पं. मनोहर कवीश्वर आणि इतर

    पं. मनोहर कवीश्वर यांचे निधन झाल्याची बातमीसुद्धा पुण्यामुंबईच्या दैनिकात वाचायला मिळाली नाही अगदी बारीक दोन ओळींची बातमी कोठे आली असेल तर नकळे ! एकदम लोकसत्तामध्ये व्यक्तिवेध मध्ये त्यांच्या व्यक्तिरेखेचा परिचय आला आणि त्यातूनच त्यांचे निधन झाल्याचे कळले.
    गीतरामायणापासून स्फूर्ती घेऊन कवीश्वरांनी गीतगोविंद ची रचना केली आणि त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम ते स्वत: करत असत.त्यात ते गायन वादन अशा दुहेरी भूमिका बजावत. त्यानी दिलेल्या काही चाली तर गीतरामायणातील चालीहूनही बहारदार होत्या मी तो कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिल्यामुळे आणि गीतरामायणही कै. बाबूजींच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकल्यामुळे   सांगू शकतो."माना मानव ना परमेश्वर" आणि " विमोह त्यागुन कर्मफलाचा " ही दोन गीते बाबूजीनी गाऊन महाराष्ट्रभर गाजली  त्याव्यतिरिक्त "गीतगजानन"  " गीतगौतम"  आणि " गीतचक्रधर" अशी चरित्रे त्यानी गीतबद्ध आणि संगीतबद्ध केली  तरीही एकूणच महाराष्ट्रात किती जणाना त्यांची माहिती होती याची मला शंका वाटते. कारण कला क्षेत्रात प. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र असाच प्रकार आहे. त्यामुळे पं . राजाभाऊ कोगजे, पं.दिनकरराव तथा भैय्यासाहेब देशपांडे, पं. प्रभाकरराव खर्डेनविस अशी विदर्भातील किंवा मराठवाड्यातीलही अनेक कलावंत उपेक्षित राहिले . 
        अगदी सा रे ग म प सारख्या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून बोलावताना पुण्या मुंबई बाहेरील व्यक्तींची वाहिन्यांना क्वचितच आठवण होते. एकूण कलाक्षेत्रात पुण्यामुंबईपलिकडे महाराष्ट्र आहे याचा आपल्याला विसरच पडला आहे की काय ?