमा कर असा जो भाव ख्रिस्ती धर्मोपदेशक आपल्या चेहऱ्यावर आणतात तोच आणून बाबू " अप्पासाहेब,तुम्हाला नाही कळायच त्यातल काही,आपण सरळ यलोइश सिल्वर्ड कलर भिंतीच्या वरच्या भागाला,सोक्टर्ड तेडार्ड खिडक्याना,लेथर्स फिटशॉ दाराना आणि फेंट सेलॉसो भिंतींच्या खालच्या भागाला देऊ" अस मला अजिबात न समजणाऱ्या नावाचे रंग उधळणार ( त्यावेळी सुमती आपल्या भावाच्या रंगज्ञानाने दिपून त्याला कुठे ठेऊ आणि नको अशा भाविक मुद्रेने त्याच्याकडे बघणार असा नेहमीच्या अनुभवावर आधारित तर्क मी केला होता पण तो खोटा ठरल्यामुळे फाउस्टला सैतानाऐवजी देवाचे दूत नरकाऐवजी स्वर्गात न्यावयास आल्यावर आश्चर्याचा जेवढा धक्का बसला नसेल तेवढा मला बसला
"कुठ म्हणजे कलर कॉर्नर मध्ये " अगदी सहजतेने बाबू म्हणाला.
'पण तरी निघण्यापूर्वी रंग कुठले द्यायचे हे ठरवलेले बरे नाही का " अस म्हणून पारड माझ्या बाजूने वळवण्याचा दुबळा प्रयत्न मी केला  अर्थात दुकानाबाहेर घेतलेल्या निर्णयामुळे खरेदी सुलभ होणार होती अशातला भाग नव्हताच.कारण यापूर्वीही एक साधी कॉटन साडी आणि त्यावर मॅचिंग टू बाय टू ब्लाउज पीस घ्यवयाचे ठरवून दुकानात शिरल्यावर सुमतीच देहभान हरपून जात असे आणि बाहेर पडताना फक्त एक मलई सिल्क,एक विपुल किंवा पराग किंवा अशाच नावाची साडी,एकादीच कांजीवरम,एकादी गार्डन सिल्क अशा थोड्याच साड्या केवळ दुकानदाराला बरे वाटावे म्हणून खरेदी करूनच ती बाहेर पडत असते शिवाय साड्यामध्येच ब्लाउजपीसेस असल्यामुळे बरेच पैसे आपण वाचवल्याचे मला सुनावल्याशिवाय ती रहात नसे. हा माझा नेहमीचा अनुभव.तरीही संवयीप्रमाणे ( जसा सहवाग बाहेर जाणाऱ्या बॉलला उगीचच बॅट लावून औट होतो) मी बोलून गेलो आणि त्यावर त्या दोघांची प्रतिक्रिया काय होते पहात राहिलो."अप्पासाहेब,अहो रंग देण म्हणजे एक शास्त्र आहे." आपली प्रतिक्रिया नोंदवीत बाबू म्हणाला.
"त्यात कसल आल आहे शास्त्र ? पाण्यात अगर तेलात रंग मिसळायचे आणि ते भिंतीवर चोपडायचे यात कसले शास्त्र?" मी जोरदार विरोध करण्याचा क्षीण प्रयत्न केला.यावर अरसिकेषु कवित्वनिवेदनं शिरसि मा लिख मा लिख मा लिख म्हणणाऱ्या कवीच्याच थाटात बाबू माझ्याकडे कीव भरला दृष्टिक्षेप टाकत म्हणाला,"अप्पासाहेब,काय हे उद्या तुम्ही पेंटिंगबद्दलही असच म्हणाल."यावर मी गप्प थोडाच बसतोय, ,"नाहीतरी हल्ली पेंटिंग ही त्याहून सोपी गोष्ट झाली आहे" मी तावातावाने बोलू लागलो,"अंगाला रंग चोपडून कापड वा कागदावर गडबडा लोळले की झाले पेंटिंग मग बसा अर्थ लावत त्याचा.मागे एका प्रदर्शनात तर म्हणे कुत्र्याच्या शेपटीला रंग लावून त्या कुत्र्यालाच तिचे फटकारे कॅनव्हासवर मारायला लावून तयार झालेल्या ऑइलला म्हणे पहिले बक्षिस मिळाले"आणखीही मी बरेच बोलण्याच्या विचारात होतो पण आपल्या भावाचा असा मामा केलेला कोणत्या बायकोला आवडणार त्यामुळे" अहो ते राहू द्या तुमच सामान्यज्ञान किती आहे ते आहे माहीत आम्हाला .तो भिंतीला रंग देण्याविषयी काय म्हणतोय ते ऐका."असा फटकारा मारत सुमतीने मला भानावर आणले.   सुमतीचा भरभक्कम पाठिंबा असल्याने बाबूने माझे म्हणणे मुळीच मनावर न घेता आपले रंगविश्लेषण तेवढ्याच उत्साहाने चालू ठेवले सुदैवाने हिमालय कलर कार्पोरेशन तेवढ्यात आल्यामुळे तो मारा टाळणे शक्य झाले.
      हिमालय कलर कॉर्पोरेशन हे रंगाचे दुकान न वाटता एकाद्या बहुराष्ट्रीय कंपनीचे कार्यालय असावे असा भास होत होता. आहीतर पूर्वी कस दुकानात शिरण्यापूर्वीच रंगांच्या पेटाऱ्यांच आणि त्यातून डोकावणाऱ्या रंगांच दर्शन घडायच.दुकानात शिरेपर्यंत गिऱ्हाइकाच्या डोक्यात आपल्याला कोणता रंग हवा आहे याचा गजर होऊ लागे आणि दुकानात शिरल्याशिरल्या दुकानाच्या मालकाला हव्या त्या डब्याकडे बोट दाखवून," मालक हा रंग पाहिजे आम्हाला"असा खुल्लमखुल्ला कारभार असे.इथे तर रंगाचा मागमूसही नव्हता तर अशा परिस्थितीत रंगचर्चा कशी होणार अशी चिंता मला वाटू लागली.आम्ही दुकानात शिरताच एका अत्याधुनिक पोषाक केलेल्या माणसाने 'गुड मॉर्निंग साहेब"म्हणून दंतपंक्ती दाखवत आमचे स्वागत केले त्यामुळे मला धीर आला.
          आमच्या मोहिमेच्या नैतृत्वाची धुरा बाबूने सांभाळली असल्याने भिंतीला लावायचे रंग दाखवण्याचा हुकूम हा आता त्याच्या शास्त्रीय परिभाषेत कसा फर्मावतोय हे पहाण्यास मी उत्सुक होतो.पण ' भिंतीचे रंग आहेत का हो ?" असा लाडिक पण अगदीच अशास्त्रीय भाषेत विचारून सुमतीने माझ्या उत्सुकतेच्या त्या फुग्याला टाचणी लावली.
           पण प्रश्न जरी अशास्त्रीय भाषेत विचारला गेला असला तरी उत्तर देणारा मात्र महान शास्त्री निघाला."थांबा थांबा अशी घाई करू नका बाईसाहेब,"टाय लावलेला माणूस मराठी आणि ते आमच्यापेक्षाही बरे बोलत होता हे पाहून मला आनंद आणि आश्चर्य वाटले.कारण हल्ली लंडनमध्ये मराठी ऐकायला मिळण्याइतकेच महाराष्ट्रात कॉस्मोपॉलिटन शहरातील अशा अद्यावत दुकानात मराठी ऐकायला मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे मी माझे रोखठोक मत आपल्या शुद्ध मायबोलीत व्यक्त केले," मी सांगतो,आमच्या घराच्या भिंतींना निळा रंग द्यायचा आहे."
          मी असे बोललो मात्र,एकदम व्याधाच्या बाणाने विद्ध झालेल्या हरिणीसारखा चेहरा करीत तो म्हणाला," कोणताही निर्णय येवढ्या घाईघाईने घेणे योग्य नव्हे साहेब,आणि त्यात तर हा रंग देण्यासारखा महत्त्वाचा निर्णय !"  रंग देण हा कावेरी पाणीवाटपाइतका किंवा त्याहूनही अधिक गहन प्रश्न असावा असे त्याच्या स्वरावरून मला वाटू लागले.
" कारण आपण दिलेल्या रंगावरून आपली आणि बाईसाहेबांची अभिरुची व्यक्त होणार. उद्या बाईसाहेबांच्या मैत्रिणी घरात येणार आणि भिंतीना निळा रंग दिलेला पाहून त्याना काय वाटेल?"शहाजीराजाना आदिलशहाने कैदेत टाकले हे मासाहेबाना कळले तर त्याना काय वाटेल हा प्रश्नही शिवाजी राजाना येवढा गंभीर वाटला नसेल
"त्यांच काही ऐकू नका हो तुम्हीच सांगा काय करायचे ते "सुमतीने चहातून माशी बाहेर काढावी यसे संभाषणातून मला बाहेर काढत म्हटले.
" इटस व्हेरी सिंपल ' मृदु हास्याची कमाल करत टायवाला म्हणाला "त्या बाबतीत आमचे रंगतज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतील" आणि एका नोकराला त्याने हुकुम सोडला," अरे.वाकणकराना पाठवून दे बर "
      वाकणकरांच्या कपड्यांचे रंग पाहून ते रंगांध असावेत असाच माझा ग्रह झाला पण तज्ञ आणि अज्ञ यातील फरक हाच असावा.त्यांची ओळख टायवाल्याने करून दिली,"मीट आवर कलर एक्स्पर्ट वाकणकर ,नुकतेच ते कलर मॅचिंग या विषयाचा शास्त्रीय अभ्यास पूर्ण करून  फ्रान्समधून परत आलेत." ते फ्रान्सम्ध्येच का राहिले नाहीत असा प्रश्न क्षणभर माझ्या डोक्यात घोळू लागला.
      " गुडमॉर्निंग मशेर,गुडमॉर्निंग मादाम---" हस्तांदोलनासाठी हात पुढे करत वाकणकर पुढे आले पण एकदम जीभ चावत म्हणाले,"अरे,सॉरी हं फ्रान्समध्ये राहिल्यामुळे हे मशेर,मादाम एवढे तोंडात बसले आहे की ---"
      " की अगदी चर्चिलच्या तोंडात चिरूटच ! " मी त्याला उत्तेजन देण्यासाठी आणि आपल भाषाचातुर्य दाखवण्याच्या हेतून म्हटले.पण सुमती बरोबर असली की माझ्या वाक्चातुर्याचा विशेष प्रभाव पडत नाही तसेच आताही होऊन माझ्या चर्चिल चिरूट उपमेकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत वाकणकरन "हं मग आपल्या रंगसमस्येवर बोलूया मादाम ,"असे येथील महत्त्वाची व्यक्ती सुमतीच असणार हे ओळखून  विचारले.
       " हे पहा आमच्या  पोर्च आणि दिवाणखान्यास रंग द्यायचा आहे "
" ओ के,पण त्यासाठी आपल्या बंगल्याचा प्लॅन,तो केव्हा बांधला ,त्यात कोण कोण रहातात आणि काय करतात  इ. माहिती असती तर बरे झाले असते तरीही लेट अस स्टार्ट फ़्रॉम पोर्च "
" हे पहा वाकणकर माझ्या मते पोर्चला लाइट प्रशियन ब्ल्यू अन् ड्रॉइंगरूम अप्पर हाफला लेमन -----"बाबूने या विषयावरील तज्ञ म्हणून आपण येथे आलो आहोत या गोष्टीकडे वाकणकराचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला 
" प्रशियन ब्ल्यू , लेमन  काय कुठल्या जमान्यात वावरताय साहेब आपण" बाबूच्या तज्ञपणावरच हला करत वाकणकर उद्गारला आणि त्याचे पारिपत्य परस्परच होत असल्याने मलाही जरा बरेच वाटले.
" आता आपण ट्वेंटिफर्स्ट सेंच्युरीत प्रवेश करतोय आणि आपण तर अठराव्या शतकातील राजामहाराजांच्या महालाला रंग देण्याच्या पद्धतीने विचार करताय. कलर टेक्निक या विषयावर इतक्या काही मॉडर्न कन्सेप्टस या फ्रान्सच्या टूरमध्ये शिकायला मिळाल्या की काही विचारूच नका शिवाय कलरचा सायकॉलॉजिकल इफेक्ट,कलरमॅचिंग या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.तुम्ही आपले यलो ऑकर घ्या पोर्चसाठी."
  " यलो ऑकर पोर्चसाठी ?" धैयधराने " धिक्कार मन साहिना " म्हणावे तशाच आवेशात बाबू उद्गारला. "यलो ऑकर डायनिंग रूमला सूट होतो कारण त्यामुळे पचनशक्ती वाढते हे परवाच्याच colour digest  मधील चिकॅसोच Animal Digestion and colour या लेखातील मत वाचल नाही वाटत तुम्ही " आपल्या अपमानाचा थोडाबहुत वचपा काढता आल्याचा झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.पण वाकणकरच्या पुढील वाक्यामुळे तो क्षणभंगूरच ठरला.
" वा साहेब Animal Digestion म्हण्जे गाय बैल अशा प्राण्यांविषयी ते चिकॅसोन लिहिल आहे माणसांविषयी नव्हे,तेव्हा गोठ्याला यलो ऑकर दिला तर त्यांची पचनशक्ती वाढून ते भरपूर दूध देऊ लागतील"
" अस्स! मग पोर्चला यलो ऑकर दिल्यामुळे साहेबांची कार जास्त दूध द्यायला लागेल काय?"त्याला विनोदी टोमणा मारून खजिल करायच्या उद्देशाने बाबू बोलला.पण वाकणकर तेवढ्याने हार थोडाच मानणार होता,त्याने अधिकच उत्साहाने बोलायला सुरवात केली " आपल्याला राग येईल कदाचित साहेब,पण चिकॅसोला रंगाच ज्ञान काडीमात्र नाही अस कालच्याच American color  मध्ये जॉर्ज मसीडोच आर्टिकल आलं आहे त्यात आले आहे अर्थात आपल्याला प्रशियन ब्ल्यूच हवा असेल तर मला काही म्हणायच नाही पण चिकॅसोच्या कलर नॉलेजवर फार भरवसा ठेऊ नका,तेव्हा आपल काय म्हणण आहे बाईसाहेब?"येथे सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे हे वाकणकरनं बरोबर हेरल होत.
"पण वाकणकर आमच्या गाडीचा रंग लाईट ग्रीन आहे तेव्हा पोर्चचा रंग त्याला सूट होईल ना?" खरे तर आमच्याकडे त्यावेळी कसलीच गाडी नव्हती तरी सुमतीन हा प्रश्न कुठून काढला मला कळेना.म्हणून मी म्हणालो,"अग ही लाइट ग्रीन गाडी कुठून आणलीस?" झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्याची अक्कल मला जरा कमीच.पण सुमती अशी थोडीच गप्प बसते,तिन लगेच" अहो अस काय करताय आपल्या गाडीला लाइट ग्रीन कलर द्यायला सांगितला नाही का वशिंड्यांच्या गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगला टाकली तेव्हा? फारच विसराळू बाई तुम्ही "त्यावर अधिक बोलणे शक्य नसल्यामुळे मी गप्प राहिलो आणि मग वाकणकरला अधिकच स्फुरण चढले.
" मग तर बाईसाहेब.पोर्चसाठी यलो ऑकरच घ्या̮ लाइट ग्रीन गाडी पोर्चच्या यलो ऑकर बॅक्ग्राउंडवर अशी काही खुलून दिसेल म्हणता " वाकणकर आनंदातिशयाने नाच वगैरे करू लागतो की काय असे क्षणभर मला वाटून गेले.
    मात्र पोर्च हातचे गेलेच पण ड्रॉइंगरूम मात्र कुठल्याही परिस्थितीत जाऊ द्यायची नाही असा ठाम निश्चय करून वादात उतरण्याच्या तयारीत बाबू दिसला पण तेवढ्यात सुमतीच्या डोक्यात कुठून किडा शिरला कुणास ठाउक आणि ती म्हणाली,
"अहो पण त्या मिसेस चिटणिसानी प्रत्येक भिंतीला वेगवेगळा रंग दिलाय तसे आपण केले तर ?"  आता मात्र या सूचनेचा विचार झालाच तर चार भिंतींच्या चार रंगांविषयीच्या वादाचा निकाल  बाबू आणि वाकणेकर यांच्या मुष्टियुद्धानेच लावावा लागेल अशी भीती ( आणि मुष्टियुद्ध पहायला मिळणार याचा आनंदही ) मला वाटू लागली.पण सुमतीच्या दृष्टीने योग्य असे चार रंग शोधून शिवाय ते घरातील पडद्यानाही मॅच होतील असे पाहून त्याला योग्य दारेखिडक्यांचे रंग शोधणे हे म्हणजे अगदी रेल्वे टाइमटेबल बनवण्याइतके किचकट काम झाल्यामुळे दोघेही तज्ञ त्यातून माघार घेतील असे मला वाटू लागले पण झाले भलतेच !चार रंगांचे नाव घेताच वाकणकरच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडू लागला.
" अहो ती कोलीन बँटमची कलर सिस्टिम ! ती तर फारच छान आणि सोपीही !आता तुमच्या पसंतीचा कुठलाही रंग निवडा बाकीचे तीन भिंतींचे रंग,त्याना योग्य दारांचे खिडक्यांचे इतकेच काय पण मॅचिंग पडद्यांचे रंग याचे टेबलच दिले आहे बँटमने "
"त्याबद्दल बँटम या महापुरुषाचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. अगदी भारावून जात मी म्हणालो.पण माझा तेवढाही आनंद वाकणकरला पहावला नाही.व " बँटम ही बाई आहे पुरुष नाही साहेब" माझी चूक सुधारत तो म्हणाला "तेव्हा साहेब ड्रॉइंगरूमच्या एका भिंतीसाठी प्रेग लॅकी द्यायचा आणि त्याप्रमाणे बाकीचे कलर पहायचे ना?" बाबूकडे पहात तो म्हणाला. "नो नो,प्रेग लॅकी नाही लाइट प्रशियन ब्ल्यूच " आता आपला गड ढासळू द्यायचा नाही या दृढनिश्चयाने बाबू म्हणाला.
"तेच तेच साहेब बँटम ही फेंच स्त्री आहे आणि फ्रेंचमध्ये लाइट प्रशियन ब्ल्यूलाच प्रेग लॅकी म्हणतात."आणि बाबू विजयोन्मादाने हसला व वाकणेकरबरोबरच टेबल पाहू लागला.
"हे पहा ,प्रेग लॅकी,युलिस अपोपो,व्हेलो मॉनरो,पीटट केकी,हे चार रंग भिंतींना आणि खिडक्यांना सेकँट पॅमिलो.पडद्यांचे रंग नंतर ठरवू "
यापैकी एकाही शब्दातून रंगविषयक माझ्या ज्ञानात मुळीसुद्धा भर पडली नाही येवढेच काय पण बाब्या आणि सुमतीला तरी काही कळले असेल असे मला वाटले नाही.
" मग काय ठरले ना हे पक्के?" वाकणकरने खुंटा हलवून बळकट करण्याच्या उद्देशाने विआरले.पण पक्के हा शब्द ऐकताच एकदम सुमतीला काहीतरी आठवले आणि तिने विचारले,"पण हे सगळे रंग पक्के असतात ना हो ?"
" अगदी पक्के बाईसाहेब एक वेळ भिंत पडेल पण रंग जाणार नाही "वाकणकर अति नम्रतेने ! हाच प्रश्न मी विचारला असता तर मात्र वाकणकरन कुत्सित हास्य करत मलाच विचारले असते," साहेब, यापुढे घराला कधीच रंग द्यायचा नाही का?"
"आता तुमच्या खोल्यांची डायमेन्शन्स द्या म्हणजे त्याप्रमाणे कॉंप्यूटरवर बिलाचा आकडा कळेल .तेवढ्या रकमेचा चेक तुम्ही आम्हाला द्या मग आमचे कारागीर तुमच्याकडे येऊन रंगाचे काम करतील"
             आम्ही खोल्यांची आणि पोर्चची मापे सांगितल्यावर वाकणकरनी सर्व माहिती कोम्प्यूटरला फीड केली आणि आलेला आकडा उच्चारला,"एटवनटूथ्रीफाइव म्हणजे एक्याऐंशीहजार दोनशे पस्तीस फक्त.त्यावर टॅक्स नियमाप्रमाणे जो बसेल तो."
"काय एक्याऐंशी हजार ?" मी शॉक बसल्यासारखा ओरडलो.आता सुमती त्यावर रंग द्यायचे रद्द करून बाहेर पडण्याचा काय तोडगा काढते इकडे माझे लक्ष होते.पण तो आकडा ऐकून तिने "काय फक्त एक्याऐंशी हजार?" असा उद्गार काढल्याचा भास मला झाला आणि भंरवशाचा बुरुजच ढासळल्याची खात्री पटली.इतकेच काय पण यावेळी घासाघीस करण्यातील आपले नेहमीचे कौशल्य न दाखवता सरळ तेवढ्या रकमेचा चेक फाडून देऊन तिच्या या क्षेत्रातील आतापर्यंतच्या उज्वल यशावरही तिने पाणी फिरवले. आणि दोनच दिवसानी रंगाचे काम सुरू करण्याचे आश्वासन घेऊन आम्ही घरी परतलो. 
       दोन दिवसानंतर मी ऑफिसमधून घरी परतलो तर आमच्या घराच्या पोर्चमध्ये एक व्यक्ती हातात भिंग घेऊन एकाद्या रहस्यकथेतील डिटेक्टिवप्रमाणे भिंतीची पहाणी करत असल्याच माझ्या निदर्शनास आले.भिंगातून पाहून तो भिंतीवर पेन्सिलीने मधून मधून खुणा करत होता.मी आत शिरताच मला पाहून "गुड इर्व्हिनिंग सर" म्हणून तो उभा राहिला तेव्हा तो कलर कॉर्पोरेशनचाच माणूस असल्याचे समजले."न्हिंत फार खराब आहे रावसाहेब" अस त्यान म्हटल्यावर तो रंग देण्याच्या दृष्टीने तो भिंतीची पहाणी करत होता हे माझ्या लक्षात आले.
" पण लोक थोडेच भिंत सूक्ष्मदर्शक भिंगातून बघणार आहेत? आणि उघड्या डोळ्याने भिंत काही एवढी वाईट दिसत नाही." अस मी त्याला समजावण्याच्या उद्देशाने बोललो,पण तेवढ्यात " अहो" अशी माझ्या काळजाचा थरकाप उडवणारी चिरओअरिचित हाक कानावर आली आणि मी आत गेल्यावर " अहो थोडेथोडके नाही चांगले एक्याऐंशीहजार हजार रुपये त्याच्या डोंबलावर घातलेत तेव्हा त्याने सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहूनच भिंत रंगवायला हवी,तुम्ही उगीच मधे पडू नका." असा सज्जड दम मला भरण्यात आल्यावर,'बर बाई,सूक्ष्मदर्शक भिंगातून पाहून दाढीच्या ब्रशने रंग दिला तरी माझी काही हरकत नाही"म्हणून मी माझ्या खोलीत शिरलो.
    काम शक्यतो लवकर आटपा असा मी इशारा दिला त्यामुळे दुसऱ्या दिवशी काम सुरू करून रात्रंदिवस काम करून काम त्याच रात्री पुरे करू असे वाकणेकरनी फोनवरून सांगितले.त्या दिवशी रात्री त्यांच्यावर मी देखरेख करावी असा सुमतीचा प्रेमळ आग्रह होता पण मी त्यासाठी तज्ञ बाबूलाच बोलावण्याची सूचना मी केली आणि नौ वाजताच पांघरूण घेऊन घोरू लागल्यावर सुमतीचा नाइलाज झाला.
     सकाळी मी जागा होतो तो श्रीकृष्णाच्या उशापायथ्याशी बसलेल्या दुर्योधन अर्जुनाप्रमाणे बाबू,वाकणेकर आणि सुमती याना पाहून मला मोठे आश्चर्य वाटले पण मग वाकणेकरने "गुडमॉर्निंग" म्हणून रंगाचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर केले आणि मी तसाच उठून बाहेर गेलो.
       येवढ्या गहन चर्चेनंतर व मला न समजणाऱ्या भाषेत झालेल्या निर्णयानंतर खरोखर रंग कुठले लावले गेलेत हे पहाण्याची मलाही उत्सुकता होतीच.
        मोठ्या उत्सुकतेने मी पोर्चमध्ये पाउल टाकले तो काय पोर्चला साधा पिवळट रंग दिलेला."हाच का तो यलो ऑकर ?" "हाच का तो शिवाजी?" असे मिर्झा राजा जयसिंगला विचारणाऱ्या औरंगजेबासारखे मी वाकणेकरला विचारले.व त्यानेही तेवढ्याच आदबीने "येस सर" असं उत्तर दिले.दिवाणखान्यात प्रवेश केल्यावर मात्र तेथील रंगसंगती पाहून कुठल्याही शहाण्या माणसाला वेड लागल्याशिवाय रहाणार नाही असे मला वाटले.पण याही बाबतीत इतर सर्व बाबींप्रमाणेच सर्व हल्ल सुमतीस्वाधीन असल्यामुळे काहीच न बोलणे मी पसंत केले.
          आज सुमतीच्या सख्या रंग पहायला येणार होत्या.त्यामुळे मी ऑफिसमधून येताच तिचा "मेरावाला क्रीम" म्हणणाऱ्या बाईसारखा फुललेला चेहरा पहायला मिळेल आणि मैत्रिणीने एअंगाचे केलेले कौतुक ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती.पण पहातो तो काय भरताऐवजी रामास राज्याभिषेक करण्याचा निर्णय दशरथाने घेतल्यावर कैकेयीने धारण केल्यासारखा चेहरा तिचा दिसत होता.काय झाले असावे याचा अंधुक अंदाज मला होताच पण त्याला मी जबाबदार नसल्याची खात्री असल्यामुळेच आवाजात अधिकच प्रेमळपणा आणत मी विचारले,"काय गं काय झालं? "
" सगळ्या सटव्या मेल्या, एकीला बँटम,चिकॅसो ही नावसुद्धा माहीत असतील तर शप्पथ,पण सगळ्यानी येवढ्यासुंदर स्कीमवर टीका करून माझा जीव अगदी बेजार केला"
"जाऊदे तू कशाला येवढ मनावर घेतेस त्यांच"
"ते काही नाही मी वाकणेकराना फोन करून कळवलय !"
"काय कळवले आहेस?"धडधडत्या अंत: करणाने मी विचारले.
" काहीनाही तुमचच म्हणण बरोबर होत  हॉलला सौम्य निळा रंगच योग्य. बाबूनसुद्धा तसाच आग्रह धरला होता."
" हो पण तुझा नवऱ्यापेक्षा त्या वाकणेकरावर जास्त विश्वास"
"चुकलच माझ ! म्हणूनच वाकणकरला हा रंग बदलून सौम्य निळाच रंग द्यायला सांगितल सुद्धा."
""बघ"मी खूष होऊन "माझ अगोदरच ऐकल असतस तर?"
"नाहीतर काय त्या मेल्या वाकणेकरान या निळा रंग देयाच्या कामाचा पन्नास हजाराचा चेक नेला आहे."
आता बेशुद्ध पडायची पाळी माझी होती.

यातील रंगांची नावे कोणत्याही भाषेच्या कोशात शोधण्याचा प्रयत्न करू नयेत‌. सापडलीच तर तो योगायोग समजावा.