संवाद
शरीर म्हणालं आत्म्याला,
"मीच तर तुला आधार दिला---
नाहीतर बसला असतास कुठेतरी लटकत
किंवा पडला असतास अधांतरी खितपत!
विधात्याने हात पाय दिले नाहीत-----
------ तरी तुला वणवण काही चुकली नाही
तुझ्या असण्याचा काळ 'अनन्त' आहे---
हीच तर केवढी मोठी खंत आहे!
मी आहे म्हणून तुझ्या 'असण्या'ला अर्थ आहे---
माझ्याशिवाय तुझं 'तू'पण अगदीच निरर्थ आहे."
आत्मा हसला---नुसतंच हसला,
आणि मुख्य म्हणजे पहिल्यांदाच
देहाला तो 'दिसला'!
पण---
देह इतका उतला, इतका मातला---
आत्म्याच्या निघून जाण्याचा
त्याला पत्ताच नाही लागला!
आत्मा बोलू लागला शब्द जुळवत जुळवत----
---पण ऐकू कुठं येत होतं शरीराला?
"मी येतो परत, एकदा गेलो तरी
तेव्हा तू असतोस कुठे जागेवर?
गेल्यानंतर जळून खाक-----धडधडत्या चितेवर
--नाहीतर गिधाडांच्या तोंडी---
---किंवा माती लोटतात तुझ्यावर"
इतकं बोलून आत्मा हलला,
आपलं 'हलकेपण' सांभाळत
'पुढचा तरी शहाणा मिळू दे'
असं स्वतःशीच म्हणत!