एक तरी लाईफलाईन हवी होती

आमच्या कॉलेजचा परिसर. आज परीक्षेचा शेवटचा दिवस असतो. जूनच्या कडक उन्हात तो सुंदर दिरवा परिसर भाजून निघत असतो. जगजीतसिंगची गझल सतत बॅक्ग्राउंडला वाजत असते. "कोई चिट्ठी ना सन्देस, वह जाने कौनसा देस जहाँ तुम चले गये" सिम्मी, फ्रेडी आणि मी, कँटीनमध्ये बसून बोलत असतो. आम्ही तिघेही मनांतून रिते झालो असतो. आमची मैत्री अशा वळणावर उभी असते, की जिद्दीने चालत राहिली तर आयुष्यभरासाठी मिळविली आणि थांबली तर संपून गेली. सिम्मी जाणार असते आगरतला-आसामला, मी, नागपूर-महाराष्ट्रात आणि फ्रेडी.... त्याच्या त्या सोनेरी धूळ उडणार्‍या. खमंग वासाचे साफे घातलेल्या जैसलमेरला.

        म्हणजे असं तो म्हणत असतो. तो खरंच कुठे जाणार हे सिम्मीला आणि मलाही माहिती असतं. आमचा जीव आतल्या आत गुदमरत असतो. त्याच्यासमोर बसवतही नसतं आणि त्याला सोडून उठवतही नसतं. मी जगजीतसिंग्च्या त्या बॅकग्राउंडला वाजणार्‍या रेकॉर्डसारखी परतपरत फ्रेडीला घरी येण्याबद्दल बजावत असते आणि तो उठतो. संध्याकाळची गाडी असते त्याची. म्हणतो,"चलो, हम तीनों कॉलेज का एक राउंड मार आते हैं, फिर पता नही...." माझ्या पोटात खड्डा पडतो. मी सिम्मीकडे बघते. तिच्या लालसर मोठ्ठ्या डोळ्यांमध्ये बघते. पापण्या ओलावल्या असतात. ओठ दाबून ती मानेनेच नाही म्हणते. "तेरे बस की बात नही है, हिम्मत चाहिये". मी यांत्रिकपणे उठते.  कॉलेज,लायब्रेरी, पार्किंग, कट्टा परत कँटिन आणि फ्रेडी शेकहँड करायला हात हातात घेतो. "मै आऊंगा तेरे घर. फिर मिलेंगे" माझ्या हाताची पकड पक्की होते. मनातला सावरून धरलेला बांध फुटतो. "हम फिर कभी नही मिलंगे फ्रेडी, कभी नही. कारण तू मरणार आहेस या जूनमध्ये. तू नेहमीसाठी जाणार आहेस. कधीच भेटणार नाहीस. आपली दोस्ती संपून जाणार आहेस. कधीच भेटणार नाहीस. आपली दोस्ती संपून जाणार आहे धाडकन. मी सुरू ठेवली असती रे माझ्याकडून. मीच तुला पत्र पाठवलं असतं, फोन केला असता. पण मलातरी काय माहिती तू कुठे जाणार आहेस ते. फ्रेडी, कुणालाच नाही माहिती." पण माझे शब्द आतच कोंडून जातात. नुसतीच जीवाची घालमेल होते. मी कसेबसे डोळे उघडते. अवघडलेले हात खाली घेते. कोंडलेले गरम अश्रू माझ्या कानशिलावरून खाली घसरतात. फ्रेडी, सिम्मी कॉलेज काहीही नाही. मी? आहे. थँक गॉड. मी नेहमी  माझ्याजवळ असते. थँक्स टु मी. मी माझ्या खोलीत असते आणि हे सगळं स्वप्नं असतं. मी किंचित सैलावते.

   स्वप्नं तरी कस म्हणायचं? फ्रेडी 'कोई चिठ्ठी ना सन्देस' अशा ठिकाणी निघून गेलेला असतो, सिम्मी आगरतल्याला आणि मी इथे. दहा वर्षं झालेत. जूनची सुरुवात फ्रेडी आणि आरती नसण्याच्या जाणीवेनेच होते. का?  काल, संध्याकाळी कारमध्ये ते गाणं ऐकलं, वाटलं बंद करून टाकावं, तर केलं का नाही? उगीचच आपण वाहवतो आणि स्वतःला त्रास करून घेतो.

पण फ्रेडीच्या कुठल्याही आठवणींचा कधी त्रास होत नाही. मैत्री, फ्रेंडशीप या शब्दाला प्रतिशब्द द्यायचा असेल तर मी पट्कन म्हणेन्,'फ्रेडी'. फ्रेडी म्हणजे निखळ मैत्री. आनंदाला फक्त भरती कळते, ओहोटी नाहीच. फ्रेडी म्हणजे मूर्तिमंत आनंद. स्टेजवर कंपेरिंग करणारा फ्रेडी आठवतो. कंपेरिंग थांबून कार्यक्रम सुरु झाला, की फ्रेडी आमच्यामध्ये उडी टाकायचा. मग स्वतःच्याच कार्यक्रमाला हूटिंग करायचं, शिट्ट्या वाजवायच्या, नाचायचं आणि आम्ही ढकललं की स्टेजवर माईकसमोर गडी तयार. मग कधी कागद खिशात सापडायचा नाही, कधी आधीच्या पानावरुन सुरुवात करणार. भंबेरी उडायची पण स्वतःची फजिती ही वल्ली निर्व्याजपणे एन्जॉय करायची. शक्ती म्हणायचा, "ऐसा नही लगता जैसे ये जिन्दगीका हर पल वसूल करना चाहता है?" खरं होतं ते. पण आपल्याला आयुष्य इतकं कमी जगायला मिळणार आहे, हे त्याला कुठे माहीत होतं?

     पहाटे दूधतलाई झीलला वळसा घालून जाणार्‍या रस्त्यावरून तो धावत जायचा आणि रात्री हॉस्टेलच्या गेटपाशी उशीरापर्यंत जागून गडबड, कधी खलबतं करत राह्यचा. हो, कॉलेजच्या पॉलिटिक्समध्ये ऍक्टिव्ह होता नं तो. 'फिर ना कहना माईकल दारू पी के दंगा करता है' किंवा असलंच कुठलं तरी गाणं गुण्गुणत- गुण्गुणणं हा त्याच्यासाठी फार नाजूक शब्द झाला-  कॅरिडॉरमध्ये, कँटिनमध्ये आमच्या खांद्यांवर धप्पकन ठेवून जायचा. एकदा मी चिडून, काहीशी हताश होऊन म्हणाले 'ऐसा मत किया कर, लडकी हूं मै" लडकी? किधर है लडकी?" फुर्रकन शीळ घालून इकडेतिकडे बघत म्हणाला. "मेरी तरफ देख. मै लडकी नही हूं क्या?" मी रागाने विचारलं. "तू, लडकी," हसत म्हणाला "कहाँ हैं? तू तो दोस्त है यार" मला आधीच माहीत होतं. ते डोळे माझ्याच मित्राचे होते.

    ज्यांचे लेक्चर्स बंक केलेत ते प्रोफेसर्स लगेच परत दिसलेत तर त्यांना प्रेमाने विश करून दोन गोड शब्द बोलायची ताकद फक्त ह्या पठ्ठ्यात होती. "टँजेंट जाता है सर, लेकिन आप चिंता मत करो, एक्झाम में रट्टा मार डालूंगा. आप बस प्रेझेंटी लगाओ.

     राजपुताना स्टाईलमध्ये 'खम्मागणी' करणं त्याने मला शिकवलं होतं. आणि "फ्रेड, अमुकतमुक रेफरन्सबुक मिळत नाही रे" "हुकुम, मिल जायेगी" आमचे प्रयत्न थकले की फ्रेडीकडे धाव असायची आणि मग, "जी हुकुम. हो जायेगा" कुठून मिळवलं विचारलं तर "आप आम खाओ नं, पेड गिनने से मतलब? ह्याची कुठलीही आठवण एक स्मित खेळवून जाते

आमची परीक्षा संपली होती. आम्ही 'बॉर्डर' बघायला जाणार होतो. "चल नं. तू एका जागी तीन तास बसू शकतोस का ते बघायचंय" म्हणत होतो.  "नथिंग डुईंग. माँ रोज चार बार फोन करती है." तो म्हणाला. "संदेसे आते हैं, चिठ्ठी आती है, पूछे जाती है, घर कब आओगे, तुम बिन यह घर सूना-सूना है" गात गात गेटजवळ पोहोचला. "और हाँ, 'बॉर्डर' मे जैसलमेरका शूटिंग है, देखना मेरा घर दिख जायें तो, फिर मिलेंगे." बस्. तेव्हा तो शेवटच्यांदा दिसला.

         बावीस जूनला आई मला सकाळी हलवून हलवून उठवत होती. "हाच नं गं तुझा मित्र तो, भाटी, माझ्या मागे "आंटी क्या बना रहे हो" विचारत किचनमध्ये येतो? त्याचाच फोटो आहे नं हा? बघ बरं. आणि तो त्याचाच फोटो 'एक्स्पायर्ड' कॉलममध्ये आलेला. ऍक्सीडेंटल डेथ. आम्ही सुन्न.

        पण तो होताच, कधी कॉलेजमध्ये दिसायचा, कधी कट्ट्यावर, कधे लायब्रेरीत, दूधतलाईच्या धुक्याने वेढलेल्या टेकड्यांमागे तर हमखास दिसायचाच. "यह अड्डा है क्या तेरा?" मी कितीदा विचारलं असेन. पण ते सगळे भासच. मग उदयपुर सोडलं आणि तो हळूहळू धुक्यांत विरत गेला. मार्चमध्ये पानगळ होते, उनाड वारा वाहतो, वार्‍याबरोबर गरम मसाला भाजल्याचे खमंग वास येतात आणि जागरणाचे, अभ्यासाचे दिवस आलेत हे आपोआप अंगवळणी पडतं, ही कितीतरी वर्षांची परंपरा आहे. शिक्षण संपलं तरी मार्चमधल्या गाणार्‍या वार्‍याबरोबर हे सगळे भास पाठशिवणी खेळतात. कधी कधी अजूनही. "परीक्षा आहे आणि आपला अभ्यास झाला नाहीये" ह्या जाणीवेनेच घाबरंघुबरं होऊन जागं होणं ह्या थोर भाग्याला इतकी वर्षं झाली तरी मी अंतरले नाही. तसंच, जून बरोबर  घेऊन येतो, फ्रेडी आणि आरती बरोबर नसल्याची जाणीव.

     आम्ही सगळे सोळा-सतराचे. उत्साहाने दुथडी भरुन वाहत असलेली रिकामी मडकी.  'मला कळतं आहे की मला काहीच कळत नाही.' हे सुद्धा न कळण्याच्या वयाचे. उदंड उत्साह, अमाप स्वप्नं, कष्टण्याची उमेद आणि अखंड चिवचीव. संपलं जग आमचं. 'नीला आसमां सो गया' संपायच्या आधीच गाढ झोपी जाण्याचं वय. सगळ्यांतून वेगळी पडायची ती आरतीच. ती आमची न संपणारी बडबड शान्तपणे ऐकायची. तिला स्वतःला कधीच काही सांगायचं नसायचं. आपलं कुणीतरी ऐकावं ही आमची इच्छा ती आनंदाने पूर्ण करायची आणि आम्ही मात्र तिला त्याबद्दल बिरुद दिलं होतं, 'पोस्टबीन' त्यात फक्त आपली लांबलचक निरर्थक पत्रं जातात, बाहेर कधीच काही येत नाही. सतत कुलूप लागलेलं.तिला आमचं सगळंच मान्य असायचं. अगदी तिला 'पोस्टबीन' म्हणणं सुध्दा. "तू कुठले सब्जेक्टस् घेणार आरती?"  "तू सांग कुठले घेऊ?" समजत असो वा नसो, कुठलंही म्हणणं ठामपणे मांडण्याचं वय आमचं. आरतीच्या त्या 'अशीच, इतकीच' घडी घातलेल्या स्मिताचाही राग यायचा. नेहमी ही बरोब्बर इतकीच कशी हसते? मग आम्ही तिला चिडवण्यात अगदी शर्थ करायचो. "आरती म्हणजे एक फ्रिज्ड स्टेट. न कम्-न ज्यादा." त्यातही ती आमची विद्वत्ता अगदी कौतुकाने ऐकायची आणि आम्हाला 'आपण हिला चिडवतोय ते हिला कळतंय तरी का? का हिला काही सोयरसुतकंच नाही,' असा प्रश्न पडायचा. 'हिने कधीतरी तिरसटून काहीतरी बोलावं' अशी ऊर्मी मनात यायची पण आरती मख्ख. अधुनमधुन आमचे काही कार्यक्रम ठरायचे. दरवेळेस आम्ही अभूतपूर्व गोंधळ घालत असू. आरती कोणाची तरी 'स्टेपनी'. आम्ही एकमुखाने तिला 'बॅकबेंचर करून टाकलं होतं आणि तिने स्वतःचं पेन असावं, इतक्या सहजपणे ते कॉलरवर वागवलं होतं.

    बारावीचा रिझल्ट लागला होता. आम्ही खूश होतो. परिस्थिती बदलण्याची काही शक्यता नसली तर आहे त्यात सुख मानणं हा प्रॅक्टिकल मार्ग. पण आमचा आनंद अर्ध्याच हृदयात मावत होता. कारण यादीत आरतीचा नंबरच नव्हता. पुढेही ती आमच्याबरोबरच राहील हे आम्ही गृहीत धरलं होतं पण तिने धक्का दिला होता. मग ऍडमिशन, सब्जेक्टस् चूझ करणं, आज जाऊ-उद्या जाऊ करत जून मध्यावर आला.

     कोणाच्याही दारातून शहाण्यासारखं जायचं नाही, ही रीत होती. दाराबाहेर उभं राहून आरतीच्या नावाने आवाज देण्याचा सपाटा लावला. आपल्या यशाबद्दल अपराधी वाटत होतं. तिच्याशी काय बोलायचं-कसं बोलायचं सगळं ठरलं होतं. कदाचित पहिल्यांदा ठरवलं होतं, 'आरतीच्या मनाचा विचार करायचा'. तिच्या वडिलांनी खुणेनेच आत बोलावलं. खुर्चीवर आई चेहरा पाडून बसलेली. 'काकू आरती नाहीये का?' काकू रडायला लागल्या. वैशूने मला हलवलं. समोर आरतीचा फोटो होता हार घातलेला. आरतीने गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या मोठ्या भावानेही केली होती तीन वर्षांपूर्वी. दोघांचं खूप गूळपीठ होतं म्हणे.

     घरी कसे आलो, कळलंही नाही. आरती तिच्या भावाबद्दल, त्याच्या जाण्याबद्दल कधीच काही बोलली नाही. तेव्हापासून का तिने सगळ्या गोष्टी मूकपणे स्विकारायला सुरुवात केली होती? तिचं कधीच काहीच का म्हणणं नसायचं? का कशाची प्रतिक्रिया उमटतच नव्हती तिच्या मनांत? तिच्या मनात काय होतं? ती कधीच काही बोलली नाही पण आम्ही... मैत्रिणी होतो नं तिच्या? का मैत्रिणीसारखं हलवून बोल्-बोल म्हणून बोलायला लावलं नाही तिला? स्वतःशिवाय कसला विचारच केला नाही कधी. उलट तिला पोस्टबीन, मठ्ठ.. अरे देवा! आरतीचं जाणं चटका लावून गेलं. तिच्या जाण्याचं वाईट जास्त वाटलं की आपल्या वागण्याचं हे अजूनही उलगडू शकलो नाही आम्ही.

     फ्रेडीचं जाणं मृत्यूचं येणं होतं पण आरतीचं जाणं आमच्या वागण्याचा पश्चात्ताप होता. एका चुकीची शिक्षा होती जी आम्ही इच्छा असूनही सुधरवू शकत नव्हतो. एक नकोसं, पण निश्चितपणे खांद्यावर विसावलेलं ओझं होतं, जे आम्हाला नेहमीसाठी वागवावं लागेल, कदाचित.

     तिचे काजळ घातलेले तपकिरी डोळे आणि ओठांवरचं समंजस हसू कालपरवा बघितल्यासारखं वाटतं. पत्र लिहिता आलं असतं, तर तिला लिहीलं असतं. लिहीलं असतं, "बाई गं, खूप खूप द्यायचं होतं तुला. द्यायला हवं होतं. पण राह्यलंय. खूप प्रेम, विश्वास आणि ऍक्सेप्टन्स. जसं तू आमचं सर्वकाही स्विकारलंस तसा स्वीकार. थोडं गप्प बसायचं होतं अन् तुला खूप बोलू द्यायचं होतं. तुला समजून घ्यायचं होतं.

  आणि लिहेलं असतं,  "यू ओ मी". "तू मला देणं लागतोस. सगळ्या ग्रुपला तुझी एकदमच आठवण यायची आणि आम्ही एकमेकांपासून नजरा चुकवायचो. तुझी पेट गाणी वाजायची कँटिनमध्ये आणि सिद्धु जोरात ओरडायचा 'बंद करो वो भोंपू'. आमचा नुसता उद्वेग व्हायचा आणि तू कुठे होतास? तू असायलाच हवं होतंस. कित्येकदा गरज पडली तुझ्या तगड्या सपोर्टची. तुझ्यातली पॉझिटिव्ह एनर्जी खूपदा हवी होती. तुझ्याकडून खूप घ्यायचं राहून गेलं". मृत्यूने आपल्याबरोबर नेणार्‍यामागे एखादी अशी 'लाईफलाईन' ठेवायला हवी होती. आपलं म्हणणं फक्त त्याच्यापर्यंत पोहचवलं असतं तरी माझ्यासारख्या वेळेमागून शहाण्या होणार्‍या लोकांना किती बरं वाटलं असत!.