साईनिंग अमाऊन्ट (ईमडॉकॉ पार्ट टू)

                         दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ठीक आठ वाजता बिट्टू यादवने दिलेल्या कार्डावरच्या पत्त्यावर मी जाऊन पोहोचलो. जेमिनी टॉवर्स नावाच्या  एका बहुमजली इमारतीच्या एका सदनिकेच्या बाहेरच्या पितळी नामफलकावर याक अँड यति रेसॉर्टस् पासून अनेक कॉबलर्स् टॅनरीज पर्यंत अनेक कंपन्यांची नावे कोरलेली होती. सगळ्यात शेवटी टीव्ही अँड बीवाय् फिल्म्स कंबाईनचे जाड अक्षरात नाव लिहिलेला कागद डकवलेला होता. काळसर काचेचा दरवजा ढकलून मी आंत प्रवेश केला तेंव्हा एखाद्या अंधार्‍या गुहेत शिरताच अंगावर शिरशिरी यावे तसे झाला. पण मा लक्षात आले, अतिशय मंद प्रकाश असलेल्या वातानुकूलित स्वागतकक्षात मी प्रवेश करता झालो होतो. माझी चाहूल लागताच एका कोपर्‍यातून ‘ येऽस्’ असा फूत्कार कानावर आला. त्या दिशेने तर एक तांबूस लाल खड्यांची माळ घातलेला गळा, दोन उघडे दंड, उघडेच खांदे आणि त्यावर जवळ जवळ अगदी पुरुषी केशभूषामंडित एक स्त्रीचे मुंडके नजरेस पडले. नकळत मी एक आवंढा गिळला आणि त्या मुंडक्याच्या दिशेने सरकलो. जवळ गेलो तेंव्हा ती तेथील स्वागतिका आहे हे लक्षात आलं. तिच्या अर्ध्या उघड्या खांद्याखाली एक झग्यासारखे वस्त्र आहे हेही माझ्या लक्षांत आले. पण त्याचाही रंग ती ज्या मेजापलिकडे बसली होती त्याच्या काळ्या तांबूस रंगाशी मिळता जुळता होता. त्या मुळे कांही क्षणापूर्वी माझा गोंधळ झाला होता.

 "मम् ....मी... मै यादवजीसे मिलनेके वास्ते आया हूँ." अशा ठिकाणी खरं तर इंग्लिशमधून बोलतात हे मला माहिती होतं पण माझं हिन्दीच माझ्या इंग्लिपेक्षा बरं होतं.
" बीवाय् अजून आले नाहीत. येतीलच इतक्यात. आपण....?"  त्या पुरंध्रीला मराठी बोलता येतं हे पाहून माझी जीभ तर टाळ्यालाच चिकटली.
" म...मी... दामले. अच्युत दामले. मला त्यांनी भेटायला बोलावलं होतं"
 " मिस्टर दामले, आपले स्वागत असो. बीवाय् अजून आलेले नाहीत. पण थोड्याच वेळात येण्याची शक्यता आहे. आपण त्या सोफ्यावर बसून प्रतिक्षा  करू शकता. मी आपल्या साठी काय मागवू ? चहा, कॉफी की थंड चालेल? " ती मुलगी एका दमात आणि एका सुरात बोलली. बंद पडलेल्या  टेलेफोनची  तक्रार केल्यानंतर जसे एकसुरी ध्वनिमुद्रित उत्तर ऐकू येतं तसं.

                        मी कोपर्‍यातल्या सोफ्यावर बसून जवळच्या टीपॉयवरील नियतकालिके चाळू लागलो. त्यातली बहुतेक सारी बरीच जुनी आणि चुरगळलेली होती. त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेले, मुखपृष्ठावर तंग कपड्यातल्या टंच नटीचे छायाचित्र असलेले एक सिने पाक्षिक चाळायला घेतले. आतल्या एका पानावर उंची नक्षीदार जोधपुरी कोट पेहेरलेला आणि डोईवर भरजरी राजस्थानी पगडी असे नवरदेवाच्या वेषातले ढोणीचे छायाचित्र  दिसले. या बाबाचे शुभमंगल कधी झाले अशी शंका येईतो ती एक वधूवर सूचक मंडळाची जाहिरात आहे हे लक्षात आले. मनात आले, हा इतका गुणी खेळाडू ही असली वधूवर सूचक मंडळाची कां करतो आहे? ते कां याचे काम आहे? याने आपले क्रिकेट खेळावे ना. स्वधर्मे निधनं श्रेय: वगैरे वगैरे. पण मग मी तरी इथे कां आलोय? प्रसिध्दी कि पैसा? कि दोन्हीही? पण माझी विचारशृंखला कुणाच्या तरी चाहूलीने भंग पावली.
                       ते काचेचे दार उघडून एक नखशिखान्त शुभ्र वेषातील व्यक्ति त्या स्वागतिकेपाशी गेली. हाय, हॅलो इत्यादि लडिवाळ अभिवादनाच्या देवाणघेवाणी नंतर त्या वासकसज्जेने हलकेच कुजबुजत माझ्याकडे अंगु्लि निर्देश केला. इतकावेळ मला पाठमोरी असलेली ती व्यक्ति माझ्या दिशेने पुढे झाली तेंव्हा त्या शुभ्र वसनांना साजेसा असा गौर वर्ण, कपाळावर पांढर्‍या रंगाचा आडवा टिळा, गळ्यांत निरनिराळ्या आकाराच्या रुद्राक्षाच्या किमान तीन चार माळा, मानेवर रुळण्यासाठी मोकळाच ठेवलेला काळा कुळकुळीत केशसंभार, छातीपर्य़ंत येऊन स्वैर पसरलेली दाढी, पांढराशुभ्र गुरुशर्ट्, कमरेला दाक्षिणात्य पध्दतीने गुंडाळलेले धोतर असे एक दाक्षिणात्य व्यक्तिमत्व सामोर येऊन ठाकले. मी आपसूकच उठून उभा राहिलो.

"हाऽय्. आई य्यम टी वरदराजा. चीफ डिरेक्ट्ऽर. यू आर वेअटिंग फॉर बीवाय्, आई बिलीव्ह्.!"
"दामले! आय अम दामले. मिस्टर यादव टोल्ड मी टु कम हियर फॉर स्टोरी". मी प्रतिहस्तांदोलन करीत माझी ओळख करून दिली. माझ्या इंग्लिशला ती बया फिस्स करून हसली हे मी डोळ्याच्या कोपर्‍यातून पाहिलं.
"ओह् याऽ याऽ. तुमी ष्टोरी रायटर! रईट्? बीवाय् बोलली मला तें. ते फोन केला सकाली मला. वेलकम, वेलकम. चला आतमंदी बसून बोलू." या मद्राशाला मराठी बोलता येतं याचा अचंभा करीत मी त्याच्या मागोमाग त्याच्या केबीनमधे गेलो. आतील भिंतीवर अनेक नटनट्यांचे निरनिराळ्या  अवस्थेमधली छायाचित्रे इतस्तत: लावलेली दिसली. टी वरदराजाच्या फिरत्या खुर्ची मागे मात्र, केवळ लज्जा रक्षणापुरेतीच भगवी वस्त्रे ल्यालेल्या कुणा स्वामींची भली मोठी तस्वीर लावलेली होता. आधीच केंव्हा तरी लावलेल्या अगरबत्त्यांचा दरवळ आसमंतात भरून राहिला होता. स्वामींच्या या भक्तानं मोठया भक्तिभावाने त्यांना वंदन केलं. आणि म्हणाला,

"बोला साहेब. काय सोचला ?"
"म्ह...महणजे कसला?"
"ओह् सॉरी. तुमाला सगलं सांगायला पाहिजे. नाही कां?"
"हो म्हणजे यादवजीनी मला तशी थोडी कल्पना दिली होती. पण आपण अधिक.....त्या आधी मी एक विचारू?"
"हा विचारा . काई प्रॉब्लेम नाई."
"तुम्ही मराठी छान बोलता. ते कसं?"
"तसा बोल्लाच पायजे ना. मर्‍हाटी चॅनल चालवायचा म्हंजे मर्‍हाटी येलाच पायजे ."
'तेही बरोबरच.व्वा. छान्, छान्. "
 
तो आणखी कांही बोलणार तोच केबीनचा दरवाजा ढकलून बिट्टू यादव आंत आला.

"ओहोहो, अहो भाग ढमाले साहब. बेलकम, बेलकम टु टीव्ही अँड् बीवाय कंबाईन्. कब आये आप? क्षमा चाहते है. तनिक देरी हो गई हमरी."
"असूं दे. असूं दे चालायचंच. कांही फार उशीर नाही झाला. ठीक आहे." मी हळूच मनगटावरच्या घड्याळाकडे नजर टाकली. सुमारे तास झाला होता मला येऊन.

"चलिये, बाहर चलते है. पहचान करा देते है. सुताजीभी आतीही होगी. "
 
                         असं म्हणून तो बाहेरच्या दिशेने निघाला. पाठोपाठ आम्हीही. आम्ही तिघे बाहेरच्या स्वागत कक्षात जाऊन पोहोचतो न पोहोचतोच बाहेरील काचेचा दरवाजा ढकलून हाऽऽऽऽऽय् अशी इंजिनाच्या शिट्टीसारखी किंकाळी मारत एक टी शर्ट-जीन्स् वाली ललना आमच्याकडे झेपावली ती थेट बिट्टू यादवच्या पुढ्यात. त्याने तिच्या कमरेभोवती त्याचा हात लपेटला आणि तिने हाय् असे खिंकाळत त्याच्या गालावर आपले गाल घासले. तोच प्रकार तिने टी. वरदराजाच्या बाबतीतही केला. मी मात्र अभावितपणे मारुतीला नमस्कार करावा तसा दोन्ही हात जोडून ताठ उभा. मग तिनेही रुंद बत्तीशी दाखवत किंचित् लवत मलाही तसाच नमस्कार केला.  बिट्टू यादवने माझी रीतसर ओळख करून दिली आणि मग तिनेच संभाषणाचा ताबा घेतला.

"किनै, माझं खरं नाव सुस्मिता पाखरे अस्सय्. पण इकडे आमच्या लाईनीत सगळी निक् नेमनेच ओळखले जातात. हा टीव्ही, म्हंजे तिरुवेल्ला वरदराजन् आणि हा बी वाय्, म्हंजे बिट्टू यादव. म्हणूनच माझं इथलं नांव सुता झालं. मी प्रोड्यूसर आहे. बीवाय् फायनान्स् बघतो आणि टीव्ही डिरेक्शन. ती तिकडे आहे ती वीची. विशाखा चिरमुले. ती आमच्या नव्या ‘सून झाली सासू’ या सिरियलमधे फीमेल लीड करतेय. सध्या रिसेप्शन बघत्येय."

                        त्या मठठ चेहर्‍याच्या वीची कडे मी सहेतुकपणे नीट बघितलं. शिवतांडव स्तुती या स्तोत्रातील ‘विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनी’ या ओळीतील वीचि वल्लरी या शब्दाचा अर्थ मला लागत नव्हता. बहुदा ती हीच असावी.

"मी दामले. अच्युत दामले. कॉलेजमधे मराठी साहित्त्य शिकवतो. छंद म्हणून कथा लिहितो. एक कादंबरीही लिहीतोय मी सध्या."

"अय्या! ते तुम्ही ? मी वाचलीय ती कादंबरी. काय नाव बरं तिचं...लेट मी रिकॉल.  हांऽऽ बापू. येस् बापूच. हो न्ना?"
"कोण बापू?"
"ओह्, आय मस्ट हॅव रिमेम्बर्ड. बापू.... बापू... हांऽऽ गरंबीचा बापू. व्हॉट्टे ट्रॅजिक सटायर! "

 गारंबीचा बापू ट्रॅजिक सटायर? म्हणजे शोकात्म उपहास? मी मनातल्या मनात श्री. ना. पेंडश्यांची क्षमा मागितली आणि खर्‍या उपहासाने म्हणालो,

"तुम्हाला साहित्त्यात बरीच रुची दिसतेय."
"अहो आहे म्हंजे काय? मी शेक्सपियर, व्हॅनगॉफ् झालंच तर खांडेकर, माडगूळकर, मुळगांवकर, दलाल सारं वाचलंय. आणि माझ्या आईला  तुम्ही ओळखतच असाल.  मीना रघू?
"नाही बॉ. त्या पण असंच वाचतात?"
"अहो ती कसली वाचतेय. सारखी ट्रॅव्हल करीत असते. कुकरी एक्सपर्ट आहे. देशोदेशीच्या रेसीपीजचे चौदा व्हॉल्यूमस् लिहून काढलेत तिने. यंदाच्या साहित्त संमेलनाची प्रेसीडेंट् होणार होती ती. पण दोज् लिटरारी बूर्ज्वाज्, यू नो! दे कूऽऽड हर आऊट्."

"तिच हे शेवटचं वाक्य मला अजिबात समजलं नाही." त्यामुळे विषय बदलावा म्हणून मी म्हणालो,

"गारंबीचा बापू माझी कादंबरी नव्हे. ती श्री. ना. पेडसे..... ते जाऊ द्या. मी लिहितोय त्या कादंबरीचं नांव ‘जा भूतांनो जा’ असं आहे."
"अय्या व्हाट्टे कोऽन्‌सीडन्स! म्हणजे झी मराठीच्या ‘या सुखांनो या सारखं’? वॉऽऽव! मस्त! आपण तोच सोप करू या. स्सॉल्लीड टीआरपी गेन करता येईल."
"अहो पण तुम्ही 'सून झाली सासू 'ही मालिका करताय ना?
"कट् इट. सासू कॅन वेट फॉर समटाईम. सासू नंतर करता येईल. आधी तुमचं या भुतांनो करु या." असं म्हणून ती टीव्ही आणि बीवाय्‌च्या दिशेने किंचाळली,
"हेय्‌ बॉईज लिसन. ग्रेट न्यूज. एडी त्यांची नवी कादंबरी देताहेत आपल्याला. आपण एक नवीन सोप करतो आहोत. जा भुतांनो जा."
"बट् डियर, आपल्या सासूचं काय?" इति टी व्ही.
"शेल्व्हड्‌ फॉर सम टाईम. "सुता पाखरे.
"देन इट्‌स अ ग्रेट न्यूज इन्डीड. हुर्रेऽऽऽऽऽऽऽ!" पुन्हा टी व्ही.
"सो एडी, लेट अस साईन. चला तुमचं कॉन्ट्रॅक्ट साइन करू या." सुता पाखरे
"अहो पण मिस्‌ पाखरे....  "
"ओह्‌ नो एडी. तू आता मला फक्त सुता म्हणायचं. तू आता आमचा झाला आहेस. होन्ना रे टीव्ही."

                          खरं म्हणजे मला ते मी अच्युत दामलेचा एडी झाला तेंव्हाच समजायला हवं होतं. पण मी आतून खूप खूप सुखावलो. सुता पाखरे मला स्वप्न सुंदरीप्रमाणे दिसू लागली. आता या पुढे ती चारुगात्री माझ्याही गालावर गाल घासणार होती. मी मोहरून गेलो. माझा हात नकळत माझ्या गालावर गेला. दाढीच्या खुंटांचे रोमांच झाले होते. मी तरंगतच त्या तिघांबरोबर केबीनमधे गेलो.

"यह लीजिये साहब. इस तुच्छ भेंटका स्वीकार करें." 

                        बीवायने मला भानावर आणलं. एक गुळगुळीत लिफाफा माझ्या हातावर ठेवला गेला. तो मी उघडून पाहिला तर त्यात एक चेक होता. तब्बल दहा लाख रुपयांचा. मला तर गद्‌गदून आलं. सारं कसं स्वप्नवत्‌ वाटत होतं. त्या धुंदीतच मी टीव्हीने पुढ्यात ठेवलेल्या छापील चळतीवर तो जिथे सांगेल तिथे बेधडक सह्या करीत गेलो.
                        दहा लाख रुपये. साभार परत साहित्याचे गठ्ठे पाहून पाहून मुर्दाड बनलेल्या माझ्या डोळ्यात त्या चेकवरच्या दहा लाखाच्या आंकड्याने जणू संजीवनी ओतली होती.  'या भुतांनो या' या महान कौटुंबिक मेगा सीरियलच्या महान लेखकाची साईनिंग अमाऊन्ट दहा लाख रुपये!

क्रमश:                                                                            
(आगामी : महू्रत)