माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा
बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही
फुरफुरणारे बाहू माझे प्रचंड शक्ती आणि उसासे
तोडायाचे बंधन जे जे आवेशातुन उतरत नाही
थरथरणार्या स्वरात माझ्या कंपुन उठतिल भाव-भावना
स्वच्छंदी गाण्यात परंतू तान मोकळी येतच नाही
दहा दिशांच्या रिंगणातुनि क्षितीज सुद्धा उल्लंघिन मी
एकवटाया सारे बळ परि मनगट ते सरसावत नाही
रंग उषेचे हातामधुनि उधळित जाईन पानोपानी
घेतो मी कुंचला तसा अन् विचार तेव्हा रंगत नाही
मी वेडा आनंदासाठी धुंद मोकळ्या श्वासासाठी
मन्मनात जे आता आहे अंतरातुनि बरसत नाही
उगाच फिरतो पृथ्वीवरती शोधित जातो उजाड नाती
मी माझ्याशी ठेऊन नाते माझ्याशीही बोलत नाही
कवितेची पार्श्वभूमी-
पुरुषोत्तम करंडक २००६ मधे COEP (पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय) ने सादर केलेल्या "होते कुरूप वेडे" या एकांकिकेसाठी लिहिलेली ही कविता आहे.
लेखन, कविता यांची आवड असलेल्या, पण परिस्थिती/ पालकांच्या दबावामुळे आपल्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष करून केवळ पाठ्य अभ्यासात बुडून गेलेल्या मुलाची घुसमट या एकांकिकेमधे आहे. तो मुलगा (समीर) रोज अनुदिनी (डायरी) लिहीत असतो. या एकांकिकेमधे डायरी हे एक पात्र आहे. आपल्या क्षमतांची जाणीव झालेला, पण भविष्याविषयी साशंक झालेला समीर मनातल्या मनातच घुसमटतो आणि आपल्या भावना ह्या कवितेतून डायरीला सांगतो, अशी कल्पना आहे.