करवा चौथ

करवा चौथ - उत्तर भारतातला स्त्रियांचा सगळ्यात मोठा सण. दिवाळीच्या बरोबर ९ दिवस आधी हा साजरा करतात.ह्याच दिवशी आपल्याकडे संकश्टी चतुर्थी असते. करवा म्हणजे मातीचे भांडे(मटका) आणि चौथ म्हणजे पौर्णिमेनंतरचा चौथा दिवस. सर्वाधिक ह सण विवाहित हिंदू , सीख स्त्रीया साजरा करतात. अगदी आपल्या वटपौर्णिमेसारखा. मी इथे दिल्लीमध्ये राहात असल्यामुळे हा सण ४ वर्शे झाली बघत आले आहे. १० दिवस आधीपासूनच ह्याची तयारी सुरू होते. आधीच दिवाळी,दसरा ह्या सणान्मुळे बाजारात खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते आणि त्यात ह्या सणामुळे अजूनच भर पडतो.

हिंदी सिनेमातल्या नटीप्रमाणे नुसते चाळणीतून नवर्याकडे पाहाण्याखेरीज अजून बरेच काही ह्या सणानिमित्ताने करतात.

कार्तिक महिन्यात साजरा होणारा हा सण काही अशा प्रकारे साजरा करतात :

ह्या दिवशी कडक उपवास करतात. सूर्योदय होण्याच्या आधी स्त्रीया एक विशिश्ट प्रकारचे जेवण खातात .त्याला इथे "सरगी" म्हणतात. ही "सरगी" सासुमार्फत बनवली जाते. पूर्ण दिवस मग पाणी आणि अन्न ग्रहण करायचे नाही. हातावर मेंदी लावण्याचाही एक कार्यक्रम असतो.कार्यक्रम ह्याकरीता म्हटले कारण मेंदी काढण्यासाठी इथे रांगाच्या रांगा लागतात. मेंदी काढण्याचे मूल्यही दिवसावर अवलंबून असते.करवा चौथच्या आदल्या दिवशी भाव रू. १५०/- प्रत्येक हात असा असतो. नववधूसाठी पहिला करवा चौथ हा सगळ्यात मोठा सण असतो.

करवा चौथच्या पुजेचे साग्रसंगीत असे असते : सर्व स्त्रीया एका देवळात अथवा एका झाडाखाली एकत्र येतात. वयाने मोठी असलेली स्त्री ह्या पूजेचे कथन करते.मातीचे भांडे(मटका) ह्याला गणपती मानतात.आणी दूसर्या एका पितळेच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात पार्वतीची मूर्ती ठेवतात. नेहमीप्रमाणे पूजा करतात. नवर्याच्या दीर्घायुश्याची प्रार्थना करतात.

रात्री चंद्रोदय झाला की स्त्रीया चाळणीत दिवा ठेवून चंद्राचे प्रतिबिंब पाहातात आणि चाळण तशीच धरून नवर्याचा चेहरा बघतात. ह्या दिवसाची आठवण म्हणून नवरे आपल्या बायकोला काही भेट देतात.

माझ्या कार्यालयात येणार्या २९ ला जणू काही महिला सुट्टी असल्यासारखे होणार आहे. पण त्या "सरगी" मध्ये "मठ्ठी" नावाचा एक खाद्यपदार्थ असतो तो खूप चविष्ट असतो.