आता मला सांगा या महाराष्ट्राची लोकसंख्या किती? दहा करोड (त्यात परप्रांतीय किती देव जाणो!). पण त्यातही साहित्यविषयक,वाचनाची आवड असणाऱ्या लोकांची संख्या किती? आपण धरू ‘अमुक अमुक’ .... पण खरा प्रश्न हा उभा राहतो की, किती ‘अमुक अमुक’ जणांकडे संगणक आहे? व असलाच तर किती जणांनी त्यावर इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून घेतली आहे? आणि तीही असली तर किती जण हॉलिवूड, बॉलीवूड सोडून मराठी साहित्याची साईट उघडून बसणार आहेत? आणि वरील सर्व अटींतून गळून गळून ‘तमुक तमुक’ उरलेच तर ते माझ्या ब्लॉगपर्यंत पोहचणार कसे? आणि यावरही ते पोहचलेच तर त्यांना मी लिहिलेलं आवडेल कशावरून? आणि ते पुन्हा परत येतीलच कशावरून?
मग हा एवढा खटाटोप कशासाठी? आधीच या ‘बराहा’मध्ये लिहिता लिहिता डोक्याचं शॉर्ट सर्किट होऊन फ्यूज उडायची पाळी येते. मराठीमध्ये कविता लिहिणं वेगळं. त्याला काही मर्यादा असते. पण लेख लिहिणं..... एकदा पहिल्या ओळीवर पेन टेकवला की तो कोणत्या ओळीवर येऊन थांबेल हे केवळ देवालाच माहीत असतं. कवितेचं तसं नसतं, तिचं सगळं कसं हिशेबात असतं.(शेवटी ‘तो’ असतो तो ‘लेख’ आणि ‘ती’ असते ती कविता).
तर मी माझी व्यथा मित्राला सांगितली. त्याने पैसे जमवून नुकताच एक चांगला फोन घेतला होता(घ्यायच्या आधी मला चारदा विचारलं होतं, नक्की घेऊ का नको म्हणून.आणि जेव्हा मी घेतला होता, मीही त्याला असंच चारदा विचारलं होतं. शिवाय घरी दहादा विचारलं(खरं तर सांगितलं) होतं.) तो मला म्हणाला,‘काय काळजी करू नको, मी आहे की, कोणी नाही वाचलं तर मी आहे वाचायला.’ मीही त्याला भारावून जाऊन म्हटलं,‘तू आहेस ना मग मला बस झालं...’(शिवाय मावशी आहे, मामा आहेत, आई आहे हे गणीत मनात चालू होतंच.) नशीब माझ्या मित्राने काहीतरी करून शेवटी मोबाईलवरून इंटरनेट सुरू केलं म्हणून...त्यामुळे ह्या दहा करोड लोकसंख्येतून माझ्यासाठी एक चांगला वाचक तयार झाला.(त्या नेटचं पेज ओपण होता होता, माझी कविता वाचण्याआधीच तो झोपी जाऊ नये म्हणजे झालं, शेवटी मोबाईलवरून).
मराठी ब्लॉगविश्व या साईटला भेट दिल्यावर मला समजलं की, एवढ्या मोठ्या लोकसंख्येतून केवळ सुमारे ३५० लोक ‘मराठीतून’ ब्लॉग लिहीत आहेत. त्यातही काही ‘मृत’ आहेत.(त्यांचाच शब्द). म्हणजे ३६५ दिवसांहून अधिक काळ लेखन न झालेले ब्लॉग.
हूं... खरं तर मनातलं काहीतरी लिहिल्याशिवाय मी राहूच शकत नाही, हेच खरं.(त्याची एक इंटरेस्टिंग गोष्ट पुढे सांगेन). [float=font:vijay;color:D7002B;background:F3F2F0;place:top;]आधी फक्त कागदावर लिहीत होतो, आता इंटरनेटवर लिहितोय, एवढाच फरक. तर आता तुम्ही हे वाचत आहात, म्हणजेच तुम्हीही माझे वाचक ठरलात..[/float](‘रंगे हाथ’ पकडलं की नाही!) त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
रोहन जगताप