एक विद्रोही

संतोष पद्माकर पवार. "भ्रमिष्टाचा जाहीरनामा' लिहिणारा. त्याच्या निर्मितीला काय म्हणावे? कविता की सुसंस्कृत समाजासाठी तळमळणाऱ्या वेड्याचा हुंकार की, स्वान्त सुखाय समाजाच्या दृष्टीनं एक काफिरनामा. काहीही असो. त्याचा हा दीर्घ कविता संग्रह म्हणजे बनचुक्‍या, आत्मकेंद्री आणि सामाजिक अपप्रवृत्तींचा केलेला पंचनामा जरूर आहे. म्हणूनच काव्यविश्‍वातील मानाचा- 25 हजार रुपयांचा- "अभिधानंतर पुरस्कार' संतोषच्या या काव्यकृतीला मिळाला. त्यानंतर त्याला अनेक पुरस्कार मिळाले.
ज्येष्ठ साहित्यिक रा. ग. जाधव यांच्या हस्ते नगरचा संजीवनी खोजे पुरस्कार त्याला मिळाला.
या कार्यक्रमात श्री. जाधव यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया संतोषला थेट महाकवी बा. सी. मर्ढेकर आणि केशवसूत यांच्या पक्तीत नेऊ बसविणारी आहे. ते म्हणतात, ""मर्ढेकर, केशवसुत यांच्या कवितेतील वैश्‍विकता संतोष पवार यांच्या कवितेत विकसित होताना दिसते.''
ज्येष्ठ कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी तर ""संतोषची कविता ऐकताना समग्र शतकाची घरघर ऐकतोय, असं वाटत राहातं,'' अशी संतोषची वाखाणणी केली आहे.
असा हा सामाजिक विषमतेविषयी असंतोष बाळगणारा माझा मित्र संतोष. मूळचा श्रीरामपूरचा (जि. अहमदनगर). नोकरीनं तो ग्रामसेवक होता. आता दहिवडी येथे प्राध्यापक आहे. विषमतेविषयी त्याच्या मनात नेहमीच प्रचंड अस्वस्थता दाटलेली असते. त्याला विचारलं तुझ्या कवितेची प्रेरणा काय? म्हणाला, ""ग्रामसेवक म्हणून काम करताना दररोज 400-500 नागरिकांशी जवळून संबंध यायचा. या लोकांच्या आयुष्यात ओळीनं येणारी दु:ख. त्यात उद्‌ध्वस्त होणारे अनेक. भोवतालचं भीषण वास्तव, कधी नं संपणारी विषमता, आहे रे - नाही रे ची दरी. त्यातून प्रत्येकला येणारं नैराश्‍य. नैराश्‍यातून अंधश्रद्धेकडे वळणारा प्रत्येकजण. हे चित्र पाहिलं की मी अस्वस्थ होतो. ही अस्वस्थता म्हणजे माझी कविता.''
कवितेच्या मनोरंजक आणि बदलत्या स्वरूपाविषयी संतोष म्हणतो, ""ज्ञानेश्‍वर-तुकाराम-मर्ढेकर-विंदा या महाकवींनी काव्यविश्‍व इतकं समृद्ध करून ठेवलंय की कवितेचं स्वरूप बदललं, तरी काहीही फरक पडत नाही; परंतु माध्यमांशी संपर्क, प्रसिद्धीचा हव्यास, मानधनाची अपेक्षा यामुळे जर कवितेचं स्वरूप बदलणार असेल तर, तो कवीचा व्यक्तीद्वेष आहे. पण आमच्या नव्वोदत्तरी पिढीकढे कवितेविषयी निश्‍चितच चांगलं भान आहे. साठोत्तरी काळात लघुनियतकालिकांच्या कवींनी जे काम केलं, त्या मूळ उद्देशापासून दूर गेलेल्या कवितेस पुन्हा त्या सकस वळणावर आणण्याचे काम नव्वोदत्तरी पिढीने केले आहे. त्यातलाच मी एक आहे.''
वात्रटिका-प्रासंगिकांबाबत ही संतोषची मते वेगळी आहेत. ""वात्रटिका-प्रासंगिका एक तर घडून गेलेल्या घटनांविषयी बोलते. सध्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांतून व्यक्त झालेल्या मतांशी वात्रटिका सहमतीकरण करते. हा कवितेचा स्वतंत्र भाग होऊ शकत नाही. हिंदीत जशा व्यंग कविता आहेत, तशा व्यंगकविता दत्तू बांदेकर, रामदास फुटाणे यांनी मराठीत लिहिल्या; परंतु नंतर या प्रकारच्या रचना करणारांनी राजकीय परिप्रेक्ष्य निवडला. त्यामुळे तो केवळ शब्दांचा खेळ होऊन बसला.''
कविता ही वैचारिक चळवळीसारखी असते किंबहुना आहे. राजकीय अभिनिवेष, व्यक्तिद्वेष तिच्यातून डोकावत नाही. कविता हे प्रबोधनाचे आणि सामाजिक भान निर्माण करण्याचेच माध्यम आहे, असे संतोषचे ठाम मत आहे. मराठी सारस्वताला शब्दांचं जे धन पूर्वापार मिळालं आहे, त्याचा वापर कसा व्हावा; कसा होऊ नये, याविषयी तो विशेष आग्रही असतो. त्याच्याच कवितेच्या विद्रोही थाटात सांगायचं तर...
... लिहिण्यापेक्षा इथं बोभाट्यांनाच जादा महत्त्व
चिंतनापेक्षा टाळ कुटण्याला तर अग्रमहत्त्व
मागचे सांगण्यासाठी लिहिणे की,
समस्त मानवाने पुढे काय करावे,
हे सांगण्यासाठी लिहिणे हे ठरत नाही,
तोपर्यंत ह्या कागदाच्या लगद्यांना
न?ही कुठलेच अर्थ...
...डफडं वाजवून पोट भरणारे
या जगात कमी नाहीत
म्हणूनच साऱ्यांनीच
कागदाच्या चमड्यावर
होकाराच्या निबा घासायच्या नसतात
निदान पोट भरल्यावर
सरत्या शाईच्या थेंबातून
सत्याची दोन अक्षरे जरी प्रसवली तरी
खूप झाले... खूप झाले...

www.santshali.blogspot.com

संतोष पवार, फोन : 9422796678