ओळख

शास्त्री, इमाम तेथे षौकीन देखतो मी
वस्तीत चांदण्यांच्या सत्संग साधतो मी


नजरेत सज्जनांच्या बदनाम होत गेलो
अंधार वेचण्याच्या धर्मास जागतो मी


पारावरील मुंज्या दिसतोय ओळखीचा
माझाच चेहरा का त्याच्यात पाहतो मी


बोलांतही पुराणे संदर्भ ते न उरले
गोतावळ्यात परका होऊन राहतो मी


तू टाळलेस मजला, हे दु:ख जीवघेणे
थोडे तरंग त्याचे, तुझियात शोधतो मी


विसरून जा म्हणोनी, झालीस मोकळी तू
आजन्म आठवांचा सहवास सोसतो मी


रुसवा असेल लटका, ऐसा कयास माझा
माझीच, हाय, आता, समजूत काढतो मी


ना कोणते तराणें, नलगे अता उखाणें
करुणाष्टकांत आता पुरुषार्थ मानतो मी


पायी रुतून काटा, आनंदुनी म्हणाला
ही टाच ओळखीची, पाऊल जाणतो मी


सार्‍या जुन्या खुणांना उचलून काळ गेला
का यौवनास सरत्या, ऐन्यात धुंडतो मी