'उत्तरमामायण' - मधुकर तोरडमलांची चौथी घंटा

मधुकर तोरडमलांचे 'तिसरी घंटा' हे आत्मचरित्र प्रसिद्धच आहे. तोरडमल त्यामानाने तरुण आणि कार्यमग्न असतानाच ते लिहिले गेले.

त्याला पार्श्वभूमी अशी की अरुण सरनाईक या त्यांच्या अभिनेत्या मित्राचे अपघाती निधन झाले. ते होण्याअगोदर त्या दोघांचे असे ठरले होते की सरनाईकांनी आत्मचरित्र सांगायचे आणि तोरडमलांनी ते लिहायचे. त्यासाठी पंधरा दिवस पन्हाळ्याला जाऊन रहायचे असा बेतही शिजत होता. आणि अचानक अपघात झाला.

आता आपलेही असेच काही झाले तर? आत्ता सुचते आहे तोवर लिहून काढावे म्हणून त्यांनी 'तिसरी घंटा' वाजवली. मात्र त्यानंतरही तोरडमल दोन अडीच दशके कार्यरत राहिल्याने अनुभवांचे संचित साठतच गेले. 'उत्तरमामायण' (तोरडमलांचे टोपणनाव 'मामा' हे विदीत आहेच) हे त्याचे लिखित प्रतिबिंब.

मात्र हे एका दिशेने जाणाऱ्या प्रवाहासारखे नेहमीसारखे आत्मचरित्र नसून सुचतील तशा सांगितलेल्या आठवणी असे त्याचे स्वरूप आहे. मात्र हे पुस्तक स्वतःच्या पायावर उभे आहे. 'तिसरी घंटा' वाचले असल्यास काही संदर्भ जास्त सहजतेने जुळतील. पण ते वाचले नसल्यास काही अपुरे वाटणार नाही.

गांधीवधातील एक जन्मठेपी आरोपी विष्णू करकरे हे नगरचे. पकडले जाण्याच्या वेळेस ते नगरच्या नाट्यचळवळीत क्रियाशील होते. ते सुटका होऊन परत आल्यावर तोरडमलांनी त्यांची काही (नाटकातील) स्वगते आणि प्रवेश हे ध्वनीफितीवर नोंदवून घेतले. नंतर गप्पा मारताना त्यांच्या गांधीवधातील सहभागाबद्दलही बोलणे झाले. ते सर्व तोरडमलांनी हातचे राखून न ठेवता, पण आपला तोल ढळू न देता, लिहिले आहे.

बाबा, बुवा आणि महाराज यांबद्दल तोरडमलांना चांगलाच तिटकारा. त्याबद्दलच्या लेखात त्यांनी अगदी सणसणीत दांडपट्टा फिरवला आहे. केवळ लेखनासाठी लेखन न करता आपणही कुठेतरी बदलाचे वारकरी व्हायला हवे ही तळमळ या लेखातून दिसून येते.

'संत तुकाराम' या चित्रपटाचे रसग्रहण करून करून सर्वांनी एव्हाना त्याचे पार भुस्कट पाडले आहे. पण तोरडमलांची विवेचक दृष्टी त्यातही काही कंगोऱ्यांवर झोत टाकून मजा आणते.

नगरच्या नाट्यचळवळीचा आढावा घेणारा लेख अगदीच छोटा आहे. पण त्यातील ध्वनीमुद्रणाचे आणि प्रकाशयोजनेचे जे अनुभव नोंदलेले आहेत ते रंगभूमीवर (स्वतःहून) पाऊल टाकलेल्या कुणालाही वाचायलाच हवेत असे आहेत. आणि त्या लेखाच्या अखेरीसचे नव्या मंडळींचे अगदी 'आतून' आलेले कौतुकही.

मारोतराव आणि अर्जुनराव हा लेख विरस करतो असे म्हणत नाही, पण अगदीच रविवारच्या आवृत्तीचा संपादक मानगुटीवर बसलेला असताना लेख 'पाडावा' तसा तो वाटतो.

'तीन बालमित्रांची गोष्ट'मध्ये अगदी लख्ख आत्मचरित्र आहे. वैयक्तिक तपशील, स्थलकालसापेक्ष उल्लेख आदि.

'रहस्य गुलदस्त्यात आणि स्फोट भररस्त्यात' हा लेख नक्की काय आहे याचा अंदाज लागत नाही. तोरडमलांनी केलेला शोध-पत्रकारितेचा प्रयत्न वाटतो. पण त्यात मध्येच त्यांच्यातला लेखक जागा होऊन त्या घटनेत 'आत' शिरू पहातो. संगमनेरात चाळीसेक वर्षांपूर्वी घडलेला एक 'एन्काउंटर' हा या लेखाचा विषय.

अरुण सरनाईकांप्रमाणेच दत्ता भटांचेही तोरडमलांशी चांगलेच मैत्र जुळले होते. 'तिसरी घंटा'मध्ये त्यावर सविस्तर आहेच. 'कल्पक योजना, योजक कल्पना' या दत्ता भटांच्या तोंडी असलेल्या वाक्प्रचाराला मथळा करून लिहिलेला लेख छान खुसखुशीत झाला आहे.

तोरडमलांचे मद्यप्रेम त्यांनी कुठेच झाकून ठेवलेले नव्हते आणि नाही. 'गुजराथी दारूबंदी आणि मी' यात तत्संबंधी लिखाण आहे. मात्र 'तिसरी घंटा'मध्येही  यातील एका घटनेचे सविस्तर वर्णन असल्याने इथे द्विरुक्ती वाटते. मात्र दत्ता भटांच्या तोंडी असलेल्या रहस्यमय ओळी (आवडक चिवडक दामाडू, दामाडूचा पंताडू, पंताडूची खोड मोडली, हिरवा दाणा कुडकुडी) खासच!

'गुरूपौर्णिमा' या लेखात त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात भेटलेल्या काही गुरूंबद्दल लिहिले आहे. त्यात प्रभाकर गुप्त्यांनी केलेली पायांबद्दलची सूचना, किंवा दृष्टी गेलेले भालजी हातांनी तोरडमलांचा चेहरा 'बघून' जे सांगतात ते, परत रंगभूमीच्या वेड्यांना खुषावतील.

'ऑपरेशन पोलो' हे बरेचसे आत्मचरित्रात्मक झाले असते. पण स्वसापेक्ष उल्लेखांनी सुरुवात करून तोरडमल परत वर्णनात्मक पत्रकारितेकडे वळतात आणि जरा गडबड होते.

बाबा, बुवा, महाराज, चमत्कार यांचा तिटकारा असलेले तोरडमल 'त्र्यंबकेश्वर'सारखा लेख लिहितात याचे आश्चर्य वाटू शकते. पण त्यांच्या शेवटच्या ओळी खुलासा करतात. "हे अनुभव जसे आले तसे इथे कथन केलेले आहेत. त्यातून कुठलाच निष्कर्ष मी काढला नाही. कुणी काढला तर तो जाणून घ्यायला मला आवडेल".

'एक न केलेले नाटक' यात परत आत्मचरित्र उमटते. अर्थात वसंत कानेटकर हयात नसताना असे लिहावे का याबद्दल मतभेद होऊ शकतात.

'छंद' यात आत्मचरित्र बाजूला राहून एक हलकाफुलका ललित लेख सामोरा येतो. 'खवय्येगिरी'मध्ये थोडी वैयक्तिक उल्लेखाची फोडणी पडते, पण तोही आत्मचरित्रात्मक नसून ललित लेखच म्हणता येईल.

'आनंदयात्री' हा खरे तर समारोपाचा लेख. एकंदर सूरही तसाच लागला आहे. पण 'सामाजिक बांधिलकी आणि मी' लिहून तोरडमलांनी जाता जाता चार सटके ठेवून दिले आहेत!

आत्मचरित्रात्मक असूनही मुखपृष्ठावरील तोरडमलांचा फोटो (तोरडमलांची रुबाबदार छबी डोळ्यांसमोर असल्यास हा फोटो फारच केविलवाणा वाटतो) सोडल्यास एकही छायाचित्र नाही.

एकंदरीत, 'एक' पुस्तक म्हणून थोडे विस्कळीत वाटले तरीही त्याचा फारसा अडथळा वाचनानंदात येऊ नये.

प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन.

प्रथमावृत्ती: २४ जुलै २००७