गराजसेल १
चाहुल लागे वसंताची नि अवघी सृष्टी बहरू लागे
फुटू लागले नवे धुमारे, गळून गेल्या पानामागे
साहुन फटकारे बर्फाचे ,झाडे अजूनही तग धरुनी
अंगी लेवुन नवीन लेणे ,उभी राहिली जुनी लव्हाळी
(घरट्याबाहेर पडू लागे -बघ चिमणा चिमणी इवलीशी)
ना दिसेना आता निशाणी- शोक कशाला गतकाळाचा?
सजला ध्यासाने नव्याच्या , बहराचा आनंद तयांचा
सोडवायला प्रश्न 'नको' चा नामी युक्ती सुचली त्यांना
(काढून टाका जे नको ते अन् करा जागा 'हव्या'करता)
झळकू लागला घरावरती बोर्ड तेव्हा गराजसेलचा
मुलगी एक फिरत होती शोधायाला नवी खेळणी
दारोदारी धावुन केली तिने कसोशीने पाहाणी
धावत आली ती वेगाने ,सांगत आईला माघारी
"एक आजोबा बसले तेथे, गळ्याभोवती त्यांच्या पाटी
"खुर्ची घ्या अन् न्या मजला फ्री,खुर्ची घ्या अन् न्या मजला फ्री"
(१.अमेरिकेत स्प्रिंग आला की घरातली अडगळ बाजूला करून एकंदरीत साफसफाई मोहीम राबवतात, नव्या वस्तू घेतात, उत्साहाचे वातावरण सगळीकडे असते. नको असलेल्या वस्तू घरासमोर, गराजमध्ये विकायला ठेवतात. शेजारीपाजारी फिरून गराजसेल मधून खेळणी व इतर काही वस्तू घेण्याची पद्धत दिसते. त्यावेळी सर्वसाधारण गिऱ्हाईकांना आकर्षित करण्याच्या सर्व पद्धती लोक वापरतात असेही आढळते.)