अंड्याचे पॅटीस

  • चार मध्यम आकाराचे बटाटे
  • चार कच्ची अंडी
  • पाव वाटी नारळ
  • आले, लसूण, हिरवी मिरची, मीठ चवीप्रमाणे
  • वाळलेल्या पावाचा चुरा
  • परतण्या/तळण्यासाठी तेल
१५ मिनिटे
चार जणांना मधल्या वेळच्या खाण्याला

बटाटे व अंडी उकडून गार करून घ्यावीत.

ओले खोबरे, आले, लसूण, हिरवी मिरची, मीठ (आवडी/पसंतीप्रमाणे लिंबू, कोथिंबीर) वाटून चटणी करून घ्यावी. थोडक्यात, ओल्या नारळाची चटणी ज्याप्रकारची आवडते त्याप्रमाणे करून घ्यावी.

बटाटे कुस्करून ठेचून घ्यावेत. लगदा कणकेसारखा एकजीव व्हायला हवा. लगदा फार चिकट वाटल्यास वाळलेल्या पावाचा चुरा गरजेप्रमाणे घालावा. पण लगदा फार कोरडा व्हायला नको. चवीपुरते (बटाट्यापुरते) मीठ घालावे.

अंड्यांचे उभे (प्रत्येकी दोन) काप करावेत.

बटाट्याचा लगदा एक गोळी (टेबल टेनिसच्या चेंडूच्या आकाराचा) घ्यावा आणि किंचित पाणी लावून त्याची एक उथळ व पसरट दिवली करावी.

त्यावर चटणीचा एक छोटा थर लावून चिमूटभर मीठ (अंड्यापुरेसे) शिंपडावे. त्यावर अर्धे अंडे (कापलेला भाग खाली करून) ठेवावे. वरच्या घुमटावरही चटणी पसरून मोदक मिटतो तसा लगदा अंड्याभोवतीने मिटावा. लगदा अपुरा पडल्यास भर लावावी.

हा मुटका वाळलेल्या पावाच्या चुऱ्यात घोळवावा आणि आवडीप्रमाणे (आणि तब्येतीप्रमाणे) परतावा (शॅलो फ्राय) किंवा तळावा (डीप फ्राय).

जितका बटाट्याचा थर खरपूस (हे परतताना छान जमते) तितकी चव खुलून येते. चटणी आतच असल्याने बरोबर काही लागत नाही.

तरीही सवयीचे गुलाम टोमॅटो सॉस घेतीलच.

(१) अंड्यांचे दोनाऐवजी तीन कापही चालती. चार काप केले तर मात्र कोंबडी-मसाला यांचे चार आणे-बारा आणे होण्याची शक्यता आहे. तरीही, आवड हाच गुरू.

(२) मुटका पावाच्या (ओला करून पिळलेल्या) कापावर ठेवून त्याचा महा-मुटका करून परतला/तळला तर पोट अजून थोडे भरते.

(३) एक टंपरभरून चहा आणि असले दोन पॅटीस रविवारी संध्याकाळी साडेचार-पाचला हाणले की खुशाल साडेआठ-नवापर्यंत पत्ते/बुद्धीबळ मांडावे. कावळे हूं का चूं करत नाहीत. (गृहमंत्री गप्प बसण्याची गॅरंटी नाही; ते तेवढे स्वतःच्या ताकदीवर निभावावे)

(४) अंडी आणि त्यातील कोलेस्टेरॉल... कुणाला उत्साह आलाच तर थोडे पाणी ओतून ठेवतो!

पारंपारिक