१५ ऑगस्ट ची सकाळ! मित्रांना लघूसंदेशांद्वारे शुभेच्छा देत होतो. देशभक्तीपर गाणी ऐकू येत होती. प्रसन्न वातावरण होते. तितक्यात आनंदचा फोन आला. मढे घाट म्हणून एका निसर्गरम्य ठिकाणी जायचे का अशी विचारणा करण्यासाठी म्हणून त्याने फोन केला होता. त्याला ही कल्पना किरणने सुचवली होती. दै. सकाळच्या पुरवणीमध्ये या ठिकाणाविषयी लिहून आले होते. किरण आणि दीपक देखील येणार होते. दीपक, किरण, आनंद आणि मी असे आम्ही चौघे कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात एकाच वर्गात होतो. इतकेच नव्हे तर वसतिगृहातदेखील आम्ही चारही वर्षे सोबत राहिलो. त्यानंतरही आजपर्यंत म्हणजे शिक्षण संपून सात वर्षे होऊन गेल्यावर देखील आमची मैत्री तितकीच घट्ट आहे. अगदी चौघांपैकी तिघे विवाहीत असून देखील! (दीपकचेही आत्ताच ठरले आहे; वाजेल आता लवकरच त्याचाही बँड! बिच्चारा!!) आमच्या तिघांच्याही बायका पुण्यात नव्हत्या. बऱ्याच दिवसांनी असे मनमुराद भटकायचा योग आला होता. ठरले! साडे नऊ वाजता आम्ही आनंदच्या गाडीतून हमरस्त्यावरून साताऱ्याच्या दिशेने निघालो. सुसाट वेग आणि जोडीला अमाप उत्साह! आम्हाला भेटून तसे बरेच दिवस झाले होते. आणि ते भेटणे ही कसले भेटणे? जास्तीत जास्त अर्धा-पाऊण तास आणि ते ही काहीतरी प्रसंगानिमित्त! थोडेफार जुजबी सगळ्यांशी बोलून सतत निघण्याची घाई! आज खूप निवांत वेळ होता, खूप उत्साह होता, कुठेतरी मस्त ठिकाणी फिरायला जाण्याची उत्सुकता होती, सगळे कसे उत्तम जुळून आले होते. गप्पा सुरू झाल्या. हसत-खिदळत आम्ही नवा कात्रज बोगदा पार केला. जवळच्याच पुलावरून जातांना निसर्गाने केलेली सौंदर्याची मुक्त उधळण आणि माणसाच्या अचाट बुद्धीमत्तेची आणि आकाक्षांची झेप यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. साधारण एक किलोमीटर लांबीचा तो बोगदा बघून आम्ही मंत्रमुग्ध झालो. उंच डोगर पोखरून केलेली ती स्थापत्त्य अभियांत्रिकीची कमाल श्रेष्ठ की आजू-बाजूला असलेले नेत्रसुखद निसर्गाचे अनमोल सौंदर्य श्रेष्ठ असा विचार मनाला चाटून गेला.
बरेच अंतर कापल्यावर आम्ही चेलाडी फाट्यावरून उजवीकडे वळलो. राजकारणापासून क्रिकेटपर्यंत आणि मराठी भाषेपासून सिनेमापर्यंत एकेका विषयावर सणसणीत गप्पा सुरू होत्या. अंतर सपाट्याने कापले जात होते. ढगाळ वातावरण मढे घाटात काय वाढून ठेवले असेल याची झलक देत होते. चेलाडी फाट्यावरून आम्ही रस्ता विचारत-विचारत वेल्ह्याकडे निघालो. आनंदच्या वेगवान ड्रायव्हींगनंतर आता किरणच्या संयत ड्रायव्हींगची कसोटी लागत होती. कच्चा, वळणावळणाचा आणि अरुंद रस्ता, पावसाची रीप-रीप आणि गर्द झाडी अशी चालकाची परीक्षा पाहणारी परिस्थिती होती. किरण आणि आनंद दोघेही कसलेले चालक आहेत. दीपक आणि मी मात्र त्याबाबतीत तितकेच अनभिज्ञ आहोत जितका की सलमान खान मधुमक्षिकापालनाविषयी असेल. मग थोडा श्रमपरिहार म्हणून आम्ही वेल्ह्याच्या एका छोट्या हॉटेलात चहा घेण्याचे ठरवले. वेल्हा हे एक छोटे गाव आहे. छोटी छोटी घरे आणि छोटी छोटी दुकाने! आजू-बाजूला गर्द झाडी आणि उंच-उंच डोंगरकडे! गुदगुल्या करणाऱ्या पावसात आम्ही त्या छोटेखानी हॉटेलात गरमागरम चहा घेतला आणि वेगळीच तरतरी आली. मढे घाटाचा रस्ता विचारून आम्ही पुढे निघालो.
पुढच्या रस्त्याला रस्ता म्हणणे म्हणजे राहूल रॉयला चक्क अभिनेता म्हणण्यासारखे होते. गप्पांच्या ओघात देखील त्याला रस्ता म्हटल्यावर तो लाजत असल्याचा भास आम्हाला होत होता. बराच चढ पार केल्यावर उजव्या हाताला स्टार फिशच्या आकाराचा एक तलाव दिसला. आम्ही गाडी थांबवून उतरलो आणि ते दृष्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवले. पाऊस येत-जात होता. सर्वत्र हिरवाई आणि पाणी याखेरीज काहीच दृष्टीस पडत नव्हते. डोंगरांच्या डोक्यांवर धुके आणि ढग राज्य करीत होते. तिथे ढग आणि डोंगर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून पावसाची गाणी म्हणत असल्यासारखे वाटत होते. थोडावेळ तिथे थांबून आम्ही पुढे निघालो आणि तितक्यात किरणने बॉंबगोळा टाकला. पेट्रोल खूप कमी असल्याची बातमी त्याने देताच आम्हाला ब्रह्मांड आठवले. आता पेट्रोल मिळणार तरी कुठे? हमरस्त्यावर आनंदने पेट्रोल भरले खरे पण किरणच्या सांगण्यावरून अगदी तात्पुरते भरले होते. पुढे कुठल्यातरी एका चांगल्या भरवश्याच्या पंपावर अजून भरू म्हणून किरणने गाडी पुढे हाकावयास सांगीतली आणि गप्पांच्या नादात आम्ही ते साफ विसरलो. किरणचा येथेच्छ समाचार घेतल्यावर आम्ही त्याला विचारले की आता काय करायचे. तो म्हणला की जोपर्यंत लाल दिवा लागत नाही तोपर्यंत ठीक आहे. लाल दिवा म्हणजे धोक्याची सूचना. पण त्यानंतरही गाडी ५०-५५ किलोमीटर जायला हरकत नाही असे तो म्हणाला. (मी आणि दीपक शांत!) पुढे अजून किती अंतर जायचे होते कल्पना नव्हती. आम्ही थोडा विचार करून पुढे जायचा निर्णय घेतला. पुढचं पुढे बघू असा विचार करून आम्ही निघालो.
रस्ता अधिकाधिक लाजत होता. अगदी लाजून चूर होत होता. असंख्य खड्डे (पुण्यात शोभला असता!), पाण्याने भरलेले अनेक फसवे खळगे, चिखल आणि गाडीची दमछाक करणारा चढ! बाजूला खोल दरी आणि अतिशय अरुंद जागा! आम्ही काही मागे हटणारे नव्हतो. (गाडी असल्यावर असे म्हणायला काय हरकत आहे?). कानद खिंड पार करून आम्ही मजल-दरमजल करीत मढे घाटाच्या हद्दीत पोहोचलो. एका कडेला गाडी थांबवली आणि बाहेर उतरलो. वातावरण खूपच नशीले होते. चार जिवाभावचे मित्र, उदंड उत्साह आणि साथीला अप्रतिम निसर्गसौंदर्य! गार हवा पापण्यांना स्पर्श करून डोळ्यांद्वारे हृदयात उतरत होती. हवेने हेलकावे खात खाली येणारे मोती चेहऱ्यावर हलकेच आदळून मन त्या ढगांसारखेच एकाच वेळी हलके आणि भारलेले करत होते. आता आम्ही पेट्रोलची ज्वलनशील चिंता विसरलो होतो. सगळ्यांची मने पावसाच्या सरींचे बोट पकडून झुलत-झुलत भूतकाळात उतरली होती. कॉलेजचे रम्य दिवस, भर पावसात काढलेली महबळेश्वरची सहल, गणपतीपुळ्याची सहल, वसतिगृहातले दिवस अशा अनेक आठवणींना उजाळा मिळत होता.
आम्ही अजून पुढे निघालो. रस्ता अधिकाधिक अरुंद होत चालला होता. गर्द जंगल, गडद ढग, धुके, पाऊस आणि अवाढव्य डोंगर याखेरीज त्या निसर्गाच्या राज्यात काहीच नव्हते. थोड्या वेळाने आम्ही थोड्या सपाट जागी पोहोचलो. तिथे थोडीफार गर्दी होती. पण अगदीच लोणावळ्यासारखा बाजार नव्हता. जेमतेम २५-३० माणसे होती. ती देखील सकाळमधला लेख वाचूनच आली होती बहुधा. मोठे-मोठे पाण्याचे प्रवाह एका दिशेने वाहत जाऊन एका कड्याजवळ एकत्र होत होते. आम्ही थोडं कड्याला जाऊन खाली बघितलं. बाप रे! दाट धुक्यामध्ये एक मोठा धबधबा दिसत होता. साधारण दीड-दोनशे फूटाचा तो धबधबा असावा. पण धुक्यामुळे नीट दिसत नव्हतं. आम्ही असाच एक मोठा प्रवाह पार करून पलिकडे जायचे ठरवले. पाण्याला चांगलाच जोर होता. सगळे खडक शेवाळामुळे निसरडे झाले होते आणि वरून पाऊस पडत होता. कसेबसे एक-एक जण तो प्रवाह पार करण्याचा प्रयत्न करू लागला. किरण सर्वात आधी पलिकडे गेला. आनंद एका निसरड्या खडकावरून वर उडी मारण्याच्या प्रयत्नात आपली एकच चप्पल गमावून बसला. एक पाय वर आणि एक खाली होता. किरणने त्याला हात दिला आणि त्या घाईत पाण्यात असलेल्या आनंदच्या पायातली चप्पल प्रवाहाबरोबर वाहत निघाली. किरण धावत पुढे गेला पण पाण्याचा वेग इतका जास्त होता की चप्पल केव्हा धबधब्यात विलीन झाली ते त्याला देखील कळले नाही. मग आनंद एकच चप्पल घालून पलिकडे गेला. मी तोच खडक ओलांडण्याचा प्रयत्नात घसरलो आणि माझा उजवा गुडघा त्या खडकावर मजबूत आपटला. चांगलेच लागले. मग दीपक ही आला. एक उंच कडा आम्हाला खुणावत होता. आता धुके हटून सगळे स्पष्ट दिसायला लागले होते. अवाढव्य दरी! सगळीकडे हिरवा रंग पसरलेला होता. दरीत घनदाट अरण्य होते. पाऊस जोरात पडायला लागला होता. आणखी वर चढणे जरा धोक्याचे होते कारण जेमतेम ७-८ फूट रुंद चढ होता. एका बाजूला काटेरी झाडे तर दुसऱ्या बाजूला दोनशे (किंवा जास्त; अंदाजच बांधता येत नव्हता) फूट खोल दरी. आम्ही थोडे थांबलो पण हिय्या करून पुढे हात टेकवत चढायला लागलो. चप्पल घालून चढणे अधिक धोक्याचे होते म्हणून पायी चढायला सुरुवात केली तर खाली काटे टोचायला लागले. तरी पण आम्ही चढत गेलो आणि एका ठिकाणी थांबलो. इथून पुढे जाणे शक्य नव्हते. केवळ २-३ फूट रुंद, अगदी निसरडा आणि जवळ-जवळ उभा चढ होता. आम्ही तिथेच थांबलो. समोर अजस्त्र दरी होती. निसर्गाच्या त्या अद्भूत चमत्काराकडे आम्ही आ वासून बघत राहीलो आणि कधी त्याला मनातल्यामनात लवून कुर्निसात घातला कळलेच नाही. मग पुन्हा गप्पा सुरू झाल्या. कराडचे दिवस, अमका काय करतो, त्याचं लग्न झालं का, त्याला मुलगी झाली का मुलगा अशा अनेकविध विषयांवर गप्पा सुरू झाल्या.
आधी केलेल्या सहलींमधली धमाल आठवली आणि आता मागे वळून बघण्याइतके आपण आयुष्याच्या रस्त्यावर पुढे आलेलो आहोत हे जाणवले. मनाचा रांगडेपणा जपणं आता अधिकाधिक अवघड होत जाईल हे देखील जाणवलं. थोड्या वेळाने आम्ही परत तशीच कसरत करत मागे फिरलो. किरण सगळ्यात पुढे, त्याच्यामागे मी आणि माझ्यामागे दीपक आणि सगळ्यात मागे आनंद असे आम्ही खाली उतरायला लागलो. दीपक अखंडपणे आपल्या जबरदस्त कॉमेंटस मारत होता. दीपकची विनोदबुद्धी खूपच तरल आहे. असेच बोलता-बोलता त्याचा पाय घसरला आणि तो खाली आदळून घसरत जाऊ लागला. त्याचे वाक्य हवेतच विरले. मी त्याला धरून उठवले. किरण पोट धरून हसत होता. दीपक उभा राहून पुढची दोन पावले टाकतो न टाकतो तोच पुन्हा एकदा त्याच्या पायांनी दगाफटका केला आणि तो पुन्हा घसरून पडला. आता मात्र आम्ही तिघे जागेवरच बसून हसू लागलो. मग पुन्हा तो प्रवाह एका वेगळ्या ठिकाणावरून पार करून आम्ही पलिकडे पोहोचलो. एक वळसा घालून धबधब्याच्या समोरच्या दिशेला चालत गेलो आणि आमचे देहभान हरपले. धुके पूर्णपणे हटले होते आणि समोर तो फेसाळणारा धबधबा डौलात कोसळत होता. पाण्याचा प्रत्येक थेंब जणू खाली धरणीच्या कुशीत शिरायला आतूर झाला होता त्याप्रमाणे तो धबधबा स्वतःला एवढ्या उंचीवरून झोकून देत होता. श्वास रोखून धरायला लावणारे ते दृष्य होते. आम्हा विवाहितांना आपापल्या बायका हे दृष्य बघायला हव्या होत्या असे आवर्जून वाटले. मी किरणचे इतक्या चांगल्या ठिकाणी सहलीला आणण्याबद्दल आभार मानले. किरण काहीच बोलला नाही. मग आनंदने बिंग फोडले की ही कल्पना आमच्या अजून एका हरहुन्नरी मित्राची, गजाननची होती. त्यानेच दै. सकाळमध्ये तो लेख वाचून ही कल्पना मांडली होती. किरण संगणकप्रणाली क्षेत्रातल्या अगदी मुरलेल्या व्यवस्थापकासारखे फुकटचे श्रेय लाटायला पहात होता. पुन्हा आम्ही त्याची येथेच्छ धुलाई केली. अर्थात शब्दिकच! गजाननला ऐनवेळेस काही अपरिहार्य कारणामुळे आमच्या सोबत येता आले नाही.
आता चांगलीच भूक लागली होती. आम्ही पुन्हा सगळा प्रवास करून खाली उतरलो. कुठेच हॉटेल दिसत नव्हते. एक पाववड्याची गाडी दिसली आणि आनंदने पळत जाऊन ४ पाववडे आणले. मी नको-नको म्हणत होतो. आता थेट मनसोक्त जेवावे म्हणून मी नाही म्हणत होतो. त्यांना हायजिन वगैरेची पण भीती मी दाखवून पाहिली पण पोटातली आग हायजिनच्या भीतीपेक्षा जास्त दाहक ठरली. मग मी ही एक पाववडा खाल्ला. अतिशय चविष्ट असा तो पदार्थ होता. आता भूक अजून खवळली होती. किरण गाडी थांबवायला तयार नव्हता. त्याचे सारे लक्ष पेट्रोलकडे होते. आधी हमरस्त्यावर जाऊन पेट्रोल भरून निश्चिंत व्हावे असा त्याचा विचार होता. शेवटी आमच्या विनवण्यांकडे सरळ दुर्लक्ष करत त्याने गाडी आधी हमरस्त्यावर आणून पेट्रोल भरले आणि आमचा जीव भांड्यात पडला. मग कैलास नावाच्या एका हॉटेलात आम्ही ५ वाजता जेवायला गेलो. गरम-गरम पिठले, भाकरी, कढी, भात, दही, चटणी, कांदा, पापड असा अस्सल मराठी बेत होता. दाबून जेवलो. गर्दी खूप होती. मग तिथे पान वगैरे खाऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला तो अशा सहलीची कुठलीच संधी भविष्यात दवडायची नाही अशी शपथ घेऊनच!!!