ऑपेरा गायिका अभंग गाणार!

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचून आनंद झाला. अभंगांनी मराठीच काय पण परभाषिक किंवा परदेशी व्यक्तींनाही गोडी लागावी हे वाचून गंमत वाटली. ह्यावर विचारांची देवाणघेवाण करता यावी म्हणून ती बातमी येथे उतरवून ठेवत आहे.

ईसकाळातली मूळ बातमी : "ऑपेरा सिंगर' गातेय मराठी अभंग...

पुणे, ता. ३० - ""संतरचनांमधील आर्तता मला भावली. संतांनी सामान्य लोकांच्या भाषेत ईश्‍वराकडे जाणारा भक्तिमार्ग सांगितला आहे. त्यामुळे माझे मराठी भाषेतील या अनुभवांच्या बोलावर प्रेम जडले आणि मी मराठी अभंग गाऊ लागले,'' असे मनोगत प्रसिद्ध ऑपेरा सिंगर ज्यूडी रस्ट यांनी आज व्यक्त केले.
"गुरुदत्त ट्रस्ट'तर्फे नगर जिल्ह्यातील दरोडी या गावी बांधण्यात येणाऱ्या इमारत निधीसाठी आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. उद्या (ता. ३१) बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पूर्वार्धात "खेळ मांडियेला' या कार्यक्रमात ज्यूडी रस्ट अभंगवाणी सादर करतील. उत्तरार्धात "पखवाज तालस्पर्श' ही सहा पखवाज कलाकारांची जुगलबंदी होणार आहे. मूळच्या अमेरिकन असलेल्या ज्यूडी आता बेल्जियममध्ये "ऑपेरा सिंगर' म्हणून स्थायिक झाल्या आहेत.

त्या म्हणाल्या, ""सन २००० मध्ये डागर बंधूंच्या गायनाच्या कार्यक्रमात पखवाजवादक उद्धव आपेगावकर यांच्याशी परिचय झाला. मी ऑपेरा सिंगर असल्याने भारतीय संगीताविषयी कुतूहल निर्माण झाले. काही काळ मी डागर यांच्याकडे शिकले. आपेगावकर यांच्याशीही परिचय वाढला आणि त्यातूनच मराठीतील अभंगगायनाची मोहिनी मला पडली. संतांनी सामान्य लोकांना सहज समजेल अशा पद्धतीने तत्त्वज्ञान सांगितले आहे, हे संतपरंपरेचा अभ्यास करतानाच मला समजले. महाराष्ट्रातील आमचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम उद्या होईल. मी प्रथम "जय जय रामकृष्ण हरी' हा गजर, त्यानंतर "रूप पाहता लोचनी', "सुंदर ते ध्यान' तसेच मीरा भजन, संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या रचना आणि पसायदान सादर करणार आहे.''

मला भाषेविषयी प्रेम वाटते. त्यामुळे मी रशियन, जर्मन, स्पॅनिश आदी भाषांतील रचनाही शिकून सादर करते. मराठी उच्चार सर्वांत कठीण वाटले. विशेषतः ळ, ज्ञ आणि जोडाक्षरे उच्चारताना पंचाईत होते, असेही त्यांनी मोकळेपणाने सांगितले. मराठी भक्तिरचना जनसामान्यांत अतिशय लोकप्रिय असल्याचा अनुभव मला अनोखा वाटतो. या रचना शेकडो वर्षे लोक त्याच पद्धतीने सादर करतात, सर्वांना त्या पाठ असतात, हे आश्‍चर्यकारक आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी उद्धव आपेगावकर उपस्थित होते.


महाराष्ट्रातला हा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आहे, असे म्हटले आहे. ह्यापूर्वी कोणी हा कार्यक्रम पाहिला आहे का?

ह्या कार्यक्रमामुळी भविष्यात जगभर पसरलेल्या मराठी लोकांच्या संस्कृतीबद्दल त्यांच्यांत आणि त्यांच्या संबंधात येणाऱ्या स्थानिक लोकांमध्ये कुतुहल जागृत होईल असे तुम्हाला वाटते का?

३१ तारखेचा हा कार्यक्रम कोणी पाहणार असेल तर वृत्तांत वाचायला नक्कीच आवडेल.