मराठी आणि गणेशोत्सव.

गणेशोत्सवात जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र हा रस्स्त्यावर आलेला असतो. एक प्रचंड उत्साह हा रस्स्त्यावर ओसंडून वाहत असतो. या निमित्त्याने पुण्यामध्ये इतर शहरातील नागरिक हा उत्सव पाहण्यासाठी आलेले असतात / येत असतात.

या गोष्टीचा लाभ आपल्याला मराठीच्या प्रचारासाठी अथवा प्रसारासाठी करता आले तर कितीतरी बरे होईल.

माझ्या मनात एक कल्पना येते की आपण मनोगतवर "शब्दसाधना" नावाचा उपक्रम राबवला होता. त्यातील १००/१२५ शब्दांना परत संकलित आणि संपादन करून एक हस्तपत्रक ( हँडबिल) बनवावे आणि सर्वसाधारणपणे जेथे मराठी भाषिक ज्या मंडळाला भेट देतात तेथे हे पत्रक लोकांमधे वितरीत करावे. लोक मौजमजा अथवा गंमत म्हणून यावर चर्चा करतील आणि नकळत मराठीमध्ये परकीय शब्दाच्या धुमाकूळ जो चालला आहे त्याला सर्वसाधारण लोकांमध्ये अटकाव बसेल आणि मराठी शब्दांना नकळतच प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कदाचित हा प्रयोग अयशस्वी सुद्धा होईल. लोक पत्रक पाहतील आणि फेकुनही देतील. एकंदरतीच १०००० पत्रकांना रु.२००० च्या आसपास खर्च येईल असा प्राथमिक अंदाज आहे. अंदाजे १००००*३ लोकांपर्यत जाण्यासाठीचा हा खर्च अल्पच समजता येईल.

माझ्या मनातील विचारांना मुर्त स्वरुप द्यावे म्हणून मी हे प्रकट करत आहे. मनोगतींनी दोन्ही बाजूनी आपापले साधक आणि बाधक विचार मांडावेत ही विनंती.

केवळ शब्दसाधनाच नव्हे, मराठीमध्ये अनेक मासिके, पाक्षिके, लेख इत्यादी प्रकाशित होत असतात. मराठीभाषिकांनी याचे प्रकाशन, वितरण या महाउत्सवात करावे ही सूचना.

असे उपक्रम केवळ पुण्यातच न ठेवता शहर, गाव आणि खेड्याच्या पातळीवरही राबवता येतील. या विचाराला सक्रिय साह्य करावे आणि या जाहिरातीच्या युगाचा पुरेपूर वापर करून घ्यावा.

इतकेच कशाला लहान लहान मंडळामध्ये अनेक स्पर्धा होत असतात त्यात मराठी पाढे, कविता, शब्द -प्रतिशब्द असे उपक्रम राबवावेत आणि त्यासाठी छोटामोठा पुरस्कारही द्यावा.

करण्यासाठी बरेच काही आहे हे सिद्ध करून दाखवावे.

द्वारकानाथ कलंत्री

(कोणीही कधीही मला संपर्क करु शकेल.)