किती काळ मी आयुष्याशी झगडावे ?
कसे, किती या जाळ्यामध्ये अडकावे ?
नव्हेत जखमा द्वंद्वांच्या नरसिंहांशी
लहान-मोठ्या माशांचे भुरटे चावे
किती जन्म तू दुसऱ्याची अन् मी परका ?
किती वाजवू, राधे, तुजसाठी पावे ?
सखे, न केवळ डोळ्यातले पाणी सुकले
सुकून गेले अंतरातले ओलावे
म्हणू कसा की जखमा त्या साऱ्या भरल्या ?
तुझ्या स्मृतीने काळिज अजुनी हेलावे