मृत्यूच्या कराल दाढेत काही तास- २

निपचीप पडून राहिलेल्या ग्रेगला जवळपास काहीतरी हालचाल होत असल्याचे लक्षात आले. त्याने क्षीणपणे डोळे उघडून बघण्याचा प्रयत्न केला. हे जे काही आहे, ते जवळच होते आणि आकाराने खूप मोठे होते. काय असावे बरे? त्याने डोळे मिटून घेतले आणि कानोसा घेतला. आणि तो संपूर्ण हादरला. त्याच्या जखमी शरीरातील अवयव भीतीने ताणले गेल्याचे त्याला जाणवले आणि आपल्या श्चासोच्छ्वास खूपच जोरात होऊ लागला आहे, ह्याचीही त्याला जाणीव झाली. पायांच्या आवाजावरून त्याने ताडले की एक सिंहीण त्याच्या दिशेने हळूहळू येत होती. हळू पदरव, प्राण्याचा आकार--- आणि सिंह तर इतक्या सावधपणे येत नाही. नक्कीच ती सिंहीण होती.

आता ग्रेगलाच त्याच्या हृदयाची धडधड ऐकू येत होती. आजूबाजूला सारे शांत होते. मुश्किलीने त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. सिंहीण कुठवर आली आहे, हे बघणे जरूर होते. मान खाली करून त्या रेताड वाळवंटात पडलेला असता नुसती मान वर करणे हेही मोठे जिकिरीचे होते. पण ते करणे आता अनिवार्य होते. ग्रेगने हळूच मान वर केली. ह्या साध्या वाटणाऱ्या हालचालीमुळेही वेदना इतक्या होत होत्या की जोरात ओरडावे असे त्याला वाटले. पण तसे करणे शक्य नव्हते.  त्याने दात घट्ट आवळून घेतले व वेदना शमवण्याचा प्रयत्न केला.

विमानाच्या सांगाड्याखालून ग्रेग झिंबाब्वे ह्वांग नॅशनल पार्कमधल्या रेताड, उजाड वाळवंटाकडे बघत होता. उन्हाची काहिली जबरदस्त होती, आजूबाजूला सर्व रखरखीत होते, वातावरणात कुठेही आर्द्रता नव्हती. त्याच्या विमानाच्या सांगाड्यातून ठिबकणाऱ्या पेट्रोलच्या थेंबांत काय जी थोडीफार आर्द्रता होती, ती सोडून! जीव तहानेने कासावीस झालेला. डोळे सँडपेपरसारखे रखरखीत कोरडेठक्क झालेले. काही गिधाडे आजूबाजूच्या मरतुकड्या झुडुपांवर त्याच्या मरणाची वाट बघत बसलेली दिसली.

मान किंचित वळवून त्याने सिंहिणीच्या दिशेने नजर टाकली. सिंहीण आता अगदी काही मीटर्सच्या अंतरावर आलेली होती. तिने 'ऊSSSघ, ऊSSSघ' असा आवाज केला. ही त्यांची आपल्या छाव्यांना दक्ष राहण्याची खूण असते, व अशा वेळी सिंहीण काय करेल हे सांगता येत नाही! आपले हृदय आता इतक्या जोराने धडकते आहे की आता त्याला सावरले नाही तर सिंहिणीने झडप घालण्याच्या अगोदरच आपण हृदयक्रिया बंद पडून मरून जाऊ हे ग्रेगने ताडले. त्याने शक्य तितके शांत होण्याचा प्रयत्न केला. पळून जाणे तर अशक्य होते. ग्रेग तसाच निपचीप पडून राहिला. त्याला अगोदर तयार ठेवलेल्या 'शस्त्रा'ची आठवण झाली. बोटांनीच चाचपडत त्याने जवळच पडलेली ती ऍलुमिनियमची नळी हातात घट्ट पकडली. 

सिंहीण आता खूपच जवळ आली होती, इतकी की तिचा श्चासोच्छ्वासही ग्रेगला स्पष्ट ऐकू येऊ लागला होता. त्याने हातातल्या नळीवरची पकड घट्ट केली. तिचा वापर करण्यास कधी सुरुवात करायची? काही क्षण अजून जाऊ द्यावेत. तिच्या वापराचा परिणाम व्हायला क्षण योग्य निवडला पाहिजे-- सिंहिणीला जितके गाफील पकडता येईल तितके ते परिणामकारक ठरणार आहे. शेवटी जर मरण येणारच असेल, तर त्याचा क्षण तरी स्वतःला निवडता यावा.

एखादा क्षण ग्रेगने तसाच जाऊ दिला व मग एकाएकी त्याने हातातल्या नळीने विमानाच्या सांगाड्यावर जीवाच्या आकांताने जोरजोरात बडवायला सुरुवात केली. काही वेळाने तो थांबला व कानोसा घेऊ लागला. सर्वत्र शांत होते. पुढे काय? त्याने हळूच पाहिले-- सिंहीण तिथेच थबकून उभी होती. ती सावध होती. पण मग ती वळली व आली होती त्या मार्गाने शांतपणे निघून गेली! 

६ वाजता अंधार पडला. आता निदान दुसरा दिवस उजाडेपर्यंत आपल्याला कुणीही शोधून काढू शकणार नव्हते, हे ग्रेगला कळून चुकले. सर्वत्र काळोख व शांतता. 'काय करावे? मरून जावे का? मी जर झोपी गेलो तर परत उठणार नाही'. असे त्याला वाटून गेले, पण लगेच त्याने हा विचार झटकून टाकला. स्वतःला शक्य तितके शांत ठेवणे व दीर्घ श्चसनाचा व्यायाम करत राहणे ह्या दोन गोष्टी तो सतत करीत राहिला. तासन् तास गेले. मध्येच त्याला अचानक पाहून घाबरलेले एक काळवीट दूर पळत गेले, त्याच्या त्या कृतीनेसुद्धा अभावितपणे ग्रेगचे सर्व स्नायू ताठरले, व वेदनांची एक लहर अंगभर पसरली.

सुमारे ४:३० वाजले असावेत. दुरून हाईनांचा आवाज ऐकू आला व ग्रेग आत्यंतिक भीतीने गोठला. त्याला सर्वात जास्त भीती हाईनांची वाटत होती. कारण इतर प्राण्यांप्रमाणे हाईनांना नुसते अचानक आवाज करून घाबरवणे शक्य नव्हते.

अर्धा तास गेला असेल नसेल, ग्रेगची भीती खरी ठरली. जवळच हाईनाच्या पावलांचा आवाज ऐकू आला. अर्थात अंधारात काहीच दिसत नव्हते. आवाज अगदी जवळ आला, तेव्हा ग्रेगने जोराजोरात हातातल्या नळीने विमानाच्या विंडस्क्रीनवर बडवण्यास सुरुवात केली. असे काही वेळ गेल्यावर तो थांबला व अंदाज घेऊ लागला. हाईना तसे सहजासहजी घाबरत नाहीत. पण काही क्षणांच्या शांततेनंतर पदरव दूर गेल्याचा आवाज त्याने ऐकला.

उजाडता उजाडता ग्रेगला नैराश्य येऊ लागले. आपण इथे आहोत, हे कुणालाच कळणे शक्य नाही, तेव्हा आता यातून सुटका नाही. कालचा दिवसभर आपण जी.पी.एस. यंत्र चालू आहे ना, हे अधून मधून बघत होतो. आज काय करावे? असा तो विचार करतो न करतो तोच त्याच्या लक्षात आले, की त्याच्या त्या जी.पी.एस. यंत्र चालू आहे की नाही हे बघण्याच्या कृतीमुळे दूर तो जिवंत आहे, व कोठे आहे, हे नोंदवले जात होते.  दोनएक तास गेले असतील नसतील, ग्रेगला विमानाचा आवाज आला. तो दूरवर होता, व आला तसाच विरूनही गेला. पण थोड्या वेळाने तो आवाज परत आला, आणि ह्यावेळी ते विमान जरा अजून आपल्या जवळ असले पाहिजे असे त्याला जाणवले. असे हे आवाज परत परत येत राहिले, व ग्रेगला खात्री पटली की ते विमान जास्त जास्त आपल्या जवळ येत चालले आहे. म्हणजे हे आपल्यासाठीचे शोध विमान तर नसेल?

तसे असेल तर त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा का? कसेबसे ग्रेगने स्वतःला कॉकपिटमध्ये लोटून घेतले. एकवार त्याने स्वतःचे जी.पी.एस. यंत्र चालू करून पाहिले. व मग रेडियोसेट सुरू केला. त्याने संदेश पाठवण्याचे बटन दाबताच कालपासून प्रथमच त्याच्यातला हिरवा दिवा सुरू झाला होता! ग्रेगने स्वतःला सावरले, दोन-चार मिनिटे काय संदेश पाठवावा ह्याची मनाशी नीट उजळणी केली. मग जेव्हा ते विमान परत जवळ आले, तेव्हा शक्य तितक्या सुस्पष्टपणे त्याने पाठवायचा संदेश म्हटला 'मे डे, मे डे, हे झुलू माईक एको ब्रावो विमान आहे, स्थळ- सिनमॅटेलाच्या पूर्वेस ७.३ मैल'. तीनदा हा संदेश पाठवून तो मग वाट पाहू लागला.

[float=font:vijay;color:000000;background;place:top;]विमान अजून जवळ आले. ग्रेगला आता खात्री पटली की हे शोध विमानच आहे. पण ते तिथल्या खडकाळ प्रदेशात उतरणे शक्यच नव्हते. ते परत गेले.[/float] त्यांना आपली सुटका रस्त्यानेच करावी लागेल, ग्रेग स्वतःशीच पुटपुटला. ११ वाजता विमान परत आले व ह्यावेळी ते जास्तच जवळ येऊन घिरट्या घालू लागले.  आपण येथे अजून जिवंत आहोत हे त्यांना कळणे भाग होते. तेव्हा ग्रेगने निकराने हातातली नळी विमानाच्या दिशेने हालवली. विमानाने एक घिरटी घातली व ते निघून गेले.

आता ग्रेगला विलक्षण थकवा जाणवू लागला होता. ह्यापुढे काहीही करणे आपल्याला शक्य होणार नाही असे त्याला वाटू लागले. तो निपचिप पडून राहिला. लँड रोव्हर कधी आली, त्याला काही कळले नाही. नंतर त्याला जाणवले ते इतकेच की कुणीतरी त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला धीर देत आहे. 'आम्ही आलो आहोत, आता सगळे नीट होईल..' कुणीतरी म्हणाले. कुणीतरी त्याच्या तोंडात पाण्याची एक नळी खुपसली. कुणी दुसऱ्याने त्याच्या हाताच्या क्षीण नसेत ग्लूकोजची ड्रिप लावली. काही वेळाने एका हेलिकॉप्टरमधून त्याला इस्पितळात नेण्यात आले.  

ह्यातून बरे होण्यासाठी ग्रेगला बरेच झुंजावे लागले. अपघाताचे क्षण परवडले पण नंतरचे इस्पितळाचे दिवस नकोत, असे त्याने नमूद केले आहे. कुबड्या घेऊन चालण्यास चार-पाच महिने लागले, व नंतर कुबड्यांविना पाय टाकत चालण्यास अजून पाच-सहा महिने. त्यानंतर त्याच्या हाडांना संसर्ग झाला व परत पहिल्यापासून सुरू करण्याची पाळी आली. आता तो ह्यातून बाहेर पडला आहे.

[समाप्त]

['साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट' दैनिकाच्या 'पोस्टमॅगेझिन' ह्या रविवार पुरवणीत ऑगस्ट २००६ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखावर आधारित. तसेच 'बी.बी‌‌.सी.-- सायन्स अँड नेचर; व 'चॅनेल फ़ोर' ह्यांच्या संकेतस्थळावरही ह्या घटनेविषयी व ग्रेग रॅस्समुस्सेन विषयी माहिती सापडते, तिचाही आधार येथे घेतलेला आहे].