भाववाचक सॉफ्टवेअर

शेअरबाजारातले 'आजचे भाव' अहोरात्र सांगत राहणाऱ्या सॉफ्टवेअर बद्दल मी हे लिहीत आहे असे कृपया समजू नका बरं का!

खरे म्हणजे शीर्षक वाचल्या वाचल्या तुमच्या चेहऱ्यावर काय काय 'भाव' उमटले ते मला जाणून घेण्याची उत्सुकता होती हो; पण तशी काही सोय नाही.

म्हणजे, इतके दिवस नव्हती. मात्र फ्राऊनहॉपर इन्स्टिट्यूट फॉर इंटिग्रेटेड सर्किटस ने अशी सुविधा आता विकसित केलेली आहे.

ह्यातले तत्त्व तसे समजायला साधे आहे. आपला चेहरा हा आपल्या भावनांचा आरसा असतो, म्हणजेच आपल्या मनाचे प्रतिबिंब त्यात पडत असते, त्यामुळे चेहऱ्याचे निरीक्षण करून भावनांचा अंदाज आपल्याला घेता येतो. (खरे तर दुसऱ्याच्या मनातले ओळखायला त्याशिवाय दुसरा पर्यायच आपल्यापाशी नाही!) ह्या सुविधेत हेच तत्त्व वापरलेले आहे. व्हिडिओ प्रतिमाग्राहकाने टिपलेल्या चेहऱ्याच्या आकार उकारांचे मापन आणि पृथक्करण करून त्या व्यक्तीच्या भावनांचे वाचन करता येते. ह्यात एकाच वेळी अनेक चेहरे टिपणे शक्य असल्याने गर्दीच्या भावनाही ओळखणे शक्य आहे. शिवाय स्त्री पुरुष असा भेद करणेही शक्य आहे. महत्त्वाची गोष्ट ही, की प्रतिमा टिपण्यापासून ते भावना मापण्यापर्यंत सर्व कामे लगोलग होतात; त्यासाठी वाट पाहावी लागत नाही.

ह्या सुविधेला प्रथम 'प्रशिक्षणाच्या' अवस्थेतून जावे लागते. त्या अवस्थेत तिला मुबलक चेहऱ्यांच्या प्रतिमा दाखवलेल्या असतात आणि अर्थ कसा लावायचा ते पढवलेले असते. नेहमीच्या कामाचे वेळी चेहऱ्याचे जवळजवळ ३०००० तपशील अगोदर पढवलेल्या माहितीशी ताडून पाहिले जातात. संगणक हे काम इतक्या त्वरेने करतो की  क्षणोक्षणी बदलत्या भावनाही लगोलग टिपता आणि मापता येतात.

ह्या सॉफ्टवेअरची नमुना-प्रात्यक्षिका ची आवृत्ती येथून उतरवून घेता येईल. मला हे सगळे सायन्स डेली च्या ह्या पानावर  वाचायला मिळाले. वरचे चित्रही मी तेथूनच जोडलेले आहे.

वाचलेत? आहे की नाही भन्नाट. जाहिरातदारांना तर हे फार उपयोगी पडेलच. सायन्स डेलीवाले लिहितात ते सगळे उपयोग आहेतच.  शिवाय मला वाटते  चित्र/नाट्य समीक्षकांनाही ही कलावंतांच्या अभिनयाचे मापन वस्तुनिष्ठतेने करता येण्यासाठी ही सुविधा उपयोगी पडेल! निरनिराळ्या कलावंतांच्या अभिनयाची तुलना वस्तुनिष्ठपणे झाली म्हणजे अभिनयाच्या पारितोषिकाच्या बाबतीत तरी योग्यायोग्यतेच्या बाबतीत वादावादी होणे टळेल! शिवाय कित्येक जाहिराती पाहताना आपल्याला कंटाळा, चीड, वैताग, टिंगल, टीव्ही बंद करावासा वाटणे इत्यादी गोष्टी मनात येतात. जर त्या निर्मात्याला कळल्या तर तो असल्या डोकेदुखी जाहिरातींना आवर घालील अशी (भाबडी) आशा बाळगायला हरकत नाही!

काय म्हणता? अर्थात सध्या तुमच्या संगणकावर हे सॉफ्टवेअर असण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुम्ही प्रतिसाद लिहित असताना तुमच्या 'खऱ्या' भावना तुमच्या चेहऱ्यावर असल्या तरी त्या टिपून-मापून त्या मला कळण्याची सोय नाही तेव्हा मोकळेपणे प्रतिसाद लिहा! (  ह. घ्या. हं.)