कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका : २

’कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ...’ हा विरंगुळा अनेकांना आवडला. म्हणून हा त्याचा दुसरा भाग.

( पुन्हा एकदा, यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत. प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही.)

अ - इचलकरंजीत असताना असे अनेक आलाप आमच्यासारख्यांनी अहमहमिकेने ऐकले आणि एकूणच   इतर आलाप आवर्जून ऐकता-ऐकता आम्हाला आलापांच्या आयोजकांचे अशक्य इंगित उमगले.

क - कॅल्शियमची कमतरता कमी करण्यासाठी कृश कुसुमने कोल्हापुरात कुलकर्ण्यांकडे किती काबाडकष्ट काढले !

ख - खेडजवळच्या खेड्यात खुरप्याने खालचं खोरं खुरपून खमक्या खापरपणजीने खानदानासाठी खूप खस्ता खाल्ल्या.

ग - गुटगुटीत, गोऱ्या गोलूने गोड गाणे गायल्याने गोंधळलेल्या गोविंदाने गावातून गपगुमान गाशा गुंडाळला.

घ - घाणेरडं घासलेट घेऊन घाईघाईने घरंदाज घारपुऱ्यांच्या घरात घुसणाऱ्या घोसावळेकरांवर घैसासांची घसघशीत घार घिरट्या घालेलच !!

च - चुकार चंदूने चौथ्यांदा चरखा चालवता चालवता चेरी, चारोळीयुक्त चमचम चोरून चुटकीसरशी चाखली.

छ - छटाकभर छुंद्यासाठी छत्तीसगढच्या छत्र्यांनी छोटासा छत्रीचा छाप छतावर छत्तीसवेळा छानपैकी छापला.

ज - जर्मनीचा जाणकार ज्योतिबा जळगावच्या जोश्यांच्या जुन्या जनता-जत्रेत जोकरचे जीवन जगला.

झ - झांजांसाठी झुरणारी झोपडीतली झीनत झुंजुमुंजू झाल्यावर झाडाखालच्या झोक्यावर झटक्यात झोपली.

ट - टंखलेखनयंत्राच्या टंचाईने टकल्या टोणप्यांचे टीचभर टंकलेखन टळले.

ठ - ठोमण्यांना ठणकावून ठोसरांनी ठेल्यावर ठसक्यात ठेवलेला ठोकळा ठणठणीत ठकारांनी ठामपणे ठोकला.

ड - डांबरट डाकूच्या डोक्यावरच्या डबोल्यातला डिंक डुचमळला.

ढ - ढोरमेहनतीनंतर ढकलाढकलीने ढेपाळलेल्या ढमढेऱ्यांनी ढीगभर ढोकळे ढापले.

त - तऱ्हेवाईक तानाजीने तुपात तळलेल्या तुकतुकीत तोंडल्याचा तर्जनीने ताकदीनिशी तिसऱ्यांदा तुकडा तोडला.

थ - थुलथुलीत थत्तेमावशी थाळीत थाटामाटात थालीपिठे थापता-थापता थकून थोडीशी थबकली.

द - दस्तुरखुद्द दाजींनी दसऱ्यानिमित्त दूरवर दार्जिलिंगमध्ये दोन दांडगट दोस्तांसमक्ष दुकानातल्या दळलेल्या दळणाचे दीनवाण्या दिनूला दान दिले.

ध - धुळ्याच्या धीरूभाईने धंद्याच्या धांदलीत धन्याला धमकावणाऱ्या धनेशला धक्क्यावरच्या धुक्यात धिक्कारले.

न - नसरापूरची नेहेमीची नर्तकी नेमकी नसतानाही नोकरांसमोर नीट नाचणाऱ्या नेभळट नंदूला नकट्या निलिमाने नावाजले .

प - पेन्शनर पंतांच्या पोरकट पुतण्याचे पाकीट पटकन पळवणाऱ्या पटाईत प्रकाशला पोलिसांनी परवा पुण्याच्या पेशवे पार्कमध्ये पेरू पाडताना पाहिले.

फ - फडक्यातल्या फोलपटांच्या फर्लांगभर फाफटपसाऱ्यामुळे फुकट फटाके फोडणारा फुरसुंगीचा फास्टर फेणे फारच फाफलला.

ब - बासनात बांधलेल्या बेलफळांसकट बेलापूरच्या बसमध्ये बसलेल्या बदमाष बंटीबरोबरच्या बाचाबाचीत बिचाऱ्या बबनच्या बाराच बरगड्या बचावल्या.

भ - भाद्रपदातल्या भरमसाठ भरतीमुळे भलताच भांबावलेला भाईंदरचा भारदस्त भास्कर भोसले भेलकांडणाऱ्या भोयांबरोबर  भितीपोटी भांड-भांड भांडला.

म - मात्र माश्या मारणाऱ्या मालोजी मानेंच्या मधल्या मुलाने मे महिन्यात मलकापूरला मात्र मस्त मैदान मारले.

य - योगायोगाने यावेळी युरोपातले यच्चयावत योगी यवतमाळच्या यमी येवलेकरबरोबर यानातून यात्रेला येणार.

र - रांजणगावच्या राजवाड्यावरची रोषणाई रंगांत रेखाटणाऱ्या रिक्षावाल्या रागीट राकेशसाठी रोमच्या रसिक राजाने रीतसर रोटी रांधली.

ल - लबाड लता लुकतुकेने लुकलुकणारा, लांबलचक, लाल लोलक लुबऱ्या लोकांपासून लीलया लपवला.

व - वाघापासून वाचण्यासाठी वैतरणाच्या वाकड्या वाटेवर वेगात वळणाऱ्या विजारीतल्या वजनदार विक्रम व वेताळला वीस वर्षीय वेंधळ्या वासंतीने विचित्र वागवले.

श - शर्वरी शेट्टी शिमग्यादिवशी शेतात शिकार शोधता-शोधता शेजारच्या शर्मिला शास्त्रीच्या शाकारलेल्या शामियान्यात शिरली.

स - समंजस साखरसम्राटाने सुस्तावलेल्या साळसूद सविताकडे संध्याकाळी सुकामेवा सोपवून स्वतः सकाळचे सपक सांबार संपवले.

ह - हैद्राबादच्या हैराण हर्षवर्धनचा हुशार, हरकाम्या हरी हल्ली हत्तीवरच्या हुजऱ्यांना हमखास हसवतो.