ह्यासोबत
कुठे होतो आपण " हवा महालात" ना... येऊया बाहेर आता तिथून. हवा महालात आत किंवा खिडकीमध्ये जाऊन बघण्यासाठी असे काही नाहीये. पण बाहेरून इमारत खूप सुंदर दिसते.
हे सगळे बघून होईपर्यंत आम्हाला ३.३० वाजले. मग काय पेटपुजा करण्यासाठी आम्ही एका खूप प्रसिद्ध हॉटेलात गेलो.त्याचे नाव होते "एल.एम.बी". खूप छान आहे हे. "जौहरी बाजार"(सगळी दागिन्यांची दुकाने) रस्त्यावर दुकान नम्बर १००-१०१. हो तिथे दुकान नंबरने ओळखतात. छोले चने,पुरी भाजी,सॅंडवीचेस वेगवेगळ्या प्रकारचे आणि चहा कॉफी तर ओघाने आलेच.थोडेसे महाग आहे पण मस्त आहे. चहा रु.४५/- तर कॉफी रु.५५/- ...
आम्हाला आमच्या हॉटेलवाल्याने सांगितले होते की, "चोखी ढाणी " ला जायचे असेल तर संध्याकाळीच जा. संध्याकाळी चोखी ढाणी बघण्याची मजा काही औरच असते. "चोखी ढाणी "( राजस्थानी शब्द) म्हणजे "चांगले गाव". पूर्णपणे राजस्थानी खेडेगावाचा आवार आत निर्माण केला आहे.( जराशी पुण्याच्या अभिरुचीची आणि आळंदी रस्त्यावरच्या "गोखले मळ्याची". आठवण झाली). स्वागताला अगदी पितळेच्या ताम्हणात अक्षता, कुंकू आणि एकवाती दिव्याने आउक्शण करतात. मग तिथून प्रवेश तिकिटाची रांग. तिकिट काढून आम्ही आत शिरलो तसे उजव्या बाजूला एक म्हातारा माणूस ऐरणीवर लोखंडाला आकार देत होता. मग तिथेही माझ्या मराठी मनाला एक गाणे न सुचता राहिले .. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाजू दे.. तिथून थोडे पुढे सरकल्यावर खाण्यापिण्याची बरीच मातीच्या घरान्सारखी छोटी छोटी रेस्टॉरंट्स होती. राजस्थानी नृत्य करणाऱ्या बायका नृत्य करताना बरेच काही करतब दाखवत होत्या.. परातीवर ,काचेवर आणि लाटण्यावरही... बापरे ... एकदा नाही दोन तीनदा आम्ही ते नृत्य बघितले. प्रत्येक छोट्या छोट्या घराबाहेर तिथे कंदील बाजली असे होतेच. उंट आणि हत्ती ची सफरही आहे. बैलगाडीत बसायलाही मजा येते.तिथेच एक तेल मालीशवालाही आहे रु.१०/-. कटपुतल्यांचा खेळ,एक जुनी विहीर आणि पाणी भरणाऱ्या बायका. राजस्थानी कपडे घालून फोटोही काढले. करता करता ९.१५ झाले आणि मस्त राजस्थानी खाण्याचा सुगंध काही आवरेना. अगदी जुन्या पद्धतीने चौरंगावर ताट ठेवून खाली बसून जेवायला वाढतात. जेवणात - दाल भाटी, हलवा, बाजरीची भाकरी, भात आणि बऱ्याचं राजस्थानी पद्धतींच्या भाज्या होत्या. हे सगळे करून आम्ही राजस्थानी पाहुणचाराचा निरोप घेतला आणि मनात अस्नख्य आठवणी घेऊन आम्ही तिथून निघालो. दिवसभराच्या थकव्याने हॉटेलवर परत जाताना निद्रादेवी मात्र प्रसन्न होत असल्याचे जाणवले.
दिवस तिसरा : हा आमचा परत येण्याचा दिवस होता म्हणून आम्ही शेवटच्या दिवशी मात्र "अमेर किल्ला" बघायचा ठरवला. दिल्ली - जयपूर हायवेवरच लागतो. जयपूरपासून १० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला. सवाई राजा जयसिंगाने बांधलेला. किल्ल्यावर वरपर्यंत गाडी जाते. चालायचे फक्त किल्ल्यातल्या किल्ल्यातच. पार्किंग नि:शुल्क आहे. गाईडचे शुल्क मात्र रू. १००/- आहे ४ जणान्साठी. आधी आम्ही काही गाईड ठेवला नाही. पण किल्ल्याच्या आत शिरताच एक १२-१३ वर्षाचा मुलगा उभा होता तो म्हणाला "गाईड हवा का?" म्हणून कौतुकापोटी आम्ही त्याला गाईड म्हणून ठेवला(चाईल्ड लेबर वगैरे गोष्टी आल्या ध्यानात पण छोट्या मुलाला तेवढीच कमाई). त्याचे नाव विजय. सगळ्यात आधी त्याने आम्हाला दाखविला तो म्हणजे "जयवाण" .जयवाण ह्या भागात जगातली सगळ्यात मोठी तोफ ठेवली आहे.ह्या तोफेचा एक गोळा ११" आणि ५० कि̱. ग्रा आहे. ही तोफ जयगढ कारखान्यात बनविलेली आहे्या तोफेचा गोळा २२ कि.मी दूर जातो.तिथेच शेजारी एक तुरुंगही आहे.तिथल्या बुरुजावर दोन झेंडे फडकवले होते. सन १०२३ मध्ये बांधलेली पाण्याची टाकी ही आहे ती सवाई भवानी सिंगाने बांधलेली आहे.ह्या किल्ल्यात एक ७२ फिट खोल टाकी आहे आणि थंड गारा पाण्याच साठा आहे. ह्यातून म्हणे ७ ट्रक सोने इंदिरा गांधींनी काढले आणि टाकी वरून बंद केलीय टाकीचे पाणी १०,००० लोक १० वर्षे पिऊ शकतात. ह्यावर जेवढे कडक ऊन पडेल तेवढे पाणी आत थंड राहते.
किल्ल्यात "शस्त्रागार" आहे. त्यात तलवारी,अग्नियंत्र वगैरे ठेवले आहे. किल्ल्यात दिवाण-ए-खास,दिवाण-ए-आम , लक्ष्मी निवास, भोजन शाळा,छोटा सागर,ललित मंदीर, मशालीच्या खाचा अजूनही तशाच आहेत..जोधा अकबरचे शुटिंगही त्तिथेच झाले असे विजयने सांगितले.तब्बल १-१.५ तास लागला किल्ला फिरून व्हायला.
सुरेख आठवणी मनात जपून व जयपूरचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो..