ह्यासोबत
येशूच्या कृपेने ४ दिवस सुट्टी मिळाली आणि मग काय आम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा ठरवला.झटक्यात ठरवले की जयपुराला जायचे. लहानपणी भूगोलात ऐकलेल्या आणि गुलाबी शहर म्हणून ख्याती मिळवलेल्या शहरात जायचे म्हणून मन आनंदले.
दिल्ली- जयपूर २१९ किमी आहे. जवळ जवळ साडे चार तास लागतात.मस्तपैकी काळाभोर डांबरी ४ लेन रस्ता.शनिवारी सकाळी ६.३० ला घरातून निघालो,दिल्लीची कडाक्याची थंडी- तापमान ८ डिग्री. सवाई जयसिंगाच्या जयपुरच्या स्वप्नात रमत प्रचंड उत्साहात गणपतीचे नाव घेऊन कारचा स्टार्टर मारला.असे वाटत होते की गाडीही खूप खूश होती.
दिवस पहिला : साधारण २ तास प्रवास झाल्यावर वाटेत "फौजी " नावाचा एक ढाबा लागला. ढाब्यावर खायचे म्हणजे भूक द्विगुणित होते नाही.सकाळी लवकर निघाल्यामुळे पोटात गुरगुरायला लागले होते.आलु-प्याजवाले तंदुरी पराठे, तवा पराठे,गोड दही, लोणचे आणि फक्कड वाफाळता चहा असा आमचा न्याहारीचा बेत आटपून आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला. जाता जाता वाटेत थांबून सरसो(मराठी शब्द नाही माहीत) च्या शेतात सोनेरी पिवळ्या फुलांचा बहर डोळ्यांना आनंद देत होता.जयपूरला आम्ही १२ ला पोहोचलो. शहरात प्रवेश करताना तिथली गजबज,दुकाने,तिथल्या वेषातले लोक,गुलाबी इमारतीवर पांढरे नक्षीकाम असे सगळे बघत बघत आम्ही हॉटेलवर पोहोचलो. दुपारचे जेवण उरकून आणि घटकभर विश्रांती घेऊन आम्ही ५ ला तिथल्या बाजाराचा फेरफटका मारायचे ठरवले. बाजाराचे नाव "बापू बाजार". बापू बाजारात सगळ्या प्रकारची दुकाने बघायला मिळतात. जयपुरी मोजडी,जूती,लाखेच्या बानगड्या, पारंपरिक कपडे,जयपुरी बेडशीट्स,खाण्या पिण्याच्या दुकानाची रेलचेल हे सगळे बघून वेळ कसा गेला ते कळालेच नाही. दुसऱ्या दिवशी बरीच ठिकाणे बघायची असल्यामुळे लवकर जेवण आटपले.
दिवस दुसरा : दुसऱ्या दिवशी सकाळचा आमचा प्रवास सुरू झाला तो "बिर्ला मंदिर" पासून. पूर्णपणे संगमरवरी दगडाने बनवलेले पांढरे शुभ्र मंदिर आणि त्यावर सूर्याची किरणे पडल्यामुळे अजूनच छान चमकत होते. मंदिरच गाभाऱ्यात लक्ष्मी-नारायणाची सुंदरशी पांढरी शुभ्र मूर्ती आहे आणि आजूबाजूला दिव्यांच्या समया होत्या.वातावरण अगदीच भक्तिपूर्ण झालेले होते. सकाळी ९-१२ खुले असते आणि मग दुपारी ३-९ रात्री पुन्हा खुले असते.बिर्ला मंदिरच्या शेजारी एक छानसे गणपती मंदिरही आहे. मंदिरच्या बाहेर पडताच एक डोंगर आहे त्याला "मोती डुंगरी" म्हणतात.
त्या नंतर आम्ही सिटी पॅलेस बघायला गेलो.राजस्थानी आणि मुघल संस्कृतीचा उत्तम मेळ आहे. सवाई जयसिंगाने ह्याचे बांधकाम केले आहे आणि नंतर २० व्या सनापर्यंत ह्याचे काम होत राहिले आहे. सगळ्यात आधी स्वागत करतो तो "मुबारक महाल" (रिसेप्शन).सिटी पॅलेसमध्ये २-३ संग्रहालय आहेत,एक हत्याराचे,एक पुरातन कपड्यांचे आणि चीजवस्तूंचे. इथे सवाई माधव सिंगाचेही साम्राज्य होते.तो म्हणे ७ फूट उंच आणि ४ फूट रुंद होता आणि त्याचे वजन २५० कि̱. ग्रा. होते.इथे खूप जुने शस्त्र,अवजारे आहेत. जुन्या बंदुका, तलवारी त्यांची चिलखते असे बरेच काही ठेवले आहे.पाचू आणि माणक्यानी मढवलेली तलवार "राणी विक्टोरीया" ने राजा राम सिंगाला भेट दिली आहे. इथे प्रवेश फी रु.२००/- (मोठ्यांसाठी) आणि रु.१००/- (लहानांसाठी) आहे. कॅमेरा घेऊन जायला परवानगी नाही पण चोरून घेऊन गेले होते.
नंतरचे स्थळ होते : जंतर मंतर . सवाई जय सिंगाने जतन करून ठेवलेल्यातले हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. दगड आणि संगमरवराने बनवलेले असून त्यांची रचना आणि आकार वैज्ञानिक प्रकारे केला आहे कि पूर्वी लोक वेळ, ग्रह, सण आणि वार कळत असायचे. इथे प्रवेश फी रु.२०/- आहे. इथून बाहेर पडताच एक राजस्थानी एंपोरियम आहे इथे बांधणीचे कपडे आणि मूर्ती मिळतात.
पुढचे स्थळ : हवा महाल : १७९९ मध्ये बांधलेले एक उत्तम आणि आश्चर्यात टाकणारे असे माती आणि निव्वळ चुन्याचे बांधकाम.जयपूरच राण्यांना सणासुदीचे कार्यक्रम बघण्यासाठी खास बांधलेले. ह्याला पाया नाही आणि ३६५ खिडक्या आहेत ८७क्ष८७ अशी लांबी रुंदी आहे. ह्या खिडक्यांमध्ये उभे राहून मस्त गार हवा येते कूलरसारखी म्हणून नाव हवा महाल.
क्रमशः ..