बोधगोष्ट

राजाजवळी मुनी देतसे सुमधुर साधे फळ
तुच्छदृष्टिने पाही तयाप्रत दावी न च कळकळ।
प्रधानाकडे नित्य जाई ते राजस्पर्श न होई
अधिकारी तो रूक्षपणाने तया भुयारी ठेवी।
एके दिवशी सहज म्हणोनी नृपते स्वहस्ताने
फळ अर्पियले शुकास अन् तो खाई चवीचवीने ।
संपे ते फळ कीरपंजरी प्रभा चहूबाजूंना
राजा दिपला पंजरगर्भी पाहून राजसरत्नां।
पश्चात्तापे पोळुन जाई आणिक पुसे प्रधाना
"कुणीकडे ती रत्नफळे फेकियली मज दावा ना"।
प्रधान नेई नृपास तेथे नवलभऱ्या नयनांनी
फळे फेकुनी दिधली जेथे आपुल्याच हातांनी।
भुयार आता नव्हते उरले भीषण काळोखाचे
लखलखणारे दालन झाले--राज्यच रत्नप्रभेचे।
सरून गेली फळे तरीही उरलेली ती रत्ने
निजतेजाने झळकत होती पाही तो नृप नयनें
मानव तो नृप दैव हो मुनी आपण सारे जाणा
क्षण क्षण असती फळे तयांना निकट आपुल्या आणा।
राजापरी जे क्षणां फेकिती नीट निरखल्याविना
तुम्हीच सांग किती दवडिती अमूल्य त्या रत्नांना !॥