ह्यासोबत
दहा लाखाच्या चेकने घरात एक चैतन्य नव्याने जन्माला आलं. हर्षोल्लासाची अनेक कारंजी घरात उसळू लागली. आमचे कुलदीपक आणि कुलदीपिका या आमच्या वंशविस्ताराला, आपले पप्पा कित्ती कित्ती ग्रेट आहेत हे आत्ता कळलं आणि तो साक्षात्कार मित्र मैत्रिणींना कळविण्यासाठी दोघांच्याही कानाला मोबाईल फोन चिकटून बसला. एरवी मी माझ्या लेखनाचा ‘ले’ जरी उच्चारला तरी " पप्पा प्लीज, पकवू नका" अशी त्यांची प्रतिक्रिया असायची. सौ चेकवरची रक्कम पाहताच क्षणभर सुन्न झाली आणि पुढछ्याच क्षणी तिच्या डोळ्यात पाणी तरारलं. तिच्या चेहर्यावर इतका संपृक्त आनंद मी या पूर्वी पाहिला नव्हता. सौ ने चेक देवापुढे दिवा लावला आणि चेकही देवापुढे ठेवला. तेवढ्यात फोनची घंटा घणाणली आणि सौ तीरासारखी तिकडे धावली. फोन घेण्यासाठी मी कांही हालचाल करण्याची कांही आवश्यकता नव्हती. अग्रक्रमाने तो हक्क तिचाच होता. फोनवर "हो, हो! थँक्यू, थँक्यू! पार्टी नं? देउ की. त्यात काय एवढंसं!" असली वाक्य कानावर येऊ लागली तेंव्हा तो फोन तिच्या महिला मंडळातील कुणा बुभुक्षितेचा असणार यात शंका नव्हती. संभाषण आटोपून फोन खाली ठेवताच पुन्हा त्याचा गजर वाजणे आणि मघाचेच संभाषण याची पुनरावृती सुरू झाली. म्हणजे ‘दुष्मनोंको कानोकान खबर हो गई’ आणि ‘सर मुँडवाया और ओले पडे’ याची कल्पना आली. तेवढ्यात घराच्या दरवाजाशी एखादी गाडी येऊन थांबल्याचा आवाज आला. मी अभ्यागतावागमनसूचकघंटिका वाजण्या आधीच दरवाजा उघडला आणि पुन्हा एकदा माझी जीभ टाळ्याला चिकटली. टीव्ही, त्यापुढे बीवाय आणि सर्वात पुढे सुता अशी रांग दाराबाहेरच्या पायर्यांवर उभी.
" हाय एडी..." असे किंचाळत सुता माझ्याकडे झेपावली. काल एडी आणि बीवायला पाहताच तिने जे जे कांही केलं होतं ते ते, म्हणजे गालाला गाल वगैरे सगळं केलं. मी गांगरून मागे पाहिलं तर एव्हाना आमची आख्खी फॅमिली आ वासून आमच्या कडे बघत होती. कांही वेळापूर्वी तो दहा लाखाचा चेक पाहिल्यानंतर सौ च्या डोळ्यात उजळलेल्या ज्योतींचा आता खदिरांगार झाला होता. दुसर्याच सेकंदाला सौ तीरासारखी धावली ती माझ्या आणि सुताच्या मधे येऊन उभी राहिली. तिने सुताला धाडकन मागे ढकलले आणि,
" कुच नै मंगताय हमको. क्रेडिट कार्ड बीर्ड, कश्मिरी शाल बील. कुच नै मंगताय. जाव चले जाव." अशी गरजली.
" ओह् मॉम, कूल मॅन. अगं हे कांही सेल्स्मन वाटंत नाहीयेत. त्यांना आधी आत तर येऊ देत." असं म्हणत करणने त्याच्या आईला मागे ओढलं.
सुताने आता जे कांही केलं त्याने कुलदीपक आणि तिचा पेहराव, चेहर्यावरची रंगसफेती हे पाहून कुलदीपिका प्रभावित झाली होते. त्यानंतर करणने रीतसर ते तिघे आत येऊन सोफ्यावर स्थानापन्न होईपर्यंतचे सर्व उपचार पार पाडले. मी आलेला घाम पुसत पुसत माझ्या कुटुंबियांचा आणि त्या तिघांचा परस्पर परिचय करून दिला. ते तिघे मला आणि आम्हा सर्व दामले कुटुंबियांना ईमडॉकॉच्या ‘जा भुतांनो जा’ या नव्या धारावाहिक मालिकेच्या, जिचा मी कथालेखक झालो होतो, शुभारंभाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी आलेले होते. त्या समारंभाला त्यांच्या (नव्हे आता आमच्या भाषेत) ‘महूरत’ म्हणतात हे सारं मी ते तिघे आमंत्रण देऊन गेल्या नंतर आमच्या तिघांना समजावून सांगितले. शिवाय टीव्हीच्या स्वामींचा या समारंभासाठी आजच्या संध्याकाळचाच मुहूर्त प्रशस्त आहे असा ‘एस्सेमेस’ आला आहे असे टीव्ही म्हणाला होता.
"जळ्ळी मेली ती तुमची सिरियल. त्या भवानीच्या गळ्यात गळे घालण्यासाठीच कां गेला होता तुम्ही? तर्रीऽऽऽच् म्हटलं त्या मेलीने दहा लाख कसले दिलेन् ते! आणि काय हो? त्या सटवीनं काय पाहिलं तुमच्यात? तुम्ही तर अगदी ताळच सोडलात. त्या कुसुमताई (महिला मंडळातल्या एक विदुषी) म्हणतात तेच खरं. स्सगळे पुरुष मेले तसेच, चाविनिष्ट पिग्ज! जराशी काय मेली मी सुटलेय (एकशे दहा किलो) तर, तुम्ही मला टाकायलाच निघालात." ही त्सुनामी कुलदीपकांनी संध्याकाळ पर्यंत ’मॅनेज’ केली तेंव्हा कुठे आम्ही महूरताच्या ठिकाणी अवतीर्ण होऊ शकलो. चिरंजीवांचं हे मौलिक सहकार्य सहेतुक असणार यात शंका नव्हती. पण ते यथावकाश समजले असतेच. आत्ता काळजी करण्याचे कारण नव्हते. गावांबाहेरच्या एका चित्रपट गृहात महूरताचा कार्यक्रम ठेवला होता. नाही तरी, एकेकाळी बहुदा केवळ मराठी चित्रपटांसाठीच, अशी खासीयत असणार्या या चित्रपटागृहाला हल्लीच्या मल्टिप्लेक्सच्या जमान्यात या पेक्षा किफायतशीर धंदा तो काय असणार.
समारंभाच्या ठिकाणी पोहोचायला आम्हा तिघांना तसा थोडा उशीरच झाला होता. अनेक साड्या अदलून बदलून नेसून पाहून शेवटी लग्नातलाच शालू नक्की करण्यासाठी लागलेला वेळ हे उशीराचे कारण होते. पण त्याला इष्टापत्ती म्हणता येईल. कारण त्यामुळे सौ चे धुमसणे बर्यापैकी निवळले होते. तिथे सुता सामोरी येताच ती ढालीसारखी माझ्यापुढे ठाकली होती. टीव्हीने मझ्या गळ्यात एक मोठासा हार घालीत माझी सर्वांशी नव्या मालिकेचा लेखक अशी ओळख करून दिली. सगळीकडे रंगीबेरंगी फुलांच्या माळांची सजावट केलेली होती. चित्रपट गृहाच्या पडद्यावरही अशाच माळा सोडलेल्या होत्या. त्या पुढील मचावर एका मेजावर टीव्हीच्या त्या स्वामींची तसबीर ठेवलेली होती. तसबीरीच्या दोन्ही बाजूला समया तेवत होत्या. शिवाय शेजारी एक भली समई उभी होती. पण तिच्या वाती शांतच होत्या. सहा सात प्रखर प्रकाश झोत टाकणारे दिवे, कांही मंचाच्या वरती लटाकावलेले आणि कांही मंचासमोर तिकाटाण्यावर उभे होते. प्रत्येक दिवा संभाळायला स्वतंत्र असा एक माणूस ठेवलेला होता. भला मोठा कॅमेरा खांद्यावर वागवीत एक दाढीवाला इकडे तिकडे फिरत होता. एक पाश्चिमात्य संगीताची धून मंदस्वरात कुठेतरी वाजत होती. एवढ्यात " आले, आले. दादा आले." असा गलबला कानी आला. एक गौर वर्णीय, उंच, भरगच्च शरीरयष्टीचे, भारदस्त व्यक्तिमत्व मंचाच्या दिशेने येत होते. ते पुढे येत असतांनाच तिथे जमलेली कांही मंडळी पटापट त्यांच्या गुढग्याला स्पर्श करीत अभिवादन करू लागली.
" अय्या? हे पऽऽण? " सौ माझ्या कानापाशी दबक्या स्वरात पुट्पुटली.
" हे पऽऽऽण कोण? तू ओळखतेस यांना?" मी देखील तिच्या कानापाशी कुजबजलो.
" इश्य्य. असं काय करताय. ते अंगाई मधे नव्हते कां?"
" अंगाई..?"
" तुम्हाला नैच् समजणार. म्हणून म्हणत असते मी, जरा मराठी सिनेमे बघत चला म्हणून. पण तुमचं आपलं......"
" ते मरू देत. आधी हे सद्गृहस्थ कोण ते सांग." ते कोणीही असोत. पण त्यांना पाहून सौ ची कळी खुलली होती हे मात्र नक्की.
पण सौ कांही बोलण्यापूर्वीच सुताने मला हाताला धरून ओढत त्या गृहस्थासमोर नेऊन उभं केलं.
" दादा, ओळख करून देते. हे एडी, आय मिन् दामले. आपली सीरियल लिहिताहेत."
" गुड्! छान लिहिता. सुता म्हणाली मला तसं. गुड्, गुड् कीपीट अप्." म्हणत माझ्या डोळ्यात खोल पहात दादांनी माझे दोन्हीही खांदे दाबले आणि,
" मेक इट फास्ट सुता. एक शेड्यूल सोडून, ब्रेक घेऊन आलो आहे मी. लगेच परतायला हवं मला." असं म्हणत दुसर्या कोणाकडे तरी वळाले. तो माणूस दादाच्या चेहर्यासमोर आरसा धरून त्यांच्या चेहर्याला रंग फासू लागला. हे सगळं तो कॅमेरावाला चित्रित करत होता. एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती ही की हे दादा बोलतांना दर दोन शब्दामागे एक पॉज घेत होते. तो कशासाठी याचा विचार करीत होतो इतक्यात...
" काय म्हणाले मंदकांत?" सौ ने जवळ येत विचारलं.
" कोण मंदकांत?"
" अहो अस्सं काय करताय? तुम्ही आत्ता ज्यांच्याशी बोललात ना, तेंच. मंदकांत ढिकले. पूर्वी हिरोचं काम करायचे. आता कॅरेक्टर करतात."
एवढ्यात कमॉऽऽन. रेऽऽडी...?अशी गर्जना झाली. तो आवाज बहुदा टीव्हीच असावा. त्याठिकाणी असली बरीचशी मंडळी धावपळ करू लागली. बीवाय आणि टीव्ही मंचावर गेले. एका बाजूने मंदकांत सुताच्या खांद्यावर हात ठेऊन आले. त्यांची वेशभूषा झालेली असावी. डोक्यावरचे केस काळे पांढरे केलेले, अंगात निळ्या चौकडीचा अर्ध्या बाहीचा सदरा, खाली चट्ट्यापट्ट्याचा पायजमा. त्यांच्या पाठेपाठ कांजीवरम साडीत नखशिखान्त नटलेली वीची दाखल झाली. ध्वनीक्षेपकावर आता सनईचे सूर वाजू लागले. मदकांतांच्या हातात सुताने एक पेटती मेणबत्ती दिली. मेणबत्तीने त्यांनी मोठ्या समईची एक वात लावली. टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांच्या नंतर त्यांच्या हातातली मेणबत्ती घेऊन सुताने, बीवायने आणि टीव्हीने एक एक वात लावली. तीनही वेळेस पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. तरीही एक वात उरली. मग मंदकांताचे लक्ष माझ्याकडे गेले. सुताकडे बघत ते म्हणाले,
" अहो त्यांनाही बोलवा. कोण ते दामलेच ना? अहो ते कथा लिहीताय ना? त्यांनाही बोलवा"
" अय्या! सॉरी हं, एडी. " असं म्हणून ती माझ्या जवळ आली. माझ्या हाताला धरून मला मंचावर घेऊन गेली. सौ च्या विस्फारलेल्या डोळ्यातला संताप माझ्या पाठीलाही दिसत होता. एक समईची एक वात मीही लावली. मघा पेक्षा जरा कमीच पण टाळ्या वाजल्या. मग सुताने मंदकांतांना पेढा भरवला. त्यांनीही तिला जवळ घेत पेढा भरवला. त्या क्षणी मी सुताच्या मागेच उभा होतो. ती पेढ्याचा खोका घेऊन मागे वळाली. मी आ करण्याच्या तयारीत होतो पण नकळत डोळे मिटले गेले. डोळे उघडले तेंव्हा बीवाय उरलेले पेढे बाकी मंडळींना वाटत होता.
"नाऊ शॉऽऽट्ट" पुन्हा टीव्हीची गर्जना झाली. स्वामीजींची तसबीर हटवली गेली तिथे एक देव्हारा मांडला गेला. लाईटासची रचना बदलण्याचे काम सुरू झाले. खांद्यावरच्या कॅमेर्याच्या जोडीला एक तिकाटण्यावरचा कॅमेराही समोरच मांडला गेला. देव्हार्यासमोर वीचीला उभे करून टीव्ही कसलेसे घड्याळ तिच्या गाला जवळ नेऊन प्रकाश झोत जवळ अधिक दूर करण्यासंबंधी सूचना देऊ लागला. वेशभुषाकार पुन्हा दादांची वेशभूषा ठाकठीक करू लागला. ते चालू असतांना सुता दादांना मुहूर्ताचा शॉट समजाऊन सांगू लागली
" दादा. तुम्ही या कथेतल्या सुनेचे सासरे आहात. सून एक भरतनाट्यम डान्सर आहे. तुम्हाला तिचे डान्स करणे आवडात नाही. बट् यू आर अ कन्सीडरेट न् सोफ्ट स्पोकन् पर्स्नॅलिटी. शॉट सुरु होतो तेंव्हा सून मध्यरात्री एक नृत्याचा कार्यक्रम करून घरी येत असते. घरातले सगळे झोपलेले असतात. तुम्ही मात्र जागे असता. सुनेची वाट पहात देवापुढे येरझारा घालित असता. सुन देवघरासमोरून जात असते. तुम्ही तिला थांबवता आणि म्हणता....."
" ओके, ओके. आलं लक्षात.डोन्ट वरी. आय विल डू दॅट."
" सर, पण डायलॉग...."
" यू . आय विल मॅनेज दॅट टू बेबी. डोन्ट वरी."
हे काय चाललं आहे ते मला समजेना. हे असलं कांही माझ्या कथेत नव्हतं. मी पुढे झालो. सुताला समजावू लागलो तर ती म्हणाली, मी काळजी करण्यासारखं त्यात कांही नाही. असा प्रसंग कथेत नसला तरी तसा तो नंतर घालता येईल. मला खरंच कांही समजेना. सुताने जसे दादांना सांगितले तसा प्रसंग चित्रित केला गेला. चित्रिकरण संपताच मोठा जल्लोष झाला. दादांनी कसलीशी बाटली हलवून हलवून तिचे बूच हाताच्या अंगठ्याने उडवले. बाटलीच्या तोंडातून उसळणारा फेस उंच उडवला. तो सुताच्या केसावर पसरला.
आणखीही बराच जल्लोष चालू झाला. मला तो समजत नव्हता. मी सौ आणि मुले कुठे दिसतात कां ते पाहू लागलो. त्यांना शोधता शोधता मी बाहेर आलो. सौ एका बाकावर शांत बसली होती. कुलदीपक आणि कुलदीपिका अजून आतच त्या जल्लोषात होते. " चला आपण जाऊ या घरी. मुलं येतील मागाहून". सौ म्हणाली आणि पुढे निघाली. मी नादावल्या सारखा तिच्या मागे निघालो.
क्रमश:
आगामी : कथा/पटकथा