मृत्यूच्या कराल दाढेत काही तास- १

ग्रेग रॅस्स्म्युस्सेन ह्या ब्रिटिश तरुणाच्या आईवडिलांनी तो ११ वर्षांचा असताना तेव्हाच्या ऱ्होडेशिया (आताचा झिंबाब्वे) येथे स्थलांतर केले.  लहानपणापासूनच त्याला जंगलांचे आकर्षण होते व वन्यजीवनाबद्दल आस्था होती. तरुणपणी संधी मिळताच तो झिंबाब्वेमध्ये आफ़्रिकन रंगीत कुत्र्यांच्या संगोपनासंबंधित एका कार्यक्रमात सामील झाला. ह्याच विषयावर तो त्यावेळी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या झूऑलॉजी विभागात संशोधनही करू लागला. हे करत असताना त्याला कधीकधी त्याच्याच कामाशी निगडित अन्य स्थानिक कार्यक्रमांनाही मदत करवी लागे. असेच एक दिवस त्याला लुप्त होत असलेल्या ऱ्हायनोंच्या एका विशिष्ट जातींच्याबद्दल कार्यरत असलेल्या एका कार्यक्रमाला मदत करण्याचे काम देण्यात आले.  ह्या दिवशी त्याला एका माइक्रो विमानातून आफ़्रिकन झुडुपांच्या प्रदेशात ह्या जातीच्या एका ऱ्हायनोचा माग ठेवायचा होता. त्या भागात अनधिकृत शिकाऱ्यांनी ह्या जातीच्या ११ ऱ्हायनोंची हत्या केलेली होती, व हा एकमेव वाचला होता, त्याचा ठावठिकाणा शोधायचा होता.

त्या दिवशी ग्रेगने सकाळीच सिनामाटेला तळावरून एका मायक्रो-विमानातून एकट्यानेच उड्डाण केले. ३००० मीटरवर असताना त्या ऱ्हायनोच्या मायक्ऱोचिपमधून आलेल्या रेडियोलहरी त्याला सहज पकडता आल्या. त्याने त्या लहरींच्या दिशेने विमान वळवून एक हलकी झेप घेतली, तो ऱ्हायनो व्यवस्थित जिवंत आहे, हे निरखून घेतले व विमान परत वर नेण्याची तयारी तो करू लागला.  ३०० मीटर्स उंचीवर असताना त्याने एक हलके वळण घेण्याचा प्रयत्न केला, आणि काही समजायच्या अगोदरच त्याचा त्याच्या विमानावरील ताबा सुटला.  विमान हवेच्या झोतात सापडले होते, त्याचा उजवा पंख ६० अंशांतून वळला होता व विमान झपाट्याने जमिनीच्या दिशेने झेपावत होते. अशा प्रसंगी काय करावे हे शिकवलेले सर्व त्याने करून बघितले, पण व्यर्थ. जमीन झपाट्याने जवळ येताना त्याला दिसली, झुडुपे व खडक आता अगदी जवळ आले, व शेवटी विमान जमिनीवर जोरात आपटले.

काही क्षण ग्रेग तसाच निपचिप पडून होता. पेट्रोलची टाकी फुटली होती, व त्यातून गळणाऱ्या पेट्रोलचा त्याच्या तोंडावर शिडकावा होत होता, त्याने तो भानावर आला. कॉकपिटातून उतरण्याचा प्रयत्न करताना त्याच्या लक्षात आले की आपले दोन्ही पाय पूर्णपणे निकामी झाले आहेत. कसाबसा तो कॉकपिटातून जमिनीवर उतरला. जमिनीवर लोळण घेताक्षणीच त्याला आठवले की त्याने 'मे-डे' संदेश पाठवला नव्हता. तसे करणे जरूर होते म्हणून तो परत सरपटत कॉकपिटपर्यंत पोहोचला. पण रेडियो उपकरणाचा हँडसेट पार निकामी झालेला! बहुधा बॅटरी शॉर्ट झाली असावी, त्याला वाटले. आता जगाशी कसलाही संपर्क साधणे त्याला शक्य नव्हते.

काही वेळाने जीवघेण्या कळा सुरू झाल्या. नाकातून व कपाळाला झालेल्या जखमांतून रक्त ठिबकत होते, कदाचित काही फासळ्यांनाही जखम झाली असावी. पण तरीही तुलनेने त्याचा कमरेच्या वरचा भाग बऱ्यापैकी शाबूत होता. कमरेखाली मात्र त्याला कसलीच संवेदना उरली नव्हती.

जवळात जवळचा रस्ता ११० कि.मीं.वर होता, त्याचे जी.पी.एस. उपकरण चालू होते, पण त्याव्यतिरिक्त जगाशी कुठलाही संपर्क होणे शक्य नव्हते. त्याच्याजवळ ना पाणी होते, ना कसले अन्न. तसेच हिंस्र श्चापदांपासून संरक्षण करण्यासाठी जवळ कसलेही शस्त्रही नव्हते. ऱ्होडेशियाच्या खडतर प्रांतात राहून एक गोष्ट ग्रेग शिकला होता, ती म्हणजे अशा कठीण प्रसंगी आपल्याला उपलब्ध असलेली साधने व आपल्याला अवगत असलेल्या कुशलतेचा पूर्ण वापर करणे.

आता ग्रेगला त्याच्या पायांची काळजी घेणे जरूरीचे वाटू लागले होते. दोन्ही पायांचे घोटे खूप दुखत होते, व ते झपाट्याने सुजत होते. पायातले बूट लगेच काढून टाकणे अत्यावश्यक आहे, ह्याची त्याला जाणीव झाली. कारण तसे न केल्यास, पाय घोट्यांकडे सुजत असल्याने गँगरिन होण्याची दाट शक्यता होती. पण बूट काढणे हे आता सोपे काम नव्हते. एकतर पायांत अजिबात जीव नव्हता, दुसरे म्हणजे खाली वाकताही येत नव्हते. त्याला जवळच एक झुडुप दिसले. त्याचा टेकण्यासाठी वापर करून कसेबसे पायातले बूट काढता आले तर बघावे असे ठरवून तो सरपटत त्या झुडुपाकडे पोहोचला. ते एक काटेरी झुडूप निघाले, व त्याला टेकणे शक्य नव्हते. ग्रेगने त्याची सुमारे ३० सें. लांबीची, व टोकाला काटा असलेली एक डहाळी काढून घेतली. त्या काट्याचा उपयोग करून बुटाच्या लेसेस त्याने महत्प्रयासाने सोडवल्या. पण अगदी लेसेस पूर्णपणे बुटांतून काढून टाकल्या तरीही बूट काही पायांतून निघेनात. कारण पाय आता खूपच सुजले होते. शेवटी त्याने एक थोडीशी लांब फांदी घेतली, तिचे एक टोक बुटाच्या मागच्या बाजूकडे लावले, व दुसऱ्या बाजूने जोरात ढकलून बघितले. बूट पायातून निघाला होता. अशीच झटापट करून त्याने दुसऱ्या पायातूनही बूट काढला. ही सर्व बूट पायातून काढण्याची झटापट सुमारे दोन-अडीच तास चालली होती.    

आता मध्यान्ह झाली होती व सूर्य आग ओकत होता. तापमान सुमारे ४० डीग्रीज् से. असावे. तोंडाला कोरड पडली होती. आपण असेच उन्हात अजून काही काळ राहिलो, तर पूर्णपणे डिहाय्ड्रेट होऊ हे ग्रेगच्या लक्षात आले. जवळपास उन्हापासून बचाव करू शकू अशी सावली देणारी एकच जागा त्याला दिसत होती, ती म्हणजे त्याच्या विमानाचा सांगाडा. तो सांगाडा त्याच्यापासून काही मीटर्सवरच होता पण चालता येणे तर शक्यच नव्हते. आणि पाठीवर सरपटण्याचीही शक्ती त्याच्यापाशी नव्हती. तेव्हा त्याने उपडे पडूनच सरपटण्याच्या निर्णय घेतला. ज्या फांदीचा वापर करून त्याने बूट पायातून काढले होते तिच्या टोकाला त्याने लेसेसचा लूप करून बांधला. तो लूप त्याने एका पायात अडकवला व सरपटत, सर्व शक्तीनिशी त्या फांदीने पाय खेचत खेचत तो कसाबसा विमानाच्या सांगाड्याच्या दिशेने निघाला. इतक्यात कट् असा आवाज झाला. फांदी तर नीट शाबूत होती, मग हा आवाज कोठून आला? ग्रेगचे पेल्विस तुटले होते. तसाच प्रयासाने तो सांगाड्याखाली पोहोचला. आता पायांतून कमालीच्या जीवघेण्या कळा सुरू झाल्या. 'त्यांची आठवण झाली की अजूनही माझ्या डोळ्यांतून पाणी येते' ग्रेग लिहितो. तुटलेल्या हाडांचे छोटेछोटे तुकडे पायांतल्या मांसांत अडकले होते, व ह्या कळा त्यामुळे येत होत्या.

'आपण आतापर्यंत बऱ्यापैकी सुखी जीवन जगलेलो आहोत' ग्रेगला वाटले, 'तेव्हा आता मृत्यूला शांतपणे सामोरे जाणेच इष्ट' तो स्वतःशी म्हणाला. पण मग त्याला त्याचा आफ़्रिकन रंगीत कुत्र्यांचा अर्धवट असलेला कार्यक्रम आठवला. आपण सुरुवात केली होती, तेव्हा झिंबाब्वेमध्ये त्या जमातीतील फक्त ३५० कुत्रे उरलेले होते. आता ह्या कार्यक्रमामुळे त्यांची संख्या ८५० वर पोहोचली होती. 'अजून कितीतरी काम बाकी आहे' ग्रेगने स्वतःला बजावले. 'म्हणजे काहीही करून जगणे आवश्यक आहे तर!'.  

ग्रेगने एकदा मनातल्या मनात स्वतःच्या शरीरात काय चालले असेल त्याचा आढावा घेतला. 'एका पायाचे फ्युमर हाड तुटले तर सुमारे एक लिटर रक्त जाते. इथे तर दोन फ्युमर हाडे तुटली आहेत, म्हणजे दोन लिटर रक्त गेले आहे. ह्यामुळे आपल्या फुफ्फुसांना सध्या बराच कमी रक्तपुरवठा होत असला पाहिजे. ह्यामुळे आपल्या शरीरात सध्या ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे, ज्यामुळे लॅक्टिक ऍसिडची निर्मिती जास्त प्रमाणात होत आहे, आणि म्हणून तीव्र वेदना होत आहेत.' अचानक ग्रेगला आपली आई नेहमी करीत असे तो दीर्घ श्वसनाचा व्यायाम (प्राणायाम?) आठवला. आपण लहान असताना आईला उच्च रक्तदाबाचा त्रास होई. तेव्हा दिवसांतून एकदा हा व्यायाम ती करायची, व त्यामुळे तिला खूप आराम पडे, हे त्याला आठवले.  दीर्घ श्वसन केल्याने शरीलाला ऑक्सिजनचा पुरवठा वाढेल, हे लक्षात घेऊन ग्रेगने तसे करायला सुरुवात केली. आणि वेदना थोड्याश्या सुसह्य झाल्या.

३:३० च्या सुमारास एक त्याच्या विमानासारखेच छोटेसे विमान वरून बऱ्याच उंचीवरून गेले. कदाचित त्याचा शोध चालू झालेला असेल, पण इतक्या उंचीवरून आपण त्यांना दिसू शकू का, ह्याबद्दल ग्रेगला खात्री नव्हती. संध्याकाळ होऊ लागली तशी ग्रेग हिंस्र श्वापदांच्यापासून बचाव कसा करता येईल ह्याचा विचार करू लागला. [float=font:vijay;color:000000;background;place:top;]एरवी त्याला हिंस्र श्वापदांची फारशी भीती वाटत नसे. जंगलात अनेक वेळा त्याची सिंहांशी वगैरे गाठ पडली होती. पण आजची परिस्थिती एकदम वेगळी होती.[/float] त्याने जवळच असलेले एक रोपटे उचकटले व आपल्या पायांवरून ते पसरले. ह्यामुळे काही फार होणार होते असे नव्हे, पण आता श्वापदांपासून बचाव करण्यासाठी जे जे काही करता येईल, ते ते करण्यास तो तयार होता.  बहुतेक सर्व जनावरे अनैसर्गिक आवाजाला घाबरतात, हे माहीत असल्याने ग्रेगने विमानाच्या सांगाड्यातून तुटून पडलेली एक ऍल्यूमिनियमची नळी उचलून घेतली. वेळप्रसंग पडल्यास विमानाच्या सांगाड्यावर ही नळी जोरजोराने आपटून तो आवाज करणार होता.  

इतक्यात ग्रेगला पडल्यापडल्याच हत्तींचा पायरव ऐकू आला. त्यांच्या अगडबंब देहाच्या मानाने हत्तींचा पायरव खूपच नाजूक असतो, त्यामुळे त्यांचा आवाज ऐकू येईयेईपर्यंत हत्तींचा कळप बऱ्याच जवळ येऊन पोहोचला होता. हत्ती तसे आक्रमक नसतात व माणसाला स्वतःहून काही करायला जात नाहीत, पण जर ते बिचकले, तर ते सरळ चाल करून येतात. तेव्हा शक्य तितक्या लवकर आपण इथे आहोत हे त्यांच्या लक्षात येऊ दे, असा धावा ग्रेग करू लागला. सर्वसाधारणपणे आपण वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला असावे, म्हणजे जनावराला आपला माग लागणार नाही, पण इथे त्याच्या नेमकी उलट परिस्थिती होती. आवाज करून त्यांचे लक्ष वेधणे उचित ठरले नसते, उलट हत्ती त्यामुळे बिथरले असते, तेव्हा शांतपणे पडून राहणे व 'वारा आपल्यावरून हत्तींच्या दिशेने वाहू दे, म्हणजे त्यांना आपला सुगावा लवकरच लागेल,' अशी आशा करणे एव्हढेच ग्रेगच्या हाती आता होते.

एकदम हत्तींचा चित्कार त्याच्या कानी पडला. आणि त्याचबरोबर हत्ती धावपळही करत आहेत हे त्याला जाणवले. कधी त्यांच्या पायदळी आपण तुडवले जातो, ह्याची आता ग्रेग वाट बघू लागला. पण काय आश्चर्य! चित्कार व पायरव हळूहळू कमीकमी होत गेले. हत्ती दूर जात होते. ग्रेगला रडावेसे वाटले. पण आत्यंतिक उष्णतेमुळे त्याच्या डोळ्यातले पाणी साफ आटून गेले होते.

रात्र जावयाची होती आणि संकटे अजून संपली नव्हती.

[क्रमशः]

['साउथ चायना मॉर्निंग पोस्ट' दैनिकाच्या 'पोस्टमॅगेझिन' ह्या रविवार पुरवणीत ऑगस्ट २००६ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखावर आधारित. तसेच 'बी.बी‌‌.सी.-- सायन्स अँड नेचर; व 'चॅनेल फ़ोर' ह्यांच्या संकेतस्थलांवरही ह्या घटनेविषयी व ग्रेग रॅस्समुस्सेन विषयी माहिती सापडते, तिचाही आधार येथे घेतलेला आहे].