मंगळगड व कावळ्या दुर्गभ्रमण

मंगळगड व कावळ्या

जावळीच्या खोऱ्यातील ढवळ्या घाटावर लक्ष ठेवणारा  मंगळगड हा मोक्याच्या ठिकाणी (विकीमॅपीआ) आहे. इथून तोरणा, राजगड, प्रतापगड, मकरंदगड, रायगड असे किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात. चढायला सोपा आणि पायथ्यापर्यंत गाडी जाते म्हणून एका दिवसात होतो. ह्यालाच जोडून कावळ्याही करता येतो किंवा एखादा दिवस वाढवला तर चंद्रगडही करता येतो.

एका दिवसात मंगळगड आणि कावळ्या करायचा म्हणून आम्ही (मनोज, कीर्ती, मंदार आणि मी) चौघे २० डि‌से. २००८ ला पहाटे ६:३० ला पुण्याहून निघालो. उजाडायच्या आत भोर गाव गाठले. तिथे अर्धा तास नास्ता करण्यात गेला. भोर वरून थेट निघालो ते वरंध घाटा कडे. वाघजाई मंदिराच्या आधी २-३ कि.मी. सोनेरी उन्हे पडलेल्या सह्याद्रीच्या रांगांचा फोटो (राजगड , तोरणा , रायगड ) काढले. 

वरंध घाट उतरला की ज्या गावच्या नावे हा घाट आहे ते वरंध गाव लागते. तिथून २-३ कि.मी महाडच्या दिशेने गेले की ढालकाठी म्हणून एक फाटा (विकीमॅपीआ) लागतो. (शिवथरघळीच्या फाट्याच्या पुढे). तिथून डावीकडे (वरंधा कडून महाडकडे येताना) १७ कि.मी. वर हा गड आहे.  हा १७ कि.मी चा रस्ता काही डांबरी आणि काही कच्चा आहे. हा रस्ता पिंपळवाडी ह्या गावाला नेऊन पोचवतो. तिथे गाडी लावायला शाळेजवळ जागा आहे. जवळच हातपंपावर पाणीही भरून घेता येते. रात्री वस्ती करायला शाळेचा व्हरांडा उपयोगी पडू शकतो. १०:३० ला गावात पोचलो आणि थेट  गडावर चालायला सुरुवात केली. गडावर जायचा मार्ग जवळच एका पाटीने दाखवला आहे.

चालायला सुरुवात केल्यावर १००-१५० मीटर नंतर एक रस्ता वरती जातो तर एक सरळ. वरती जाण्याच्या रस्त्यावर २ पायऱ्या आहेत. एक पायरीवर वरचा मार्ग दाखवणारा बाण काढला आहे. वरचा रस्ता गडावर पोचवतो. जवळच एक वरून येणारा ग्रुप बसला असल्यामुळे आम्ही चुकायचो वाचलो. नाहीतर सरळ जाऊन जंगलात हरवलो असतो. डांबरी रस्त्यावरून वरती चढायला सुरुवात केली की १०० मीटर वर उजवीकडे बसायचा कट्टा लागतो. तिथून रस्ता डावीकडे वळतो. त्या वळणापासूनच १० एक हातांवर उजवीकडे ह्या पायऱ्या आहेत.

वाटेत ढोरवाटा भरपूर आहेत. बाणही दाखवले आहेत. मुख्यता उजवीकडचा रस्ता पकडावा. काही ठिकाणी ह्याला अपवाद आहेत. पण रस्ता बऱ्यापैकी मळलेला आहे. ही वाट मुरमांच्या खडीने निसरडी झाली आहे. नागमोडी वळणे घेत ही वाट एका पठारावर नेऊन पोचवते.  इथूनच डावीकडे मंगळगडाचे दर्शन होते. पठारावर पोचल्यावर डावीकडची वाट गडावर जाते. मध्येच झाडी, मध्येच मोकळी वाट असे करत करत आपण गडाच्या नाकाच्या खाली येतो. (विकीमॅपीआ) इथे एक वाट डावीकडे तर एक उजवीकडे जाते. डावीकडची वाट (गड उजवीकडे ठेवत) गडावर घेऊन जाते. तर उजवीकडची वाट वाटघर ह्या गावाला जाते. ह्याच गावाने पुढे चंद्रगडावर (विकीमॅपीआ) जाता येते.

डावीकडची वाट पकडली की समोर एक बेचके दिसू लागते. ह्याच बेचक्याने वरती चढायची वाट आहे. आता वाट बऱ्यापैकी जंगलातून जाते त्यामुळे उन्हाचा तडाखा एव्हढा जाणवत नाही. दरवाज्यातून वरती चढल्यावर समोरच एक माची आणि त्यावरचे मंदिर (विकीमॅपीआ) दिसू लागते.  वरती पोचल्यावर समोर महाबळेश्वरचे पठार, चंद्रगड दिसतात. जराश्या उजवीकडे प्रतापगड आणि मधु-मकरंदगड दिसतात. पाठीमागे लांबवर तोरण्याचेही दर्शन घडते.

मंदिराकडे जाताना उजवीकडेच एक छोटेसे पाण्याचे टाके आहे (विकीमॅपीआ). अजून पुढे गेले की उजवीकडेच अजून मोठे पाण्याचे टाके (विकीमॅपीआ) दिसते. उन्हाळ्यात पाण्याची तशी बोंबच असणार. तरीपण प्यायला पाणी मिळेल. पाणी हिरवट रंगाचे आहे. त्यामुळे जर खूपच जरुर पडली तरच प्यावे. मंदिर पावसाळा सोडून इतर ऋतूमध्ये राहायला व्यवस्थित आहे. मंदिरावरचे बरेशचे पत्रे उडून गेले आहेत. मंदिरात मोठी मोठी तपेली ठेवली असल्यामुळे त्यात अन्न शिजवता येईल. ढाक च्या भैरी एव्हढी भांडी नसली तरी १५-२० माणसांचे जेवण होईल एव्हढे मोठे भांडेही आहे.

मंदिरात पोचेपर्यंत १२:३० वाजले होते. न थांबता आणि वेगात चढले तर एक-सव्वा तासात वरती चढता येईल. दुपारचे जेवण करून आम्ही गड पाहायला निघालो.

गडावर तसे पाहण्यासारखे टाक्या आणि पडके अवशेषच राहिले आहेत. गडाच्या डावीकडच्या अंगाने वरती चढताना काही पाण्याची टाकी (विकीमॅपीआ) लागतात. त्यात बऱ्यापैकी पाणी होते. वरती चढल्यावर वाड्याचे पडके अवशेष दिसतात. सरळ पुढे गेल्यावर वाट उत्तरेकडच्या माचीवर पोचवते. तिथून आपण आलो ते पिंपळवाडी दिसते. समोर राजगड, तोरणा दिसतात. डावीकडे रायगड दिसतो. डोंगरयात्रा ह्या पुस्तकाप्रमाणे उजवीकडे अस्वलखिंड आणि जननी दुर्ग दिसतो (हे काही नीटसे ओळखता आले नाहीत.).

जवळपास १:३० च्या सुमारास आम्ही परत खाली निघालो. १ तासात २:३० ला  गाडी लावण्याच्या ठिकाणी पोचलो. गावात शाळेजवळ हातपंपावर पाणी भरून , हात , तोंड धुऊन वरंध घाटाच्या दिशेने निघालो.

एक महिन्यापूर्वीच वरंध घाटात बिबट्या दिसल्याची खबर होती. रस्त्यावर १०-१५ मिनिटे बसून होता. खूप वर्षांनी वरंध घाटात बिबट्याची बातमी ऐकली. २ एक आठवड्यापूर्वी ह्याच घाटात वाटमारी करणाऱ्या चोरट्यांना पकडले. त्याची कहाणी सुरस आहे. माझेरी गावात वनखात्याचे एक ऑफिस आहे.  तिथून वरून खाली येणाऱ्या गाड्या दिसतात.  रात्री त्यांचे दिवे सहज दिसतात. एका रात्री वनअधीकारी जागून वरच्या गाड्या पाहत होता. वरून एक गाडी त्याला खाली येताना दिसली. अर्धा तास झाला तरी त्याला ती गाडी माझेरी पास करून जाताना दिसली नाही. त्यामुळे त्याला संशय येऊन त्याने वरती जाणाऱ्या सगळ्या गाड्या माझेरीतच थांबवून  ठेवल्या. पोलिसांना फोन करून त्यांना बोलवून घेतले. साध्या गाडीने पोलीस वरती निघाले. वरंध घाटात एका यू वळणावर त्यांना एक इंडीका दिवे बंद करून थांबलेली आढळली. त्यातच चोर लपून बसले होते. ही लोक वरून किंवा खालून येणाऱ्या गाड्यांना अडवत असत आणि लूटमार करत असत. ह्या वळणावर वेग कमी असल्यामुळे त्यांना सहज लूटमार करता येत असे.

वरंध गावाकडे येत असताना जिथे रायगड दिसायला सुरुवात होते त्या आधीच जवळ कोकणदिवाही (विकीमॅपीआ) ५ एक सेकंद (गाडीतून) दर्शन देऊन जातो.

वरंध घाटातून वरती चढल्यानंतर जिथे रायगड जिल्ह्याची हद्द संपते तिथेच कावळ्या किल्ल्याची वाट आहे (विकीमॅपीआ). हा किल्ला फोडून वरंध घाट बनवला आहे.   त्या वळणावरच गाडी कडेला लावता येते किंवा वाघजाई मंदिरा पाशी गाडी लावता येते. फक्त माकडांपासून सांभाळावे लागते.

वरंध घाट कावळ्या किल्ल्याला दोन भागात विभागतो. उत्तरेकडचा भाग हा शिवथरघळीकडे तोंड करून आहे. तर दक्षिणेकडचा बरोबर वाघजाई मंदिराच्या वरती आहे. भोरकडून येताना कावळ्या किल्ल्याचे दोन्ही भाग मस्त दिसतात (कावळ्याचा उत्तरेकडचा भाग , कावळ्याचा दक्षिणेकडचा भाग ). बरेचसे लोक उत्तरेकडच्या बाजूस जातात. घाटाच्या वळणापासूनच ह्या भागाकडे वाट जाते. डावीकडची वाट पकडली की मुरूम आणि खडी वरून ही वाट पठारावर पोचवते. वरच्या पठारावरून शिवथरघळीचे दर्शन होते. कावळ्या किल्ल्याला टेकूनच असलेल्या वानरलिंगीचेही (विकीमॅपीआ) दर्शन होते. इथून एक वाट शिवथरघळीला (विकीमॅपीआ) जाते असे ऐकले आहे.

पठारावरून वाट उजवीकडे खाली उतरते. ह्या वाटेने खाली उतरून डावीकडे वळले की छोटेसे विटांचे बांधकाम दिसते. उजवीकडे काही खोपट्याही दिसतात. इथून पुढे वाट बुजलेली आहे. जिथे विटांचे बांधकाम आहे त्याच्याच पाठीमागच्या टेकाडावर भगवा (विकीमॅपीआ) आहे. पण त्यावर जायचा रस्ता ह्या टेकाडाला उजवीकडून वळसा घालून आहे. वाट शोधत शोधत गेले की भगव्या पाशी पोचतो. वरंधा घाटातून (कावळ्यावरून दिसणारा वरंध घाट ) इथे यायला फक्त अर्धा तास लागतो. वरून समोर राजगड, तोरणा, मढेघाट, गोप्याघाट (विकीमॅपीआ), रायगड हे सर्व दिसते.खालचे दृश्य ही नयनरम्य दिसते.

आम्ही परत फिरलो तेव्हा संध्याकाळचे ५:१५ वाजले होते. ६:२० ला च्या आसपास सूर्यास्त होत असल्यामुळे लवकरात लवकर कावळ्याचा दुसरा भाग करायचा होता. वाघजाई मंदिरापाशी पोचून एका टपरीवर दुसऱ्या भागावर कसे जायचे हे विचारले. त्यांनी सांगितले की जवळच वरती जायचा रस्ता आहे. हे टपरीवाले तिथूनच पाणी आणतात. तेव्हढ्यात एक बाई वरती जाताना दिसली, म्हणून चहाची ऑर्डर रद्द करून आम्ही त्या बाईच्या पाठीमागे गडावर निघालो. वाघजाई मंदिरापासून भोरच्या वाटेकडे ५०-७० मीटर वर ही वाट फुटते. टाक्यांपर्यंत मळलेला रस्ता असल्यामुळे काहीच अडचण येत नाही. वरती चढायला एकदम सोपे आहे. वरती पाण्याची ९ टाकी आहेत (विकीमॅपीआ). ह्यांनाच नवटाकी असेही म्हणतात. तिथूनच वाघजाई मंदिराच्या बरोबर वरती असलेल्या मंदिराकडे वाट जाते. मी इतक्या असंख्य वेळा वरंध घाटातून आलो आहे पण वरती अजून एक मंदिर आहे आणि भगवा आहे हे काही दिसले नव्हते.

मंदिर म्हणजे काही मुर्त्या ठेवल्या आहेत. टपरीवाले ह्याची पुजा अर्चा करतात. मंदिरापासून पुढे गेले की काही पायऱ्या दिसतात.  हा गडाचा दरवाजा असावा (विकीमॅपीआ). घाट बनवताना सगळे जमीनदोस्त झाले असावे.  इथून खाली वाघजाई मंदिर आणि रस्ता दिसतो. खालून काही लोक आमच्या कडे अचंबित नजरेने पाहत होते की ही माणसे वरती कशी गेली.

परत टाक्यांपाशी आल्यावर वरती जायला एक वाट फुटते. तिथून सर्वात वरती जाता येते. इथून वरंध घाटातली वळणे (विकीमॅपीआ) मस्त दिसतात. वरती देखाव्या शिवाय पाहायला असे काही नाही. जर कधी संध्याकाळी ह्या घाटातून जात असलो तर अर्धा तासात वरती येऊन जायला काहीच हरकत नाही.

६:२० ला सूर्यास्ताच्या सुमारास खाली उतरलो आणि मस्त भज्यांवर ताव मारला. चहा आणि आठवणी घेऊन परतीच्या वाटेला लागलो.

ह्या भ्रमंतीचे फोटो (मंगळगड, कावळ्या) इथे ठेवले आहेत. ह्या दुव्यांवर जास्तीची चित्रे आणि त्याखाली काही माहितीही लिहिली आहे. (जी ह्या वृत्तांतात बसू शकली नाही)

:-आनंद

ता.क. : हा लेख मायबोली आणि ह्या ब्लॉग वरही प्रकाशीत केला आहे.