सर्वत्र धूसर निळा प्रकाश पसरला होता. पायतळी त्याच प्रकाशाच्या पायघड्या होत्या, पण ते जे काय होते ते घन आहे, द्रव आहे की वायू आहे हे समजत नव्हते. डोक्यात घनदाट सर्दी भरलेली असताना सर्व जगाकडे पाहण्याचा एक निरीच्छ दृष्टीकोन जसा आपोआपच आपल्या नजरेत विरघळून जातो तसे त्याला वाटत होते.
नव्हे, तसे नव्हे. कारण सर्दी भरायला आपल्याला डोके आहे, दुखायला अंग आहे, हुळहुळायला नाक आहे, पाणी वाहवायला डोळे आहेत या सर्व अनुभूती त्या निरीच्छतेत गुंतलेल्या असतात. आत्ता याक्षणी मात्र त्याला देहातील एकाही अवयवाची जाणीव होत नव्हती. आपण चालत आहोत, पोहत आहोत की उडत आहोत... सगळे काही धुक्याच्या पडद्याखाली होते. 'आपण कुठेतरी चाललो हे तरी का म्हणावे मग?' या एका मनाच्या प्रश्नाला 'आपण थांबलो आहोत हे तरी का म्हणावे मग?' असा प्रतिप्रश्न दुसऱ्या मनाने केला होता. शेवटी धूसर निळसर प्रकाश जाणवतो आहे, म्हणजे दिसण्याची अनुभूती शिल्लक असावी असा सौम्य विचार करीत तो चालला/थांबला होता.
प्रकाशाची घनता सतत पण हळूहळू बदलत होती. कधी ती तीव्र होत होत आता सहन होणार नाही अशा तेजाने झळाळू लागे, आणि क्षणार्धात कमी कमी होत अंधाराच्या कड्यापर्यंत घेऊन जाई.
हळूहळू त्याला अजून काही आकृत्या जाणवू लागल्या. त्या सर्व त्याच्यासारख्याच चालल्या/थांबल्या होत्या. दिसण्याची अनुभूती पणाला लावून त्याने त्या इतरांचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण काही धड दिसेल तर शपथ. ना देहाचा स्पष्ट आकार, ना चेहऱ्याच्या जागी काही. आणि आवाज तर काहीच येत नव्हता. त्याने बोलणे नाही तर नाही, विचार तरी प्रक्षेपित करता येतात का? हा प्रयत्न मन लावून केला, आणि अखेर तो नाद सोडला.
काही काळ लोटला. किती ते कळले नाही. देहच जाणवत नव्हता तर त्याला हात कुठून असणार? आणि त्या हातावर घड्याळ कुठून येणार? इथे सत्यसाईबाबा अवतरले तर ते काय चमत्कार करतील? ना घड्याळ घालायला मनगट, ना अंगठी घालायला बोट, ना अंगारा लावायला कपाळ! या विचाराने तो मनाशीच हसला. छे! तेसुद्धा कल्पनेतच. आवाज आला नाही, गाल ताणले गेले नाहीत, डोळे मिचमिचले नाहीत तर ते हसणे कसले?
हळूहळू प्रकाशाची तीव्रता स्थिर होऊ लागली. समोर एक भव्य चौकटीचे दार दिसू लागले. मात्र त्या दाराच्या दोन्ही बाजूंना भिंती अजिबात नव्हत्या. ते दार हळू हळू आपल्या जवळ येत असल्याचे त्याला जाणवू लागले. बघता बघता तो त्या दाराच्या पार पोचला.
स्वच्छ दिसेल अशी आणि एवढी एक आकृती त्याचीच वाट पहात बसली होती. त्या आकृतीला चेहरा मात्र नव्हता. सर्व देहावर लपेटलेले वस्त्र तलमपणे चमकत होते.
"तुला इथे का आणले आहे असा तुला प्रश्न पडला असेल"... तो आवाज खर्जातील वीणेच्या तारेसारखा झंकारला.
"ह्यॅ! प्रश्न कसला?" त्याचा आवाज चक्क उमटला. तोही नेहमीसारखाच. किंचितसा नाकातून, आणि शब्दोच्चार अतिस्पष्ट असा.
"मेल्यावर येणार कुठे? स्वर्गात नाहीतर नरकात! आणि माझ्यासारखे नास्तिक तर नक्कीच रौरव की काय त्यात जाणार असे मरण्याआधी सर्वांनी बजावून सांगितले होते. पण नरकाच्या मानाने हे फारच सुसह्य दिसते. कमीजास्त होत जाणारा प्रकाश आणि हरपलेल्या संवेदना एवढेच? ... पृथ्वीवर तर हे अनेक वेळा स्वेच्छेने अनुभवलेले होते!"
"हा स्वर्गही नव्हे आणि नरकही. इथे आधी हिशोब होईल, आणि मग तुला योग्य स्थळी पाठवले जाईल" वीणा परत झंकारली.
"अरे वा! हिशोब करणारे म्हणजे तुम्ही चित्रगुप्त दिसता! वा! वा! मग कृपया सनदी लेखापालासारखे प्रत्येक गोष्टीला आडवे जाण्याआधी माझे म्हणणे ऐकून घ्या."
चित्रगुप्त काही बोलला नाही. मौन हाच हुंकार असे मानून त्याने गाडी मारली.
"माझा जन्म एका उच्चमध्यमवर्गीय घरात झाला. आई, वडील, त्यांचे वात्सल्य यांची मला हळूहळू जाणीव होऊ लागली. मोठे सुखात चालले होते दिवस. मी म्हणेन ते हजर करायला वडिलांकडे पैसा होता आणि आईकडे इच्छा. निराशा अशी मी कधीच अनुभवू नये म्हणून त्यांचा आटापिटा चाललेला असे."
"अचानक एक दिवस आईला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. बघता बघता उसळणाऱ्या लाटा ओसरून ओहोटी यावी तसे तिच्या अंगातले चैतन्य निचरून गेले. पांढुरक्या पडलेल्या त्या देहाला मी अजूनही बिलगायचा प्रयत्न करीत असे. तीही बिचारी आपले नीरस हात माझ्याभोवती कवटाळी. पण ती संवेदना रसरशीत ओसंडून वाहणाऱ्या 'पूर्वीच्या' आईसारखी नव्हती हे मला तेव्हाही कळत होते. निसर्गचक्राप्रमाणे एक दिवस ती गेली. कोसळून पडलेल्या वडिलांनाच सावरायला माणसे लागली, तिथे माझ्याकडे कोण लक्ष देणार? चार नोकरांनी माझ्या आईचा देह नेऊन जाळला तेव्हा तिथे त्यांची नजर चुकवून हजर रहाणारा पाचवा म्हणजे मी. मी तिथे आहे हे कळायला त्या चौघांपैकी कुणीच शुद्धीत नव्हते म्हणा!"
"रोज मला अंघोळ घालणाऱ्या, कपाळावर आपले लालबुंद ओठ ठेवणाऱ्या, झोपताना हळुवार थोपटणाऱ्या आईला असे भडाभडा जळताना पाहून मी मुळापासून हललो. माझा एक भाग माझ्यापासून विलग झाला आणि त्या जळणाऱ्या देहाबरोबर जळून गेला. तरीही उरलेल्या भागाचे जगणे सुरूच राहिले"
"जवळजवळ त्या पाठोपाठच एका अपघातात वडील निवर्तले. तो अपघात नव्हता तर आत्महत्या होती अशा मसालेदार चर्चेने नियतकालिकांची पाने बरबटली. केवळ माझे आई-वडील अभिनेते होते म्हणून त्यांच्या खाजगी आयुष्याचा असा पंचनामा व्हायलाच हवा होता? मला तर त्यांचा अपघातात आधीच जळालेला देह 'कायदेशीररीत्या' जाळल्यानंतरच कळवण्यात आले. आतापर्यंत मला आधार देणारा माझा एक मोठा भाग परत विलग झाला आणि निघून गेला."
"पोलिओ झालेल्या पांगळ्याने खुरडत सरकत रहावे तसा यथावकाश मोठा झालो. ताकद परत आली. शिक्षण पूर्ण केले. नोकरी-व्यवसाय करण्याऐवजी 'कथा लिहून जगू' असा माज केला. वडिलांनी त्यासाठी पुरेसे पैसे अर्थात ठेवले होते."
"हळूहळू 'अमूर्त कथाकार' म्हणून माझी ख्याती होऊ लागली. बहुतेक जणांना मी काय लिहितोय ते 'जाणवत'च नसे म्हणा. कळत नसले तरी, 'आपण कशाला मागे रहा' म्हणून सर्व प्रथितयश टीकाकारांनी माझा गणपती बसवायला सुरुवात केली."
"आणि एका अवघड वळणावरती 'ती' भेटली. "कथाकारांशी गप्पा मारा" या किंवा अशाच बालिश कार्यक्रमात. "आपल्या साहित्यसाधनेत व्यत्यय आला तर आपली त्यावर काय प्रतिक्रिया असते" या वाह्यात प्रश्नावर मी काय उत्तर देतो याची वाट पहात बसलेल्या समुदायात ओठांवर चमचाभर हास्य तिरके पसरून बसलेली. तत्क्षणीच आमची गाठ जुळणार हे जाणवले. तशी ती जुळलीही."
"पुढचा बराच काळ आम्ही धुंदीत व्यतीतला. या पहाटेला रात्र नाही, आणि या रात्रीला पहाट नाही असा."
"आणि एक दिवस आम्हाला लख्ख जाणवले की आमची संयुक्त वाट आता सरली आहे"
"विभक्त होण्याचा निर्णय घेताना रडारड, आदळआपट करण्याचा निरर्थकपणा आम्ही केला नाही. पिकल्या केळ्यापासून साल निघावे तितक्या सहजतेने आम्ही विलग झालो. पण त्याक्षणी माझ्यातला एक, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा, भाग मला अतीव वेदना देत विळखटून माझ्यापासून मोकळा झाला. 'मी आता उरेन का? आणि का उरावे?' असे प्रश्न पेरून"
"तरीही मी उरलो. आता शब्दच नकोत म्हणून लिखाणाला कायमचा निरोप देऊन चित्रकलेच्या मागे लागलो. इंद्रधनुष्यी रंगांनी माझा ताबा घेतला. पण एखादे अंतर्बाह्य झळाळून उठणारे दृष्य पहाताच क्षणभर का होईना उफाळणाऱ्या शब्दांना पाण्याखाली दडपून हाती कुंचला घेताना जीवघेण्या यातना होत. सवयीने ते जमले. पण शब्द एवढ्या सहजी नाही गेले. खेकड्यासारख्या सहस्त्र नांग्यांनी ओरबाडून, रक्त ठिबकत ते गेले"
"अखेर मी स्वतःच जीवनविच्छेदाचा निर्णय घेतला, स्वतःच्याच कपाळात गोळी झाडली, आणि इथे आलो".
"माझा प्रश्न असा आहे, की मी जर गोळी झाडल्यामुळे मेलो, तर आधी गेले ते कोण? ते माझे घटक होते की नाही? ते माझे 'विभाज्य', दुसऱ्या शब्दात निरर्थक (ज्यांच्यावाचून मी जगू शकेन असे) घटक होते का? तसे असेल, तर आयुष्याचा काही काळ का होईना, त्यांनी माझ्या सर्व जाणीवा कशा पेलल्या? कधी कधी तर 'यावाचून मी जगू शकत नाही. यांच्या वियोगापेक्षा मरण बेहत्तर' अशा भावना कशा उचंबळवल्या? त्या त्या व्यक्तींच्या साथीत अनुभवलेल्या क्षणांना अशी सोनेरी झळाळी का आली?"
"आनंदाच्या उत्कट क्षणी उमटलेला निःश्वास, 'आपल्या' कुणाला थोपटताना आपल्या हातात अवतरलेली मृदू कोमलता, 'हे अवघे जीवन तुझ्यासाठी' अशा घेतलेल्या आणाभाका, सर्व सर्व खोटे?"
"तर मग खरे असे ते काय? जिभेचा लाकडी डाव करून निरीच्छतेचे जीवन जगणारी 'आचार्य' मंडळी? त्यांना जन्माआधीच इकडे आणून त्यांची (आणि त्यांच्या तावडीतून इतर सर्वांची) सुटका का करीत नाही तुम्ही लोक?"
"आणि हा माझा 'अखेरचा', 'खरा खरा' मृत्यू कशावरून? अजून एखादा आयुष्य ओवाळून टाकावा असा अनुभव येणारच नाही याची काय खात्री?"
त्याचा नाकातला स्पष्ट आवाज गुंजत नाहीसा झाला.
चित्रगुप्ताने आपला पसारा आवरायला सुरुवात केली.
"तू प्रश्न फारच विचारतोस बाकी" वीणा झंकारली. "केवळ तू इथे आलेला 'मर्त्य' मानव आणि मी चित्रगुप्त म्हणून मला सर्व माहीत असलेच पाहिजे असा तुझा हट्ट का?"
"मला माहीत आहे ते एवढेच, की असे प्रश्न विचारणारा कुणी आला की गादी मोकळी करायची आणि पुढे चालायला लागायचे. आता 'पुढे म्हणजे कुठे?' हा प्रश्न जर तुला असेल तर तो मलाही आहेच. आणि त्याचे उत्तर मला चालायला लागल्यावरच मिळणार आहे अशी माझी समजूत घालण्यात आली आहे. ती खरी की खोटी हे मी निघाल्यावरच ठरवेन. परत असे घडेपर्यंत ही गादी सांभाळ"
चित्रगुप्त पुढच्या वाटेला लागला.