ताळमेळ

मेघ तू निळा कधी कधी उदास सांजवेळ
पाहते उभी खिळून चालला तुझाच खेळ

रंग तुझे लाख, कळा लाख लाख अंतरात
पात्र ये भरून काठ ओघळून वाहतात
ऐकते बसून मी तुझा सुरेल वाद्यमेळ ॥

साद ऐकता तुझी मनात जागतो चकोर
चांदण्यात नाहते तुझी खट्याळ हास्य-कोर
चंद्र हासतो, खुलून ये फिरून शुभ्र वेळ ॥

भूल पाडतोस नाद लावतोस तू दुरून
जादुगार,ये समोर, वेड जाय ओसरून
ये समेवरी जमेल काळवेळ, ताळमेळ !!

--अदिती
(माघ वद्य ६ शके १९२९,
२७ फेब्रु. २००८)