काव्य अस्तित्वाचे
काव्य अस्तित्वाचे चेतने मध्ये दडलेले
काव्य अस्तित्वाचे अचेतनात वसलेले
थोड्या फार फरकाने प्रत्येकात असणारे
थोडंसं सांगताना खूप काही रखणारे
काव्य भावनांचा ठाव घेणारे.
रुणझुणत्या हास्यामधून व्यक्त होणारे
आनंदोन्मादात बेफाम होऊन गरजणारे
सदोदित खळखळत किनार्याला बिलगणारे
मंद स्मितामधूनदेखील दरवळणारे
काव्य अस्तित्वाचे गुंजन करणारे.
कोणाच्या शब्दांमधून साद घालणारे
डोळ्याच्या कडांमध्ये चमकून जाणारे
शब्दांची साथ न घेता खूप बोलणारे
मुखातून घरंगळून हवेत विरणारे
काव्य अंतरंगाची खोली दाखवणारे.
निळे आकाश विशाल काव्यापरि असणारे
किंवा कोणाला पूर्णपणे रितेच भासणारे
कधी जिवनाच्या अणुरेणूंनी व्यापलेले
तरी गढूळ करडे दिसणारे
काव्या अस्तित्वच व्यापून बसलेले.
स्वाती फडणीस ........................१९९५