प्रिय मैत्रिणीस...

लहानपणापासून एकत्र असलेल्या मैत्रिणींपैकी एकेकीचं लग्नं ठरू लागलं.... एक जण लग्न करून अमेरिकेला जाणार होती, 'तो' पुढे गेला होता... तिचा जाण्याचा दिवस जवळ येत होता... तेव्हा जरा जाणवलं की आता भेट होणार नाही... तेव्हा तिला ही कविता भेट दिली...

कळते आम्हा तव नयनांची  भिरभिरणारी भाषा...

मन हे वेडे कधीच पोचले, पैलतिरीच्या देशा...!!

बघ, आईच्या गावा कितीही सरी बरसुनी गेल्या...    

मागे वळता नको करु गं तुझ्या पापण्या ओल्या...!

डोळ्यातुनी जा घेऊन संगे इथला पाऊस थोडा...

समोर जाता 'त्या'च्या अवचित झरेल झरझर वेडा !!

दिवस असे की इंद्रधनूपरि; स्वप्ने दवांत भिजती...

नीज म्हणू की जाग कळेना; धुकेच अवतीभवती!

सुरू क्षणांची लगबग लगबग, घड्याळ खुणावणारे;

मीठ सांडले; पीठ सांडले; कसे सावरू सारे? !!

रुसायलाही नकोस विसरू त्याने उशीर करता...

डोळ्यातूनच हसायचे मग मिठीत शिरता शिरता !!

कधी उंबऱ्यापाशी बसुनि मैतर आठव सारे;

भेटी आपल्या स्मरुनि तेव्हा फ़ुलतील आत पिसारे !!

कधी एकदा माहेराची ओढ वाटुनि जाई...

उगा एकदा साद घालशील... 'कुशीत घे ना आई'...!!

***