वैद्यकीय पदवीधर आणि लोकसत्ताचा अग्रलेख

    "दैनिक लोकसत्ता"च्या ११ डिसेंबरच्या अंकातील डॉक्टरांच्या संपाविषयीच्या अग्रलेखाचा समाचार अनेक डॉक्टर घेतीलच पण मी डॉक्टर नसतानाही निवासी डॉक्टरांचे काय हाल असतात हे माझ्या नातेवाईक डॉक्टरांचे प्रत्यक्ष होणारे हाल मी पाहिल्यामुळे मला या अभ्यासक्रमात एक वर्षाची वाढ करावी असा निर्णय घेणाऱ्या शासनाच्या निगरगट्टपणाचे आणि त्याचे समर्थन करणाऱ्या संपादकांच्या अज्ञानाचे आश्चर्य करावे वाटले.संपादकांना एम्.बी.बी.एस्. विषयी अतिशय अल्प ज्ञान असावे हे अग्रलेखातून सिद्ध होते‌.  इंटर्नशिपसह कोर्स पूर्ण होण्यास सध्याच्या अभ्यासक्रमात बारावीनंतर साडेपाच वर्षे लागतात आणि त्यानंतर लगेच लठ्ठ पगाराची नोकरी मिळत नाही किंवा प्रॅक्टिसही सुरू करता येत नाही. आजच्या परिस्थितीत त्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर परीक्षा द्यावीच लागते आणि त्यासाठी पुन्हा एक पात्रता परीक्षा देण्यात त्या विद्यार्थ्याचा एक किंवा दोन वर्षाचा काळ जातो,त्यानंतर सुदैवाने त्याला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला तर नंतर कमीतकमी तीन वर्षे अतिशय त्रासदायक अभ्यासक्रम प्रत्यक्ष कार्यानुभवासह पुरा करावा लागतो. एवढे होईपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या वयाची जवळजवळ तिशी उलटते‌. सर्वसाधारण भारतीय मुलींचे पालक आपल्या मुलीचा विवाह पंचवीस वर्षाच्या तरी आत व्हावा अशी अपेक्षा धरतात . त्यामुळे वैद्यकीय पदवीधर मुलींनी अंबुमणी रॉमदॉस याना त्यांच्याशी विवाह करावा असा प्रस्ताव माडल्याबद्दल  संपादक महाशय निर्लज्जपणे या मुली अगदी पदवी मिळाल्यावर लगेच लग्न करतात का असा प्रश्न विचारतात त्यावरून भारतीय सामाजिक स्थितीचा आपला सूक्ष्म अभ्यास आहे असा पोकळच दावा ते करत आहेत असे म्हणता येईल.
    एम्. बी. बी. एस्. होताच लठ्ठ पगाराची नोकरी न मिळता या डॉक्टरांना केवळ मासिक १७००/- रुपये विद्यावेतनावर काम करावे लागते त्याचवेळी त्यांच्या अगोदर बी.ई. झालेले त्यांच्या बरोबरीचे विद्यार्थी मासिक कमीत्कमी १५-२० हजार रुपये पगार भारतात घेतात किंवा परदेशाची वाट धरतात.एके काळी या इंजिनियरांसाठीसुद्धा  सरकारने असाच बाँड ठेवला होता पण एकाही इंजिनियरला नोकरी देऊ न शकल्याने त्यांना ती अट रद्द करावी लागली आणि वैद्यकीय पदवीधारकांबबतीत मात्र प्रशिक्षित डॉक्टरांच्या अभावामुळे ती अट आणखीच कडक करणे हा सरकारचा दुटप्पीपणाच म्हणावा लागेल.पण तो ध्यानात न घेता संपादकमहाशय वैद्यकीय पदवीधारकांनाच धोपटत बसलेत.
     वैद्यकीय पदवीधारकांना परदेशात विशेषतः अमेरिकेत जाण्याचे वेध लागले असतात हा तर संपादकांच्या अज्ञानाचा मोठाच पुरावा आहे कारण [float=place:top;]या पदवीधारकांना बहुधा अमेरिकेचा  व्हिसा मिळतच नाही आणि मिळाला तरी अमेरिकेतील योग्य वैद्यकीय पदवी असल्याशिवाय नोकरी किंवा खाजगी प्रॅक्टिसही करता येत नाही.[/float]या गोष्टीची त्यांना कल्पना नसावी असे दिसते.
       डॉक्टरांनी असे वेळीअवेळी संपावर जाऊन रुग्णाना वेठीस धरणे अयोग्य आहे हे खरेच पण त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये याविषयी शासनाने दक्ष राहणे तेवढेच महत्त्वाचे आहे ही गोष्ट नजरेआड करणे तितकेच अयोग्य आहे यात शंका नाही..