एका महात्म्याची कहाणी ( भाग - २ )

  काहीतरी करायचंय पण काय हा तीस वर्षापूर्वीचा प्रश्न निकालात निघाला होता. अमेरिकेतील रसायनशास्त्रातील डॉक्टरेट , तीस वर्षातील अनुभव , काहीतरी करण्याची `बर्निंग डिझायर `, तीस वर्षातील भारताच्या संस्कृतीचा अभ्यास  नि स्वतःविषयीचा प्रचंड सार्थ आत्मविश्वास ह्या भांडवलावर काहीही अशक्य नव्हतं. डॉक्टरांची विचासरणी काहीशी अशी होती.

      प्राचीन भारतात ऋषिमुनींच्या काळात मुलं आश्रमात जाऊन सगळ्या प्रकारचे शिक्षण घेत असत. परिणामी ते शिक्षण  संपल्यावर विद्यार्थी नुसताच फक्त तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण न होता , एक चांगला माणूस म्हणून समाजात येत होता. तो परीक्षार्थी न होता खराखुरा विद्यार्थी असायाचा, त्यामुळं आपल्या संस्कृतीची जपणूक चांगल्या प्रकारे होत होती. मध्यंतरीच्या काळात इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. त्यांनी त्यांची शिक्षणपद्धती आपल्या देशात आणली. त्यांच्या शिक्षणपद्धतीच्या गुणाबरोबर बरेचसे दोष आपल्यात आले. बरेचसे आपण टाकले. आपली शिक्षण पद्धतीची सच्चाई काय आहे ? बरीचशी मुले शाळेतच जात नाहीत. दहावीपर्यंत येतायेता आर्थिक परिस्थिती अथवा इतर कारणामुळे बरीचशी इथपर्यंत येईस्तोवर आपल्या आईवडीलांच्या कामात मदत करत असतात.. पोटाची खळगी भरण्यासाठी .. दहावीचा निकाल लागतो ५० %. खरंतर हा निकाल दहावीचा नसतो. हा निकाल लागलेला असतो, साधारण ५ लाख मुलांच्या भवितव्याचा .. त्यांचं पुढचं भविष्य अंधारमय झालेलं असतं.  नंतर त्यांना आपण ` ड्रॉपऑऊट ` म्हणतो. त्यांचं जीवन दुःखाच्या खाईत आपण लोटून देत असतो. त्याला कदाचित गणित , इंग्रजी , सायन्स नसेल जमत. पण ह्याचा अर्थ त्याला जगातील एकही गोष्ट येत नसेल काय ? त्याला काहीच येत नाही , हे आपण आपल्या मोजपट्टीने मोजून त्याला सांगत असतो. त्याच्या मनावर बिंबवत असतो की तू कोणत्याही कामाचा नाहीस. अरे, त्याच्यातपण काहीतरी असेल ना ? कुणी पाहील तर ना ?  पण दरवर्षीच्या ह्या ५ लाख मुलांचं काय होतं ? यावर कुणालाही विचार करायला वेळ नाही. वर्षानुवर्षे हेच होत आले आहे. ना कुणाला खंत ना कुणाला खेद.

     सरांना नेमकं हेच दुःख ह्यदयात सलत होतं. गेली ३० - ४० ह्याच प्रश्नानं सतावलं होतं. आता दुसरा विचार करायला वेळ नव्हता. आता ` नॉन फॉर्मल एज्युकेशन सिस्टिम ` वर काम करायचं होतं.

    पुण्याच्या कर्वे रस्त्यावर असणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ( आय. आय. ई. ) ह्याच्याविषयी सरांना कुणीतरी सांगितले. ही स‌ंस्थापण ` शिक्षण सर्वांसाठी ` हे ब्रीदवाक्य घेऊन काम करतेय. त्यांच्या  सहकार्याने बऱ्याचश्या गोष्टी साध्य होणार होत्या.  कापार्ट ( CAPART ) ह्या भारत सरकारच्या अंगीकृत संस्थेला प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला. सरांना दिल्लीच्या बऱ्याच वाऱ्या कराव्या लागल्या. ह्या गोष्टींमध्ये बराच वेळ जात होता. संस्थेसाठी योग्य जागा हवी होती. साधारण भारताच्या कोणत्याही खेड्याचं प्रातिनिधिक स्वरूपात असणारे कुठलेही खेडे चालणार होतं. दोन तीन जागा बघितल्यावर पाबळची जागा सरांना पसंत आली.

    पाबळ. पुण्यापासून ६० कि.मि. अंतरावर असणाऱ्या खेड्याची लोकसंख्या साधारण ४-५ हजार होती. ४०० ते ५०० मि. मि, च्या दरम्यान पाऊस पडतो इथे. साधारण जानेवारी मध्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर चालू होतात. याचाच अर्थ असा की जर ह्या खेड्यात माझा प्रयोग यशस्वी झाला तर भारताच्या कोणत्याही खेड्यात त्याची पुनराव्रुत्ती करता येईल. सरांनी संस्थेला दिलेली जागा बघितली नि प्रचंड खूश झाले. का खूश होऊ नये ? त्यांना हवी तशी जागा मिळाली होती. पाबळच्या पूर्वेस एक छोटीशी टेकडी आहे. त्या टेकडीवर एकही झाड नाही. तरवडाची काही झुडपं मात्र होती. पाण्याचा कुठेही मागमुस नाही. स्थानिक लोकं दिवसासुद्धा त्या जागेकडे फिरकत नसत. रात्रीचा तर प्रश्नच नव्हता. उन्हाळ्यात ईथे दिवसाचं तापमान साधारण ४० - ४२ डिग्रीच्या च्या आसपास असतं. सर्व द्रुष्टिने ही जागा सरांच्या द्रुढनिच्छयाचा कस पाहणारी होती. म्हणून सरांना खुप आवडली.

    आणखी एक महत्त्वाचा प्रश्न होता. संस्थेचं नाव काय ठेवायचं. सेक्स्पिपियर काहीही म्हणो पण नावात बरच काही दडलेलं असतं. आपल्या ध्येयाच्या प्रातिनिधिक स्वरुपात हवं. नि छोटं सुटसुटीत हवं. आपल्या स‌ंस्कृतीशी नाळ ठेऊन विज्ञानाच्या आपल्या भक्तीची कहाणी बयान कराणारं असावं. बराच विचार विनिमय झाल्यावर सहमताने नाव फायनल झालं ----- ` विज्ञान आश्रम `.

     किती सुंदर नाव आहे. आश्रम म्हटल्या भगवी कपडे घातलेला संन्याशाची टोळी डोळ्यापुढून धावत गेल्याचा भास होतो.  ऐहीक जिवनापासून दुर राहून परमेश्वरचरणी विलीन झालेला साधू अशी प्रतिमा साधारण ऊभी राहते. पण विज्ञान शब्दाने सारं चित्रच पालटून जातं. होय .. हा आश्रम आहे नि ईथं विज्ञानाची पुजा केली जाते.

     आध्यात्मिक क्षेत्रात भारत बऱ्यापैकी पुढे आहे. थोडी विज्ञानाची पुजा केली तर आपण आणखी नक्कीच पुढे जाऊ. असो.

ह्या सर्व गोष्टींमध्ये तीन वर्षे कशी निघून गेली , ते सरांना कळलं नाही.

  १ जानेवारी १९८३. 

 पुण्यापासून साठ किलोमिटर अंतरावर मस्तानीच्या पावलांचे ठसे अंगाखांद्यावर अभिनामाने मिरवणाऱ्या पावळच्या पुर्वेकडील एका उजाड टेकडीवर डॉ. श्रीनाथ  व मिरा कलबाग यांनी शिक्षणश्रेत्रातील नव्या अध्यायाला सुरवात केली.

  पाबळला विज्ञान आश्रमची स्थापना केली.

( योगायोगाने ह्याच वर्षी विज्ञान आश्रम  स्थापनेला २५ वर्षे पुर्ण होतायेत. आतापर्यंच्या वाटचालीसाठी अभिनंदन करून पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !! )

                                                                                                                                            ( क्रमशः )

मनोगतच्या सर्व वाचक , लेखक , कवी , विडंबनकार , प्रशासक यांना नववर्ष २००८ शुभेच्छा.. !!