नकोस इतके प्रेम करू

तो:  नकोस इतके प्रेम करू

मी तर एक मेघ दीवाणा

कसा कुणाचा आधार व्हावा

जो अनिकेत भटकणारा!   II १ II

ती: ह्याचसाठी तुजवरी जीव जडला

की मेघ तू  उन्मुक्त विहरणारा

जन्मोजन्मी  जी तुझ्यासवे,

तीच असे मी जलधारा.  II २  II

तो:  मी कधी एक जागी रमलो?

मी कधीही ना स्वस्थ थांबलो!

कुठवर मजसवे येणार  तू?

मी देशविदेश भटकणारा! II ३ II

ती: हे नीलनभातील प्रवासी,

हे प्रेम तुला कळे ना कसे? 

मी साथ तुझी सोडेन ना मुळी

जोवर ना म्हणशी, "हरलो" असे! II ४ II

तो: विसरतेस का भान प्रिये?

बनलीस ध्येय जरी जन्माचे

ती: परतून आता मी जावे कसे?

तोडले तुजसाठी पाश सर्व जगाचे! II ५ II

तो: नकोस इतके प्रेम करू

मी तर एक मेघ दीवाणा!

ती: जन्मोजन्मी जी तुझ्यासवे,

तीच असे मी जलधारा!  II धृ II