मराठी सिनेमाची सायबर भरारी.

मटा वृत्त दि. २९.०८.०७.

- दिनेश कानजी
मराठीत हल्ली चांगले चित्रपट तयार होताहेत , पण वितरण यंत्रणेअभावी ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. काही मोजक्या ' हमखास यशस्वी ' चित्रपटगृहातच चित्रपट लावण्यातच निर्मातेही धन्यता मानतात. त्यामुळे , दर्दी रसिकांपर्यंत मराठी चित्रपट पोहोचत नाही. आता उद्यापासून मात्र हे चित्र बदलणार असून जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना एका टिचकीसरशी मराठीतले दजेदार चित्रपट बघता येणार आहे. यासाठी खास बनवलेले संकेतस्थळ उद्यापासून सुरू होतेय.

अनिवासी भारतीयांना जालावर इथले दजेदार चित्रपट बघता यावे यासाठी अनिल अंबानींच्या रिलायन्सने हे नवे संकेतस्थळ बनवले आहे. या संकेतस्थळावर सुरुवातीला राष्ट्रभाषा हिंदीसह मराठी , तमिळ , तेलगु या प्रादेशिक भाषांतले चित्रपट पाहता येतील. त्यात मराठी चित्रपट मोफत पाहता येणार आहेत. गेल्या काही वर्षांत लोकाश्रय मिळालेल्या बऱ्याच मराठी चित्रपटाचे हक्क ताब्यात असलेल्या नानूभाई जयसिंघानिया यांच्याशी रिलायन्सने तसा करारच केला आहे. नानूभाई म्हणाले , ' हे संकेतस्थळ बनवण्याचं काम सुरू असताना रिलायन्सच्या अधिकाऱ्यांशी माझी तीन-चार महिने चर्चा सुरू होती.

' पक पक पकाक ', ' खबरदार ', ' जत्रा ', ' धूमधडाका ', ' नवरी मिळे नवऱ्याला ' अशा बऱ्याच लोकप्रिय चित्रपटांच्या प्रतीचा माझ्याकडे साठा आहे. सचिन , महेश कोठारे , केदार शिंदे यांच्यासह मराठी सिनेमातल्या लोकप्रिय दिग्दर्शकांचे चित्रपट माझ्याकडे आहेत. या संकेतस्थळामुळे मराठी सिनेमाचा जगभरात हक्काचा प्रेक्षक निर्माण होईल या विचाराने मी त्यांना होकार दिला. '

ही संकेतस्थळ तयार झाल्यानंतर पहिल्या महिन्यात मराठी प्रेक्षकांना दहा चित्रपट बघता येतील. चित्रपटाची नक्कल करायची असेल तर त्याला ४ डॉलर ४९ सेण्ट इतका खर्च येईल. नक्कल केलेल्या चित्रपटाची प्रक्षेपण दर्जा डीव्हीडीइतकीच दजेदार असेल. किंबहुना , ज्या चित्रपटाचा प्रक्षेपण दर्जा चांगला आहे , त्यांचीच आपण या संकेतस्थळावर निवड केल्याचं नानूभाईंनी सांगितलं. हिंदी , तमिळ आणि तेलुगु सिनेमाचे प्रथम पाहण्यासाठी एक डॉलर आणि तो नंतर पाहण्यासाठी दोन डॉलर असे चाजेर्स असले तरी मराठी चित्रपट मात्र फुकटात पाहता येणार आहे.

मराठी सिनेमाच्या वितरणाचं क्षेत्र विस्तारणाऱ्या या संकेतस्थळामुळे निर्मात्यांना उत्पन्नाचा नवा राजमार्ग मिळाला आहे. मराठी चित्रपट वैश्विक करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

-------------------------------------------------------------------

वरील मूळ वृत्त इंग्रजी शब्दासाठी संपादित केलेले आहे.