एक संगीतानुभव

जुनी फिल्मी गाणी ऐकण्याची संधी मिळाली की मी सहसा सोडत नाही. कधी न ऐकलेली चांगली गाणी ऐकून कान तृप्त होतात. असाच एक दिवस, एका मित्राच्या घरी जुनी व दुर्मिळ गाणी ऐकण्याचा कार्यक्रम होता. नेहमीप्रमाणे एक संगीतकार निवडून त्यावर एक अत्यंत जाणते रसिक निवडक गाणी सादर करणार होते. भारतीय बैठक असल्यामुळे चांगली जागा मिळावी म्हणून मी थोडा आधीच पोचलो. तुरळक रसिक येऊन पोचले होते. आणखी काही येत होते. प्रत्येकाच्या आगमनाबरोबर त्याच्या रसिकतेची पावती मिळत होती. मला कोणीच ओळखत नसल्यामुळे एका कोपऱ्यात बसून होतो. बरीचशी मंडळी जमल्यावर एका पोक्त बाईंनी माझ्याकडे एक शून्य कटाक्ष टाकून  ' आपले सगळे आले का?' अशी पृच्छा केली. मी आणखीनच अवघडून बसलो.
            कार्यक्रम सुरू झाला. वक्त्यांनी त्या संगीतकाराची महती सांगून गाणी लावण्यास सुरवात केली. बरेचजण कागद पेन घेऊन सरसावून बसले. गाणं सुरू झाल्याबरोबर, माझ्या बाजुचे एक त्याचा गीतकार कोण आहे, सारंगीचा पीस कोणी वाजवला आहे, सिनेमाचा दिग्दर्शक कोण वगैरे माहिती सांगू लागले.हळुहळू बहुतेकजण प्रत्येक गाणे चालू असताना त्याच्या इतिहासात आपापल्या परीने भर घालू लागले. प्रमुख वक्ते बिचारे मधुनमधून 'सायलेन्स' असे बजावत होते. पण रसिकगणांवर त्याचा कोणताच परिणाम दिसत नव्हता. मला मात्र माझ्या असामान्य अज्ञानाची कींव करावीशी वाटत होती. चांगले गाणे, मग ते कुणाचेही असो, भान हरपून ऐकावे, त्यातले काव्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा अशी माझी समजूत होती. [float=font:malini;size:19;place:top;]पण गाण्याचे व्याकरण इतके महत्त्वाचे असते आणि त्या ज्ञानावरच तुम्ही किती रसिक आहात हे ठरवले जाते याची मला कल्पनाच नव्हती![/float]
मध्यंतरात सर्वजण एकमेकांशी हिरीरीने बोलत होते, एकमेकांना पुढच्या कार्यक्रमाची आठवण करून देत होते. त्यांच्या संवादातून माझ्या ज्ञानात मात्र चांगलीच भर पडत होती. 'खरे चांगले चित्रपटसंगीत हे १९५०, १९६० सालीच खतम झाले', काहींना ते १९४५ वाटत होते. संगीतकारांच्याही श्रेणी होत्या व त्याखालील संगीतकाराचे नांव देखील काढणे त्या मैफिलीत वर्ज्य होते.
          मध्यंतरानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. उपस्थिती आता चांगलीच रोडावली होती. आता आपल्याला शांततेने ऐकता येईल या अपेक्षेने मी सरसावून बसलो. पण परिस्थितीत काही फारसा फरक नव्हता. जो तो आपले ज्ञान पणास लावू पहात होता. एक ग्रुप तर चालू कार्यक्रमाच्या सादरीकरणावरच टीका करत होता आणि आपल्या आगामी कार्यक्रमांत बघाच काय ऐकवतो ते, वगैरे वगैरे खुसपुसत होता. तरीही या सर्व कोलाहलात अनेक दुर्मिळ व सुंदर गाणी ऐकायला मिळालीच, त्यामुळे जो आनंद झाला तो या सगळ्या पलिकडचा होता!!! 

टीपः ही सर्व सुंदर सुंदर गाणी ज्या सुदैवी लोकांच्या गाठी होती त्यांच्याकडून ती रेकॉर्ड करून मिळण्याची मात्र सुतराम शक्यता नव्हती.