दिवाळीच्या गोष्टी - भाग १

अतीव उत्साहाने दीपावलि साजरी करताना अनेकदा 'हे असेच का ?' हा प्रश्न आबालवृद्धांना सतावतो. दीपपर्वाशी संबंधित असलेल्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी काही अशा आहेत.

नरक चतुर्दशी

कामरुप देशात नरकासुराचे अत्याचार वाढत्या प्रमणात होते. देव आणि मानव यांना त्याच्या मगरमिठीतून सुटण्याची इच्छा होती. तेव्हा भगवान विष्णूनी नरकासुरास आपल्या सुदर्शन चक्राचे भक्ष्य वनविले. परंतु अंतसमयी चलाख नरकासुराने भगवंताकडे एक वर मागितला.

"माझ्या मृत्युदिनी महितलावर उत्सव साजरा व्हावा आणि घरोघरी दीपकांची आरास व्हावी !"

परमेश्वरानं म्हटले, "तथास्तु !"

हाच तो दिन, आपण त्यास 'नरकचतुर्दशी' म्हणतो.

या दिवशी सूर्योद्यापूर्वी सुगंधी द्रव्ये अंगास लावून ऊन पाण्याने मंगल स्नान करण्याचा प्रघात आहे. असे न केल्यास आपण स्वर्गात न जाता नरकात जाऊ अशी कल्पना आहे. हा दीपावलीचा आरंभ दिन आहे.

बलि प्रतिपदा

बळी राजाने स्वर्ग, मुत्यु आणि पाताळ हे तिन्ही लोक जिंकले. तेव्हा देवांच्या प्रार्थनेवरुन भगवान श्रीविष्णुने वामनावतार धारण केला अन दान म्हणुन बळीराजाकडून हे तिन्ही लोक परत मिळविले. परमेश्वराचे षड्यंत्र बळीला उअमजले होते. तरीही त्याने वामनाची इच्छा पूर्ण केली. विष्णुला हे नविन होते. बळीच्या दातृत्त्वावर प्रसन्न होऊन त्याने त्यास, "पाताळात जाऊन वास्तव्य कर !" अशी आज्ञा केली. शिवाय बळीने दरवर्षी पृथ्वीवर येऊन मानवांकडून पूजा करून घ्यावी असा आदेश दिला. म्हणून बलिप्रतिपदेला आपण बलिपूजन करतो.

नमंदेच्या उत्तरेकडील भारतीय जे विक्रम संवत्सर पाळतात. त्या संवत्सराची सुरवातही बलिप्रतिपदेपासून होते. त्यामुळे भारतात हा दिवस वर्षारंभाचा दिवस मोठ्या प्रमाणात पाळण्यात येतो.

यमद्वितीया

दीपावलीतील शेवटच्या महत्त्वाचा दिन यमद्वितीया हा होय. आपण महाराष्ट्रीय यास 'भाऊ-बीज' म्हणतो. इतर लोक 'भाई-दूज' म्हणतात. या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिला भेटावयास गेले होते.

बंधु-भगिनीचे प्रेम वृद्धिगत करणारा हा दिवस होय. बहुतेक भाग्यवान भाऊ आपल्या भाग्यवान बहिणीला या दिवशी भेटतात. रात्रौ बहीण भावाला ओवाळते. भाऊ ऐपतीप्रमाणे प्रिय भगिनीस ओवाळणी घालतो.

दिवाळी हा भारताचा पुरातन सण आहे. भारतात प्रत्येक ठिकाणी, तसेच भारतीय परदेशात जिथे जिथे असतील तिथे 'दीपावली' अपरिमित उल्हासाने साजरी होते. या सणानिमित्त स्नेह्यांना फराळाला किंवा पानसुपारीला बोलावण्याचा प्रघात आपल्यात आहे.