तुम्हाला काय वाटतं?

...‘डेथली हॆलोज’ला जगभरातून मिळालेल्या अपेक्षित अशाच अभूतपूर्व प्रतिसादानंतर जे. के. रोलिंग यांनी लेखणी खाली ठेवली असली तरी फॆन्ट्सीच्या अद्भुतरम्य जगात रममाण होणाया बालविश्वावर हॆरी पॊटरच्या सातही आवृत्त्यांचे गारुड यापुढेही अनेक वर्षे कायम राहणार आहे. ‘हॆरी पॊटर’ हा साहित्याविश्वातला एक चमत्कार आहेच, आणि आजचे गतिमान ग्लोबलायझेशन आणि मार्केटिंगची जादू यांमुळेच हा चमत्कार साध्य झाला आहे. जग चारपाच दशकांपूर्वी आजच्यासारखे जवळ आले असते, तर ?....

तर त्या वेळी मराठी बालविश्वाला आपल्या जादूई करामतींनी भारावून टाकणाया ‘बनेश फेणे’ नावाच्या फुरसुंगीच्या ‘फास्टर’नेही मराठीच्या सीमेपारचे बालविश्व झपाटून टाकले असते... भा. रा. भागवत नावाच्या लेखकाच्या भन्नाट मेंदूतून जन्माला आलेला हा बनेश फेणे, म्हणजे ‘फास्टर फेणे’ ऊर्फ ‘फा-फे’, पुढे मुलांबरोबरच त्यांच्या आईवडिलांचाही हिरो झाला. आज पॊटरच्या जादूने मुलांच्या जगाला वेड लावलंय, तसं वेड तेव्हा ‘फा-फे’नं मराठी घराघरात लावलं होतं. साहित्याच्या विश्वसंचाराचे आजचे दिवस साठाच्या दशकातच उजाडले असते, मराठमोळ्या घरांच्या सीमा ओलांडून बाहेर पडायचे मार्ग तेव्हा सापडले असते, तर, कदाचित फुरसुंगीचा हा फा-फे देशाच्या सीमेपलीकडेही पराक्रम गाजवून आला असता...

बालविश्वात ‘फॆण्टसी’ला असलेलं स्थान ओळखून जगभरातल्या करमणूक अणि साहित्यक्षेत्रानं गेल्या काही वर्षात या विश्वाला पोषक अशी निर्मिती करायला सुरुवात केली. पण अशा अदभूताच्या दुनियेला साहित्यविश्वात आपल्याकडेही अगदी पुराणकाळापासून मानाचं स्थान होतं. इंग्रजी भाषांमधल्या ‘कॊमिक्स’चा मराठमोळ्या घरातही सहज संचार सुरू झाला आणि या कल्पना चित्रमय रूपात मराठी बालकांसमोर साकारू लागल्या. भारतात ‘इंद्रजाल कॊमिक्स’, ‘अमर चित्रकथा’ यांच्या सोबतच ‘चांदोबा’ची वेगबेगळी रूपे घरोघर दिसू लागली. इसापच्या कथा आणि सिंदबादच्या सफरींनीही बालकांना वेड लावलं. पण, काळानं त्यांच्या भराऱ्यांना लगाम घातला. नंतर मात्र, अमेरिकेत जन्माला आलेला हॆरी जसा मराठी घराघरात ‘घरच्यासारखा’ झाला, तसा प्रयत्न ‘चित्रकथां’च्या नायकांनीही केला... भारताच्या बालविश्वाला रमवणाऱ्या ‘चित्रकथां’नी आपल्या परंपरागत भाषांचा उंबरठा ओलांडला आणि जगाच्या भाषेला आपलंसं केलं.

मराठी किंवा कोणत्याही भारतीय भाषांमधे अदभुतरम्य साहित्याची कधीच वानवा नव्हती. पण संस्कृतीच्या बंधनांनी या साहित्याला ‘पुराणकथां’मध्ये बांधून ठेवलं. आज हनुमान आणि गणेशाचे ऍनिमेशनपट तयार झाले, आणि पुराणकथांमध्ये ‘बंदिस्त’ झालेले हे बालनायक फॆन्टसीच्या दुनियेतही लोकप्रिय झाले. त्याना देवांच्या जगातून बाहेर आणून मुलांच्या विश्वात बसवलं असतं तर?...

तुम्हाला काय वाटतं?