जाणीवपूर्वक जगा

माणसाचा जन्म हिंदू धर्म संकल्पनेनुसार चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर प्राप्त होतो.याजन्मात भक्तीद्वारे ईश्वराला प्रसन्न करून 'जन्म-मृत्यू'च्या चक्रातून सुटका करून घ्यायची,असे संत-महात्मे सांगतात.पण बहुसंख्य माणसे याकडे दुर्लक्ष करुन माया-मैथूनात अडकून पडतात व जन्म-मरणाच्याचक्रातून बाहेर पदू शकत नाहीत̱. गर्भावस्था,बालपण,लहान-मोठे आजार,शारीरिक व्यंगे आणि मर्यादा,शिक्षण ग्रहण काळातील कष्ट आणि तणाव ,त्यानंतरचे व्यवसाय-नोकरीतील ताणतणाव,भिन्न-लिंगी जोडीदार व त्याबाबतचे ताणतणाव,विवाहानंतरचे ताणतणाव,अपत्य असण्या-नसण्या संदर्भातील ताणतणाव,वृथाच बाळगलेले आत्मसन्मानाचे ओझे आणि अचानक,अवेळी,अपेक्षा नसताना येणारा मृत्यू किंवा कोणत्याहि कारणामुळे हवा- हवासा वाटणारा,पण न येणारा मृत्यू,असे माणसाचे सर्वसाधारण जीवन असते.

      तरीही काही माणसांचे जीवन वेगळे असते.त्यांच्या चेहऱ्यावर ताणतणाव दिसत नाहीत.चेहरा आनंदी,हसरा असतो.अशी माणसे सतत उत्साही असतात.ती तक्रारी सांगताना दिसत नाहीत.अशी माणसे ,आसपासच्या इतर माणसाना काही ना काही मदत करताना दिसतात.आपल्याबद्दल कोण प्रतिकूल बोलत आहे वा कोण स्तूती करत आहे ,याबद्दल ते विचार करत नाहीत‌.सतत  उद्योगात मग्न असतात.कागदाचा कपटा टाकून देतानासुद्धा ते आधी विचार करतात कि याचा कुठे उपयोग होईल काय?बोलताना मृदू आवाजात बोलतात. लहान मोठ्यांची चुक गोड शब्दात,लक्षात आणून देतात.''मी एकदाच सांगेन,पुन्हा चुक केलीस तर कानाखाली आवाज काढीन''अशी त्यांची भाषा नसते. दया आणि क्षमा यांचा अक्षय साठा त्यांच्याकडे असतो. त्यांचे बोलणे सतत ऐकत रहावे,त्यांच्या सान्निध्यात सतत रहावे,अशी त्यांची वर्तणूक असते. अशा माणसांनाच सज्जन असे म्हटले जाते. ''कोणत्या आगळया वेगळ्या शक्तीमुळे '' ही सज्जन मंडळी अशी होतात बरे ?

    ती शक्ती आहे जाणीव ! कान्शसनेस !! दुर्मिळ मनुष्य जन्माची ,त्याच्या नश्वरतेची ,त्याच्या असीम कर्तव्य-शक्तीची ! या जाणीवेमुळे - या ज्ञानामुळे अशी माणसे सतत जाणीवपूर्वक,गंभीरतापूर्वक अपले आचरण ठेवतात,.कर्मे करतात आणि त्यापासूनच्या फ़ळाबाबत मोह धरत नाहीत‌.सर्वच माणसांनी असे जाणीवपूर्वक आचरण ठेवले तर सर्वांचे जीवन आनंदी होईल.बहूसंख्य माणसे स्वत:ला शहाणा म्हणवितात,ज्ञानी समजतात,पण जाणीवपूर्वक वागत नाहीत‍‍. जे करणे आवश्यक असते ,ते करत नाहीत.व्यर्थ काळ दवडतात.कोणालाही विचारा,''काय कसे आहात ?सध्या काय करताहात ?'' उत्तर असते,''काही विशेष नाही.बस्स,टाईम पास चालू आहे'' सर्वच वयोगटातील माणसे वरील प्रकारे वागताना दिसतात.मुठभर माणसे काहीतरी करतात अन असंख्य माणसे फ़क्त 'बघत' बसतात. अशा बेभान -नेणीवेत जगणाऱ्यांचे शेवटी काहीही होत नाही. अशांचे श्वासोच्छ्वास अचानक एखाद्या दिवशी थांबतात आणि त्यांचे अचेतन देह जाळून नष्ट केले जातात किंवा जमिनीत गाडूनटाकले जातात‌‌. 'स्वर्गीय','कैलासवासी' किंवा आणखी कोणतेही शब्द अशा माणसांच्या नावापूर्वी जोडल्याने ,त्यांचे आस्तित्व साकार होत नाही.

     माणसांना सुख,समाधान व आनंद यांची आस असते.भौतिक दृष्ट्या प्रत्येक बाबतीत 'अनकुलता' असण्यात वरील आस पूर्ण होवू शकते.ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ज्ञानेश्वरी मध्ये जे  ''पसायदान'' मागितले आहे , ते जर सर्व शक्तीमान परमेश्वराने ''तथास्तू'' म्हणून देवू करण्याचे मनात आणले आणले तरी  प्रत्यक्षात ते अवघड ,अशक्य असेच आहे.म्हणूनच परमेश्वराने ''तथास्तू;; म्हटले नसावे.ज्ञानेश्वरानी ईश्वराकडे ''पसायदान'' मागताना ''जो जे वांछील,तो ते लाहो/प्राणीजात //''ही मागणी करायला नको होती.या मागणीने ईश्वरालाही विचारात पाडले.कारण ही मागणी पूर्ण करावयाची म्हटले तर अशक्य ते शक्य करणे,होय.प्रत्येकाला आलिशान बंगला,मोटारी,धन-धान्य,सुवर्ण-मोतीऱ्हिरे-माणके एकवेळ देता येतील परंतु बंगले स्वच्छ ठेवायला,बाग-बगिच्यांच्या देखभालीसाठी,सेवा करण्यासाठी,मोटारी चालविण्यासाठी,ओझी वाहण्यासाठी,लहान मुले सांभाळण्यासाठी,आजारी व्यक्तीची सेवा करण्यासाठी माणसे कोठून देणार?एव्हढी सारी संपन्नता असल्यावर एक माणूस दुसऱ्याची सेवा करण्यास कसा तयार होणार ? पण या सर्व भौतिक सुखांचा त्याग केलेल्या ज्ञानेश्वरांच्या लक्षात ,पसायदान मागताना ही गोष्ट लक्षात आली नाही.त्यानी ईश्वराची ही पंचाईत करून ठेवली.त्याला युगानूयुगे ''वीटेवर उभे राहणेच परवडले!

     जाणीवपूर्वक जीवन जगणे, तसे पाहू जाता कठीण नाही.कळत नाही,असा मनुष्य विरळाच ! प्रत्येकाला कळत असते. कळत असूनही माणूस,त्यानूसार आचरण करत नाही‌. सर्व साधारणत:   शिक्षण पूर्ण होवून अर्थाजन सुरू होईपर्यंतचा कालावधी हा त्याला अजून कळत नाही,असे मानण्याचा असतो.परंतु वस्तूस्थिती तशी नसतें. नुकतेच जन्मलेले मुल सुद्धा त्याचे आई-बाबा ओळखते. लहान मुलांना आपले घर व परक्यांचे घर कळते. मिळालेले खेळणे आपलेच आहे व ते दुसऱ्याने मागितले  तरी द्यायचे नसते,हे त्याला कळते.आवडते-नावडते त्याला कळते.प्रेम आणि राग यातील फ़रक त्याला कळतो.वाढत्या वयाबरोबर योग्य-अयोग्य,खरे-खोटे  हे सर्व त्याला कळत असतेच.परंतु आळस,अल्प कष्टात किंवा कष्ट न करता इच्छिलेल्यागोष्टींची प्राप्ती व्हावी,असा मोह  आणि जाणीवपूर्वक जीवन जगण्याकडे दुर्लक्ष यामुळे माणूस सामान्य-अतिसामान्य होतो. ‌श्वास-उच्छ्वासाची ही शृंखला एका अनपेक्षित क्षणी तुटते आणि माणूस संपतो! बहुसंख्य माणसांच्या बाबतीत हे असेच घडते̱. घडत आलेले आहे.भविष्यकाळ अनंत आहे.पुढेही असेच घडत राहणार आहे.

मात्र पूर्ण जाणीवपूर्वकजीवन जगणारी माणसे वर्तमान,भूत आणि भविष्य या तीनही काळावर मात करुन आपले जीवन आनंदी,सुखी व समाधानपूर्वक जगतातच आणि आपल्या कर्तृत्वाच्या खुणा मागे ठेवून ,शरीराचा त्याग करतात.