सेतू!

मीमीभगवान श्री रामचंद्रांनी आपल्या सेतूकडे एक कटाक्ष टाकला आणि ते हनुमानाला म्हणाले, "हनुमान,किती वर्षं लोटली हा सेतू बांधून... तू आणि तुझ्याबरोबर सगळ्या वानरसेनेने मिळून किती कष्टपूर्वक आणि निष्ठेने हा सेतू पूर्ण केलात. हजारो वर्षं लोटली तरी वारा पाऊस ऊन आणि लाटा यांना तोंड देत तो आजही दिमाखात उभा आहे. परवा हैदराबादमधे बांधलेला तरुण पूल त्याच्या खांबांवर जाहिराती चिकटण्याच्याही आधीच कोसळताना पाहून तर मला तुम्हा सगळ्यांचं आणखीनच कौतुक वाटायला लागलं आहे. "

हनुमानाने प्रभू रामचंद्रांना भक्तिभावाने वंदन केलं आणि तो म्हणाला, " जय श्री राम.... हे प्रभू, ही सगळी आपलीच कृपा आहे. आम्ही तर फक्त आपलं नाव लिहून दगड पाण्यात सोडले होते. दुसरं काहीच नाही. ना टिस्को स्टील ना अंबुजा/एसीसी सीमेंट... पण हे इतकी जुनी गोष्ट आज आठवण्याचं कारण काय भगवन्?"

"हनुमान, पृथ्वीतलावरच्या काही लोकांना तो सेतू फोडून तिथं कालवा करायचा आहे. प्रकरणात मोठं घबाड अडकलेलं आहे. सेतू तोडणाऱ्याला गडगंज पैसे मिळतील. मग कालवा बांधणाऱ्याचं उखळ पांढरं होईल."

"मग आपण खाली आपली बाजू न्यायालयात का नाही मांडत प्रभू?"

"आता काळ बदलला हनुमंता.आपण खाली गेलो तर ते माझ्याकडे वयाचा दाखला मागतील. माझ्याकडे जन्माचा दाखला नाही आणि शाळा सोडतानाचं सर्टिफिकेट पण नाही. आयुष्यभर  पायी हिंडलो किंवा रथातून हिंडलो. आपल्याकडे साधा डायव्हिंग लायसन्स सुद्धा नाही रे. त्यातून ऍड्रेस प्रूफ मागितल्यावर तर मी काय करणार? कारण माझा जन्म अयोध्येला झाला की नाही यावर गेली पाऊणशे वर्षे नुसता राजकीय खल सुरू आहे. बरं एवढं सगळं होऊनही मी जर माझ्या रोजच्या वेषात दनुष्यबाणांसहित पृथ्वीतलावर गेलो तर काय होईल माहितेय? सर्वसामान्य भक्तमंडळी मला निश्चित ओळखतील. पण अर्जुनसिंग मात्र मी एखाद्या मागास जातीचा प्रतिनिधी आहे असं समजून मला आय आय टी मधे एक आरक्षित जागा देऊ बघेल. आणि प्रत्यक्ष प्रभू रामच जर थ्री पीस सुटात अवतीर्ण झाले तर नाझ्या लाखो अनन्य भक्तांचाही माझ्यावरचा विश्वास डळमळीत होईल. हा असा सगळा घोटाळा आहे बघ."

"मग मीही येतो तुमच्याबरोबर. मी सांगेन की मी हा सेतू स्वतःच्या हातांनी बांधला आहे."

"अंजनीसुता, त्याचा काही उपयोग होणार नाही रे... ते लोक तुला सेतूचे प्लॅन्स,  टेंडर, पैसा कुठून आणला, कंप्लीशन कोणी दिलं हे सगळं विचारतील. भारतात हल्ली कागदोपत्री पुराव्याशिवाय कुठलीच गोष्ट मान्य होत नाही. अगदी एखाद्या माणसाने छातीवर हात ठेवून आपण जिवंत असल्याची ग्वाही दिली तरी तो जिवंत आहे हे डॉक्टरने सिद्ध केल्यावरच त्याला जिवंत मानलं जातं."

"पण देवा, मला या इतिहासतज्ञांचं काही कळतच नाही हो. आजवर तुम्ही कितीतरी भक्तांना , संतमहंतांना दर्शन दिलंय. अगदी सूरदास, तुलसीदास, त्यागराज, जयदेव, रामदास , तुकाराम .... केवढी ही यादी आहे. आणि तरीही हे लोक म्हणतात की रामायण काल्पनिक आहे. आता यावर एकच उपाय आहे. आपण रामायण पुन्हा घडवून दाखवूया."

हे ऐकून मात्र प्रभू रामचंद्र हसले आणि म्हणाले," ते इतकं सोपं नाही रे. करुणानिधीसमोर आपण स्वतः संत दिसू आणि आपल्या कीर्तीला कलंक लागेल म्हणून रावणाने नकार दिलाय आणि सलमान तिथे आहे तोवर मी मुळीच येणार नाही असा मारीचाचा आत्ताच निरोप आलाय!"

--अदिती
(एका ई-मेलचं स्वैर भाषांतर.  काही चुका आढळल्यास उदार मनाने क्षमा करावी ही विनंती)