एका महात्म्याची कहाणी ( भाग - १ )

                कोणे एके काळी एका तरुणाने एमएससी झाल्यावर अमेरिकेची पुढच्या शिक्षणासाठी वाट धरली. साधारण १९५२ चा काळ होता तो. श्रीनाथची शिकागोच्या युनिव्हर्सिटीत  पी. एच. डी ची सुरवात झाली. हुशार व मेहनती श्रीनाथ सगळ्यांचं मन जिंकू लागला. वेळ मिळेल तेव्हा आजूबाजूचा खेडेगावात भेट देऊ लागला. तेथील शेतकऱ्यांच्या जीवनपद्धतीने तो प्रभावित झाला. नुसत्या शेतीमध्येच नव्हेतर रोजच्या जीवनातही शास्त्रीय साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता.  आपल्या देशातही असं का होऊ नये ? हा प्रश्न सतावत होता. रसायनशास्त्रात  पी. एच. डी. झाली.   श्रीनाथचा आता डॉक्टर श्रीनाथ झाला होता. अमेरिकेतल्या नोकऱ्या बऱ्याच सांगून आल्या. सात वर्षात बरंच काही घडलं होतं. पण आपल्याला देशासाठी व देशातच काहीतरी करायचे आहे असं ठरवून तो तरुण भारतात परत आला. परत आला तेव्हा तो पूर्णं झपाटलेला होता. आपली शिक्षण पद्धतीत खूप दोष आहेत. ते आपल्याला जगायला समर्थ बनवत नाही, हे याचं शल्य मनात घेऊन.

               आपण  काहीतरी करायला पाहिजे, पण काय ते कळत नव्हतं. दिवस भरभर निघून जात होते. भारतात आल्यावर म्हैसूरच्या एका नामांकित संस्थेत चांगल्या पदावर नोकरी भेटली. वयाच्या तिशीतच ठरवून टाकलं की वयाच्या चौपन्नाव्या वर्षी नोकरी सोडायची नि देशासाठी काहीतरी करायचं.

                १९६४. डॉक्टर श्रीनाथने आता मोठा झाला होता. हिंदुस्थान लिव्हर कंपनीने त्याला चांगल्या पगाराची व चांगल्या करियरला वाव असणारी नोकरी देऊ केली. नोकरी स्वीकारून आपल्या ध्येयाच्या दिशेने ते दमदार वाटचाल करत होते. बरंच संशोधन चाललं होत. रसायन शास्त्रात डॉक्टरी होतीच. भौतिकशास्त्र , जीवशास्त्र , इलेक्ट्रॉनिक्स , मेकॅनिकल , शेती यासारख्या विषयाबरोबर समाजशास्त्र , आपली संस्कृती याचाही अभ्यास चालू झाला. हे सगळं सोपं नव्हतं. ह्या कामात त्यांची जीवनसाथी मीराही साथ देत होती. कलबाग दांपत्य आधुनिक भारताच्या शिक्षण पद्धती बदलण्यासाठी झपाटून काम करत होतं.

                दिवसामागून दिवस गेले. वर्षामागून वर्ष गेली. डॉ. कलबागांचं जीवन वयाच्या चौपन्नाव्या वर्षाच्या उंबरठ्यावर आलं. तिशीत ठरल्याप्रमाणे हिंदुस्थान लिव्हरच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला. कंपनीत खळबळ उडाली. त्याचं मन वळवण्यासाठी खूप प्रयत्न झाले. त्यांना जे करायचंय ते कंपनीत राहून करावं, असा प्रस्ताव आला. कंपनी सर्व सहकार्य देईल ह्याची ग्वाही देण्यात आली पण डॉक्टरांचं मन कशानेही वळणारं नव्हतं. अखेरीस नाईलाजाने कंपनीने त्यांना वयाच्या चौपन्नाव्या वर्षी नोकरीतून मुक्त केलं.

                 कदाचित देवाने ज्या कामासाठी पृथ्वीतलावर पाठवले , त्या कामाची ,कठीण कामाची नव्या आयुष्याची सुरवात झाली होती. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ( आय. आय. ई. ) ह्या संस्थेशी संलग्न होऊन पाबळ ( बाजीरावाच्या मस्तानीचं पाबळ ) ह्या जागी उजाड माळरानावर महाराष्ट्र शासनाने २५ एकर जागा देऊ केली. सरांनी , १९८० मध्ये पाबळला जाऊन राहायला सुरवात केली. एक हिंदुस्थान लिव्हरचा डायरेक्टर, वयाच्या ५४ व्या वर्षी रिटायरमेंट घेऊन पाबळच्या दलित वस्तीमध्ये राहत होता. मस्तानीच्या भूमीवर पुन्हा एकदा एक नवीन इतिहास घडत होता. 

( ही सत्यकथा आहे. क्रमशः )